Sun, Sep 27, 2020 00:04होमपेज › Kolhapur › महापौरपदासाठी घोडेबाजाराचा भाव कोसळला

महापौरपदासाठी घोडेबाजाराचा भाव कोसळला

Published On: May 17 2018 1:27AM | Last Updated: May 16 2018 11:43PMकोल्हापूर : सतीश सरीकर 

नगरसेवक म्हणून निवडून येऊन अडीच वर्षे झाली... परंतु निवडून येण्यासाठी खर्च केलेल्यापैकी काहीच रक्‍कम वसूल झालेली नाही... कारभारी ‘ढपले’ पाडत असून, फक्‍त ते ‘बघत’ बसण्याची वेळ आली आहे... म्हणून अनेक नगरसेवक अक्षरशः वैतागले आहेत... जे काही मिळेल ते आता ‘पदरात’ पाडून घेण्यासाठी धडपड सुरू आहे... ‘कोण कुणाचे नाही,’ या तत्त्वानुसार ‘देईल तो माझा,’ असे म्हटले जात आहे... परिणामी, महापौरपदाच्या निवडणुकीत ‘कुंपणावर’च्या नगरसेवकांची संख्या वाढू लागली आहे... त्यामुळे नगरसेवकांची गोची झाली असून, ‘घोडेबाजाराचा भाव’ कोसळून 80 लाखांपर्यंत आल्याची चर्चा आहे. 

अवघे चार नगरसेवक असलेल्या शिवसेनेच्या तिघांना प्रत्येकी 80 लाखांची ऑफर दिल्याची चर्चा महापालिका वर्तुळात सुरू आहे. राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी ‘वेगवेगळ्या’ रकमा कळविल्या असल्याचे सांगण्यात येते. एका नगरसेवकाने 75 लाख आणि भावाच्या हातात 25 लाख देण्याची मागणी केली आहे. एका नगरसेवकाने 70 लाख दिल्यास महापौरपदाच्या निवडणुकीसाठी सोबत येण्यास तयार असल्याचे सांगितले आहे. एका नगरसेवकाने स्वतःला 70 लाख व एका माजी स्वीकृत नगरसेवकाला 15 लाख दिल्यास भाजप उमेदवाराला मतदान करण्याची तयारी दर्शविली आहे. अशा प्रकारे आणखी चार नगरसेवक संपर्कात असल्याची चर्चा आहे. ‘दगाफटका’ लक्षात घेऊन काँग्रेसनेही ‘त्याच पद्धतीने’ तयारी केल्याची चर्चा आहे. शह-काटशहाचे ‘राजकारण’ खेळण्यासाठी व्यूहरचना आखली जात आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी तिकडे ‘तडजोड’ केल्यास लगेच भाजप-ताराराणी आघाडीतील नगरसेवकांशी ‘सेटलमेंट’ करून काँग्रेसच्या गोटात त्यांना सामील करून घेणार असल्याची चर्चा आहे. भाजप-ताराराणी आघाडीचे सहा नगरसेवक सत्ताधारी कारभार्‍यांच्या संपर्कात असल्याचे सांगण्यात येते.   

महापालिकेत काँग्रेस-राष्ट्रवादीची सत्ता आहे. ‘काटावरचे बहुमत’ असल्याने सत्तेच्या चाव्या आपल्याकडे ठेवण्यासाठी शिवसेनेच्या चार नगरसेवकांची साथ घेतली आहे. त्यासाठी शिवसेनेला परिवहन समिती सभापतिपद दिले आहे. विरोधी भाजप-ताराराणी आघाडीने चार महिन्यांपूर्वी स्थायी समिती सभापतिपदाच्या निवडणुकीत सत्ताधारी काँग्रेस-राष्ट्रवादीला ‘धोबीपछाड’ देत सभापतिपद खेचून घेतले. त्यामुळे भाजप-ताराराणी आघाडीचे लक्ष आता महापौरपदाच्या निवडणुकीकडे लागले आहे. 

भाजपची नेतेमंडळी गेल्या महिन्यापासूनच कोणत्याही स्थितीत भाजपचाच महापौर होईल, असे अगदी ठामपणे सांगत आहेत. त्यामुळे महापौरपदाच्या निवडणुकीत नेत्यांना हवा असलेला ‘चमत्कार’ घडविण्यासाठी भाजप-ताराराणी आघाडीचे कारभारी ‘कामाला’ लागले आहेत.  भाजपचा महापौर करायचा म्हटल्यास सत्ताधारी काँग्रेस-राष्ट्रवादीसह शिवसेनेचे नगरसेवक फोडण्याशिवाय गत्यंतर नाही. त्यासाठी आर्थिक

वाटाघाटी म्हणजेच घोडेबाजार होणार हे उघड गुपित आहे

स्थायी सभापतीपदाच्या निवडणूकीत ‘बिन आवाजाचा बॉम्ब’ फुटून दगाफटका झाल्याने काँग्रेस-राष्ट्रवादीची नेतेमंडळी आता ‘सावध’ झाली आहेत. कुंपणावरची म्हणजेच फुटू शकणार्या नगरसेवकांवर ‘वॉच’ ठेवण्याची जबाबदारी कारभार्यांवर सोपविली आहे. त्यातूनही काही नगरसेवक विरोधकांच्या संपर्कात असल्याचे सांगितले जात आहे. सुरूवातीला अशा नगरसेवकांची संख्या कमी होती. त्यामुळे ‘कोटीच्या उड्डाणाची स्वप्ने’ नगरसेवकांना दाखविण्यात आली होती. मात्र आता येणार्यांची संख्या वाढू लागल्याने नगरसेवकांचे ‘डिमांड’ कमी आल्याची चर्चा आहे. 

अडीच वर्षासाठी महापौरपदाचे आरक्षण असल्याने एकदाच काय असेल ते ‘खर्च’ होऊ दे असेही ठरले असल्याचे नगरसेवकांतून सांगितले जात आहे. विरोधकांकडून होणार्या फोडाफोडीच्या राजकारणापासून ‘लांब’ ठेवण्यासाठी सत्ताधारी काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नगरसेवकांना रविवारपासूनच सहलीवर पाठविण्याचे नियोजन केले आहे. भाजप-ताराराणी आघाडीतही नगरसेवक फोडून ‘बिघाडी’ करण्यासाठी काँग्रेसच्यावतीने प्रयत्न केले जात आहेत. त्यामुळे सर्वपक्षीय नगरसेवकांना चांगलाच ‘भाव’ आला आहे. सत्ताधारी व विरोधक त्या त्या पक्षातील नगरसेवकांसोबत सहलीला ‘एकत्र’ असले तरीही प्रत्यक्ष महापौर निवडणूकीला मतदानावेळी काय होईल हे कुणीही ठामपणे सांगू शकत नाही, अशी चर्चा महापालिकेत सुरू आहे.  

नगरसेवकांची डिमांड वाढली

सत्ताधारी काँग्रेस-राष्ट्रवादी व विरोधी भाजप-ताराराणी आघाडीचे कारभारी सारेकाही ‘अलबेल’ असल्याचे दाखवत आहेत. परंतू प्रत्यक्षात कुणाचाच कुणावर ‘विश्‍वास’ नसल्याची स्थिती आहे. एकमेकांना ‘गाफील’ ठेवून दगाफटका करण्यासाठी आतल्या गोटातून ‘व्यूहरचना’ आखली जात असल्याची चर्चा आहे. सत्ताधारी पक्षातील फुटीर नगरसेवकांना भाजप-ताराराणीकडून 50 लाखाची ऑफर, 15 लाखांचा निधी आणि पक्षांतरबंदी कायद्यातंर्गत कारवाई झाल्यास पोटनिवडणूकीसाठी उमेदवारी आणि निवडूण आणण्याची जबाबदारी अशा ऑफर दिल्याची चर्चा आहे. परंतू स्वपक्षाला दगा देऊन येण्यासाठी किमान 75 ते 80 लाख हवेत अशी नगरसेवकांची डिमांड केली जात असल्याचे सांगण्यात येते.  

काहींना परदेश ट्रिपचीही ऑफर...

गेल्या काही वर्षांत पहिल्यांदाच महापौरपदाच्या निवडणुकीसाठी एवढी ईर्षा निर्माण झाली आहे. त्यामुळे एकेक नगरसेवक महत्त्वाचा असल्याचे सांगण्यात येत आहे. परिणामी, नगरसेवकांचा हट्टही पुरविण्याचा प्रयत्न केला जात असल्याची चर्चा आहे. काही नगरसेवकांनी थेट परदेश सहलीची डीमांड केल्याचे सांगितले जात आहे. अशा प्रकारे परदेशात ट्रिपवर जाऊन थेट महापौरपदाच्या निवडणुकीलाच गैरहजर राहण्यासाठी काहींची धडपड सुरू असल्याची चर्चा महापालिका वर्तुळात सुरू आहे.