Tue, Jun 15, 2021 12:02
कस्तुरीसोबत साजरा झाला ‘उत्सव नात्यांचा’; दै. ‘पुढारी’ कस्तुरी क्लब , झी मराठी यांचा संयुक्तिक कार्यक्रम

Last Updated: Jan 21 2021 2:02AM

कोल्हापूर ः दै. ‘पुढारी’ कस्तुरी क्लब, झी मराठी आयोजित संयुक्तिक ‘उत्सव नात्यांचा’ कार्यक्रमात महिलांशी गप्पा मारताना सुशांत शेलार, मानसी साळवी, शाल्व किंजवडेकर, अनिता फलटणकर. (छाया ः पप्पकोल्हापूर ः पुढारी वृत्तसेवा 

लॉकडाऊनच्या मोठ्या कालावधीनंतर दै. ‘पुढारी’ कस्तुरी क्लब आणि झी मराठी वाहिनीने महिलांच्या मनोरंजनासाठी सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी दिली. मकर संक्रांतीनिमित्त ‘उत्सव नात्यांचा’ हा मनोरंजनात्मक कार्यक्रम लॉकडाऊननंतर प्रथमच कस्तुरी क्लबतर्फे केशवराव भोसले नाट्यगृहात संपन्न झाला. कार्यक्रमाला महिला आणि तरुणींचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

कार्यक्रमात झी मराठी वाहिनीवरील ‘येऊ कशी तशी मी नांदायला’ या मालिकेतील स्वीटू (अनिता फलटणकर), ओमकार (शाल्व किंजवडेकर) आणि ‘काय घडलं त्या रात्री?’ मालिकेतील एसीपी रेवती बोरकर (मानसी साळवी), आणि अजय (सुशांत शेलार) यांच्याशी दिलखुलास गप्पा मारल्या. सांस्कृतिक कार्यक्रमांची आतुरतेने वाट पाहणार्‍या महिलांना ‘उत्सव नात्यांचा’ या कार्यक्रमातून परिपूर्ण आस्वाद घेता आला. चैतन्य कुलकर्णी आणि सपना हेमंत यांच्या बहारदार गाण्यासह सॅड्रिक डिसुजा यांचा नृत्याविष्काराने कार्यक्रमाची रंगत वाढविली. महिलांनीही त्यांच्या सादरीकरणास टाळ्या अन् शिट्ट्यांंची अखेरपर्यंत साथ दिली. तसेच ‘स्वराज्यरक्षक संभाजी’फेम पल्लवी वैद्य आणि अधोक्षज कर्‍हाडे यांच्या खुमासदार सूत्रसंचालनाने प्रेक्षकांची मने जिंकली.

दरवर्षी ऑगस्टमध्ये कस्तुरी क्लब सभासद नोंदणी सुरू होते. मागील वर्षी ऑगस्ट 2019 ला सभासद नोंदणी झाल्यानंतर ऑगस्ट ते मार्च 2020 पर्यंत कस्तुरी क्लबचे अनेक मनोरंजनात्मक कार्यक्रम व कार्यशाळा घेण्यात आल्या. मार्च 2020 ला लॉकडाऊन सुरू झाल्यानंतरही कस्तुरी क्लबने फेसबुकद्वारे ऑनलाईन पद्धतीने ‘अबतक बच्चन’, ‘हास्यकल्लोळ’, ‘स्वर तरंग’ अशा मनोरंजनात्मक कार्यक्रमांबरोबर अनेक कार्यशाळा व विविध स्पर्धा घेऊन महिलांनी बक्षिसांचा खजिना लुटला. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर 18 जानेवारी रोजी प्रथमच ‘उत्सव नात्यांचा’ या सांस्कृतिक कार्यक्रमाची पर्वणी सभासदांना दिली आणि यापुढेही कस्तुरी क्लबमार्फत अशा कार्यक्रमांंची मेजवानी सभासदांकरिता चालूच राहील, असे सांगण्यात आले.