Tue, Aug 11, 2020 22:33होमपेज › Kolhapur › अलमट्टीमुळेच महापुराचे संकट

अलमट्टीमुळेच महापुराचे संकट

Published On: Aug 15 2019 1:20AM | Last Updated: Aug 15 2019 12:47AM
कोल्हापूर : प्रतिनिधी

अलमट्टी धरणातील पाण्याचा योग्य प्रमाणात विसर्ग न केल्याने कोल्हापूर व सांगली जिल्ह्यांत महापुराचे संकट निर्माण झाले आहे. भविष्यात ही परिस्थिती पुन्हा निर्माण होऊ नये, यासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस व कर्नाटकचे मुख्यमंत्री येडियुराप्पा यांनी बैठक घेऊन योग्य निर्णय घ्यावा, असे दैनिक ‘पुढारी’चे मुख्य संपादक डॉ. प्रतापसिंह जाधव यांनी मदत व पुनर्वसन मंत्री सुभाष देशमुख यांच्याशी चर्चेवेळी सांगितले. 

ना. देशमुख यांनी बुधवारी दैनिक ‘पुढारी’ कार्यालयास सदिच्छा भेट दिली. ना. देशमुख यांनी डॉ.  जाधव यांच्याशी कोल्हापूर, सांगली जिल्ह्यांतील पूरस्थितीबाबत चर्चा केली. सांगलीतील पूरग्रस्त गावे उद्योगपतींनी दत्तक घ्यावीत, असे आवाहन केल्याचे सांगून पूरग्रस्तांसाठी ‘पुढारी’च्या वतीने सुरू असलेल्या मदत कार्याचा कोल्हापूर पॅटर्न सांगलीत राबवण्यात येईल, असे सांगितले.

डॉ. जाधव यांनी सांगितले की, 2005 साली अलमट्टी धरणाची उंची वाढवली गेली. त्यावेळी  तत्कालीन  काँग्रेस आघाडी सरकारने त्याला विरोध करणे आवश्यक होते; पण तसे झाले नाही. कृष्णा खोरेचे प्रकल्प जरी पूर्ण झाले असते, तरी कृष्णा नदीला मिळणार्‍या 63 नद्यांच्या पाण्याचा प्रवाह या पावसाळ्यात काही प्रमाणात कमी झाला असता. खुजगाव  येथे धरण उभारण्यात यावे, अशी राजारामबापू पाटील यांची मागणी होती; तर वसंतदादा पाटील यांचा आग्रह चांदोली येथे धरण उभारण्याला होता. खुजगाव येथे धरण उभारले असते, तर 90 टीएमसी पाण्याचा साठा झाला असता. पाण्याच्या नैसर्गिक प्रवाहाने सोलापूरच्या दुष्काळी भागाला पाणी मिळाले असते.

कृष्णा खोरेची रखडलेली कामेदेखील महापुराचे प्रमुख कारण आहे. जर लहान लहान बंधारे बांधले गेले असते, तर त्यात पाणी साठून पुराच्या पाण्याचा प्रवाह संथ होण्यास मदत झाली असती; पण कृष्णा खोरे प्रकल्पाची कामे अपूर्णच राहिली, असेही डॉ. जाधव यांनी सांगितले.  

कोल्हापुरात यापूर्वी अशा पद्धतीचा महापूर कधीच आला नव्हता. 1989 व 2005 साली पूर आला; पण आताच्या  पुरामध्ये  ब्रिटिश काळात बांधलेल्या जिल्हाधिकारी कार्यालयातही पाणी शिरले. हा मानवनिर्मित महापूर रोखण्यासाठी अलमट्टी धरणाच्या प्रश्‍नाबाबत गांभीर्याने निर्णय घेण्याची वेळ आली आहे, असे डॉ. जाधव यांनी सांगितले.  

कोल्हापुरात  महापुराच्या काळातही विविध क्षेत्रांत काम करणार्‍या संघटना एकत्रित आल्या आहेत. त्यांचा कोल्हापूर डिझास्टर मॅनेजमेंट ग्रुप तयार करण्यात आला आहे. त्याच्यामार्फत नियोजनबद्ध पद्धतीने पूरग्रस्तांना मदत निधीचे कार्य सुरू आहे. दैनिक ‘पुढारी’कडेही पूरग्रस्तांसाठी मदतीचा ओघ सुरू आहे. ‘पुढारी’कडे प्राप्‍त होत असलेल्या  जीवनावश्यक वस्तू  शहरात पूरग्रस्तांसाठी  काम करणार्‍या विविध संघटनांकडे पाठवला जात असल्याची माहिती  डॉ. जाधव यांनी दिली. 

सांगली येथील पूरस्थितीबाबत ना. सुभाष देशमुख म्हणाले, शासनाच्या वतीने पूरग्रस्तांसाठी मदतकार्य सुरूच आहे; याशिवाय उद्योगपती तसेच औद्येागिक संस्था, संघटना यांनी पूरग्रस्त गावे दत्तक घेऊन त्यांचा विकास करावा, असे आवाहन केले आहे. मी स्वत: हरीपूर गाव दत्तक घेतले आहे. शासन स्तरावर पूरग्रस्तांचे पुनर्वसन करण्याला प्राधान्य दिले जात आहे.  

कोल्हापुरात दैनिक ‘पुढारी’ने पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी केलेल्या नियोजनबद्ध कामाचे ना. देशमुख यांनी कौतुक केले. हा कोल्हापूर पॅटर्न सांगलीत राबवून प्रत्येक पूरग्रस्तांच्या घरात मदतकार्य पोहोचवले जाईल, असे आश्‍वासन डॉ. जाधव यांना दिले. यावेळी गुरुदत्त शुगर्सचे चेअरमन माधवराव घाटगे, जनसुराज्य शक्‍तीचे समित कदम उपस्थित होते.