Sat, Aug 08, 2020 02:25होमपेज › Kolhapur › ‘प्रदूषण’च्या अधिकार्‍यांना घेराव

‘प्रदूषण’च्या अधिकार्‍यांना घेराव

Published On: May 06 2018 1:08AM | Last Updated: May 06 2018 12:54AMइचलकरंजी : वार्ताहर

पंचगंगा प्रदूषणप्रश्‍नी आक्रमक झालेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने शनिवारी प्रदूषणास जबाबदार घटकांवर कारवाई टाळाटाळ होत असल्याने येथील काळ्या ओढ्यावर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रादेशिक उपअधिकारी आर. एस. कामत, प्रदूषण नियंत्रण मंडळाचे क्षेत्रीय अधिकारी राजेश आवटी यांना घेराव घातला. कारवाई होत नाहीपर्यंत तोपर्यंत त्यांना न सोडण्याची भूमिका घेतली. अखेर प्रदूषण मंडळाचे प्रादेशिक अधिकारी दिलीप खेडकर यांनी कारवाईचे आश्‍वासन दिल्यानंतर कामत यांची सुटका करण्यात आली. दरम्यान, संबंधित घटकांवर चार दिवसांत कारवाई न झाल्यास अधिकार्‍यांना दूषित पाणी पाजण्याचा इशारा स्वाभिमानीने दिला.

स्वाभिमानीच्या  पदाधिकार्‍यांनी दुसर्‍या दिवशी प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकार्‍यांसमवेत चंदूर ओढा येथे पाहणी केली. त्याठिकाणी मोठ्या प्रमाणात रसायनमिश्रित सांडपाणी ओढ्यात सोडले जात असल्याचे आढळून आले. अधिकार्‍यांनी तेथील पाण्याचे नमुने तपासणीसाठी घेतले. प्रदूषण होत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर स्वाभिमानीच्या पदाधिकार्‍यांनी प्रदूषण नियंत्रण मंडळाचे मुख्य अधिकारी खेडकर यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधण्याचा प्रयत्न केला; परंतु त्यांच्याकडून प्रतिसाद मिळाला नाही. त्यानंतर सर्वजण टाकवडे वेस परिसरातील काळा ओढा येथे आले.  तेथील पाण्याचे नमुनेही  घेण्यात आले.  त्याठिकाणी पुन्हा खेडकर यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला; पण प्रतिसाद मिळत नसल्याचे पाहून संतप्त पदाधिकार्‍यांनी कामत यांना घेराव घालत त्यांना तेथेच रोखून धरले. त्यावेळी कामत यांनी खेडकर यांच्याशी संपर्क साधला असता पदाधिकार्‍यांना खेडकर यांच्यावर प्रश्‍नांची सरबत्ती करत जोपर्यंत प्रदूषणास जबाबदार घटकावर कारवाई होत नाही तोपर्यंत अधिकार्‍यांना रोखून धरण्याचा इशारा दिला. त्यावर खेडकर यांनी सांडपाणी तपासणीचा अहवाल प्राप्त होताच संबंधितांवर तत्काळ कारवाई करण्याचे आश्‍वासन दिल्याने कामत यांची सुटका झाली. पंचगंगा प्रदूषणास जबाबदार घटकांवर ठोस कारवाई न केल्यास स्वाभिमानी संघटना 10 मे नंतर आक्रमक आंदोलन हाती घेणार असल्याची माहिती शंभुशेटे यांनी दिली.