Mon, Jul 06, 2020 03:47होमपेज › Kolhapur › चिकोत्रा आंदोलनाकडे राजकीय नेत्यांची पाठ!

चिकोत्रा आंदोलनाकडे राजकीय नेत्यांची पाठ!

Published On: Jun 07 2018 2:05AM | Last Updated: Jun 06 2018 11:31PMहमीदवाडा : मधुकर भोसले

कागल तालुक्यातील दक्षिण विभागातील चिकोत्रा खोर्‍याचा पाणीप्रश्‍न ऐरणीवर आला आहे. खोर्‍यातील 30 भर गावांच्या द‍ृष्टीने हा खूपच जिव्हाळ्याचा विषय बनला आहे. त्यामुळेच या समस्येबाबत लोकचळवळ उभी राहिली आहे. यामध्ये पहिल्या टप्प्यातील आंदोलन जेव्हा लिंगनूर कापशी येथे झाले. तेव्हा तालुक्यातील राजकीय नेते उपस्थित होते. त्यांची पाठिंबा देणारी भाषणेही झाली होती. मात्र, याच प्रश्‍नाबाबत  मंगळवारी कागल येथे झालेल्या महामार्गावरील आंदोलनात एकही राजकीय नेता सहभागी झाला नव्हता. त्यामुळे याची प्रामुख्याने चिकोत्रा खोर्‍यात चर्चा सुरू आहे. त्याचबरोबर सोशल मीडियावर देखील या अनुपस्थितीबद्दल नाराजी व्यक्‍त केली जात आहे.

खोर्‍यातील शेतकरी व नागरिक पाण्यासाठी व्याकुळ आहेत. 18 वर्षांपूर्वी चिकोत्रा प्रकल्पात पाणीसाठा सुरू झाला व खोर्‍यातील लोकजीवनाच्या आशा पल्लवित झाल्या. 3 अपवाद वगळता सतत या प्रकल्पात 60 टक्क्यांच्या आसपासच पाणीसाठा झाला. मात्र, अगोदरची 10 ते 12 वर्षे उसाचे प्रमाण कमी असल्याने नदीवर उपसा बंदी देखील नव्हती. किंबहुना पाणी पुरत होते. मात्र, चार पैसे पदरी पडावेत म्हणून शेतकर्‍यांनी उसाचे प्रमाण वाढवले व गेल्या 5 - 6 वर्षांत खोर्‍यात पाणीप्रश्‍न गंभीर बनला. महिन्यातील 20 ते 22 दिवस नदी कोरडी पडते. 

हे अवर्षण संपविण्यासाठी चिकोत्रा प्रकल्पाचा जलस्रोत बळकट करणे व अपूर्ण  दिंडेवाडी बारवे प्रकल्प पूर्ण करणे या 2 मुख्य मुद्यांना घेऊन किसान सभेने लोकलढ्याचे रणशिंग फुंकले. तालुक्यातील अन्य राजकीय गटांच्या तुलनेत या पक्ष किंवा संघटनेची ताकत खूप कमी. मात्र, तरीही सर्व गट तट यांना हाका देत, प्रसंगी तुम्ही तुमचा गट सोडू नका, मत कुणाला द्यायचे ते द्या मात्र आंदोलनात सहभागी व्हा. अशी आवाहने केली गेली. त्याला चांगला प्रतिसाद मिळाला. लोकांनी दहा रुपयांपासून  हजार रुपयांपर्यंत या चळवलीला मदतीही केल्या. सर्वच राजकीय गटांच्या स्थानिक व विभागीय कार्यकर्त्यांनी या लोक चळवळीत भाग घेतला व लिंगनूर तसेच कागल येथील आंदोलने लक्षवेधी केली. कागलमध्ये

राष्ट्रीय महामार्ग अडवताना युवा पिढीतील नेत्यांबरोबरच प्रमुख नेते मंडळी सहभागी होतील, अशी अपेक्षा होती. कारण त्यांचा खंबीर पाठिबा या समस्येला निर्णायक वळणावर आणू शकतो. मात्र, कागल मधील सदर आंदोलनात युवा तसेच प्रमुख नेते मंडळी देखील उपस्थित नव्हती. याबाबत आश्‍चर्य व्यक्त होत आहे. 

कार्यकर्त्यांची सजगता

तालुक्यातील प्रमुख नेते मंडळी जरी या आंदोलनात सहभागी झालेली नव्हती. मात्र, खोर्‍यातील त्यांचे कार्यकर्ते मात्र आंदोलनात पुढाकार घेऊन होते. सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, सहकारी संस्थांचे अध्यक्ष, पंचायत समिती व जिल्हा परिषद सदस्य अशा पदांवर काम करणारे आजी - माजी कार्यकर्ते दोन्हीही आंदोलनात सक्रिय होते व विशेष म्हणजे यातील एकाही कार्यकर्त्याने आपल्या पक्षाच्या अथवा नेत्याच्या घोषणा दिल्या नाहीत की, पक्षाचे झेंडे अथवा बॅनर देखील फडकवले नाहीत. जरी नेते मंडळी आली नसली तरी पाण्यासाठी आपल्याला संघर्ष करावाच लागेल. ही सजगता या कार्यकर्त्यांमध्ये जाणवून आली व ती कौतुकास्पद सुद्धा आहे.