Fri, Jul 10, 2020 00:06होमपेज › Kolhapur › ‘राजर्षी’ किताबाची शताब्दी...

‘राजर्षी’ किताबाची शताब्दी...

Published On: Apr 21 2019 1:40AM | Last Updated: Apr 20 2019 11:33PM
शाहू छत्रपती महाराजांचे समग्र कार्य फक्‍त कोल्हापूर संस्थानापुरते मर्यादित नव्हते, ते कार्य राष्ट्रव्यापी होते. शाहू छत्रपती महाराजांच्या याच कार्याची प्रेरणा घेऊन उत्तर प्रदेश येथील कुर्मी क्षत्रीय समाज वाटचाल करीत होता. या समाज परिषदेचे दरवर्षी अधिवेशन भरविले जात होते. यामध्ये देशभरातील नामवंत, विद्वान व्यक्‍तींना या परिषदेच्या अध्यक्षपदाचा बहुमान मिळाला होता. याच कुर्मी क्षत्रीय परिषदेचे अधिवेशन 19 एप्रिल ते 21 एप्रिल 1919 दरम्यान कानपूर येथे भरविण्यात आलेले होते व या अधिवेशनाचे अध्यक्ष म्हणून या समाजाने शाहू महाराजांच्या राष्ट्रव्यापी कार्याची महती ओळखून आमंत्रित केलेे होते. 

शाहू महाराज 19 एप्रिल 1919 रोजी कानपूर येथे या परिषदेचे अध्यक्ष म्हणून उपस्थित राहिले  व या दिवशी उपस्थितांना शाहू महाराजांनी वैचारिक मार्गदर्शन केले. या मार्गदर्शनामध्ये महाराजांनी वर्ण व जातीव्यवस्थेवर अभ्यासपूर्ण विचार मांडले. या भाषणाच्या सुरुवातीलाच महाराजांनी उपस्थितांना उद्देशून “मी तुमच्यापैकीच एक आहे. मला मजूर समजा अगर शेतकरी समजा कारण माझे वाडवडील हाच धंदा करीत होते व जे काम माझे पूर्वज करीत होते त्याच लोकांचा अध्यक्ष होण्यास मला बोलावले आहे त्याबद्दल मला अत्यानंद होत आहे.” असे उद‍्गार काढून उपस्थितांना आपलेसे केले. याच भाषणात ते स्वतःला शेतकरी त्याचबरोबर महान पराक्रमी छत्रपती शिवाजी महाराज व त्यांच्या स्नुषा महाराणी ताराबाई राणीसाहेब यांच्या वंशातील असल्यामुळेच अध्यक्षपदाचा बहुमान मिळाल्याचे प्रामाणिकपणे नमूद करतात व हेही प्रामाणिकपणे नमूद करतात की मला या अधिवेशनात येण्याची प्रमुख अडचण होती ती हिंदीतून भाषण करण्याची; पण तीन दिवस रेल्वेत याचा अभ्यास करून भाषण करण्याचा निश्‍चय केला. शाहू महाराजांचे हिंदीतील भाषण स्वामी परमानंद यांनी उपस्थितांना वाचून दाखविले. त्याचबरोबर पराक्रमी महाराणी ताराबाई, महाराणी सती अहिल्याबाई, राणी लक्ष्मीबाई झाशी व महाराणी कमलाबाई यांसारख्या शूर कर्तबगार-क्षत्रीय स्त्रियांनी प्रभावीपणे राज्याचा गाडा हाकला. 

वेळप्रसंगी हातात तलवार घेऊन शत्रूशी दोन हात करण्यासही त्या मागे राहिल्या नाहीत, हे काम पडद्यात राहून शक्य नाही, पडद्यामुळे स्त्रियांतील शूरतादी गुणांचा नाश होतो. त्यामुळे पडदा पद्धत नष्ट व्हावी, असे परखड विचारही महाराजांनी मांडले. देशाची कृषिप्रधान संस्कृती आहे. शेतीचे काम हलक्या दर्जाचे नसून देशाचा अर्थव्यवस्थेचा तो प्रमुख असेही महाराजांनी आवर्जुन नमूद केले.

शाहू महाराजांच्या या विचारांनी पुढील दोन दिवस परिषदेस उपस्थित असणारे सर्वजण मंत्रमुग्ध झाले. एक नवा विचार या परिषदेच्या माध्यमातून महाराजांनी समाजाला दिला. याच विचारारूपी यज्ञातून प्रेरित होऊन परिषदेच्या शेवटच्या दिवशी म्हणजेच 21 एप्रिल 1919 रोजी कुर्मी क्षत्रिय समाज परिषदेमध्ये सर्वानुमते शाहू छत्रपती महाराजांना बहुमानाची “राजर्षी” ही पदवी देण्याचा ठराव करण्यात आला व पुढे शाहू छत्रपती महाराजांना राजर्षी शाहू छत्रपती ही बिरुदावली रूढ झाली. आज या घटनेला शंभर वर्षे पूर्ण होत आहेत व शंभर वर्षांपूर्वीचा राजर्षी शाहू महाराजांचा समाजोद्धाकर विचार नव्या जोमाने पुढे नेण्याची आजच्या काळाची गरज आहे हे ही तितकेच खरे.

- गणेशकुमार वि. खोडके , अभिलेखाधिकारी कोल्हापूर पुरालेखागार