Wed, Sep 23, 2020 20:34होमपेज › Kolhapur › ‘तान्हाजी’ चित्रपट करमुक्‍त करण्यासाठी मंत्रिमंडळ बैठकीत मागणी करणार ः ना. मुश्रीफ

‘तान्हाजी’ चित्रपट करमुक्‍त करण्यासाठी मंत्रिमंडळ बैठकीत मागणी करणार ः ना. मुश्रीफ

Last Updated: Jan 13 2020 12:17AM
कागल ः प्रतिनिधी

छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्वांना एकत्र घेऊन हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. या स्वराज्यातून अनेक शूरवीर निर्माण झाले. हा जाज्वल्य इतिहास तरुणामध्ये निर्माण व्हावा, म्हणून नरवीर तान्हाजी मालुसरे यांच्या जीवनावर आधारित ‘तान्हाजी द अनसंग वॉरियर’ हा चित्रपट करमुक्‍त करण्यात यावा, अशी आग्रही मागणी मंत्रिमंडळ बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे करणार असल्याची माहिती ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली.

अभिनेता अजय देवगण यांची प्रमुख भूमिका असलेला ‘तान्हाजी द अनसंग वॉरियर’ या चित्रपटाबद्दल लोकांत उत्सुकता आहे. या पार्श्‍वभूमीवर ना. मुश्रीफ यांनी हा चित्रपट करमुक्‍त करण्याची मागणी केली आहे. तरुणांमध्ये जिज्ञासा निर्माण व्हावी, यासाठी  हा चित्रपट करमुक्‍त करून शाळा, महाविद्यालयांमध्ये दाखविण्यात यावा. तसेच, शिक्षणमंत्र्यांनी सहली व गॅदरिंगमध्ये दाखवावा. या चित्रपटाचा लोकोत्सव व्हावा, यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले. 

यावेळी मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक मधुकर पाटील म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्माण केले. ते टिकविण्यासाठी अनेकांनी छातीचा कोट केला. ‘तान्हाजी द अनसंग वॉरियर’ हा चित्रपट प्रेरणादायी असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट करून हा चित्रपट करमुक्‍त करण्यात यावा, अशी मागणी केली. यावेळी जिल्हा बँकेचे संचालक भैया माने व मान्यवर उपस्थित होते.

प्रामाणिकपणे कर्ज फेडणार्‍यांची माहिती घेण्याचे काम सुरू

कर्जाची प्रामाणिकपणे परतफेड करणार्‍यांना कर्जमाफी द्यावीच लागेल. त्यासाठी सध्या माहिती घेण्याचे काम सुरू आहे. यासाठी किती पैसे लागणार, व्यक्‍ती किती, याची माहिती घेतली जात असून, सोसायटीच्या पदाधिकार्‍यांनी माहिती नाही दिली तर शेतकर्‍यांचेच नुकसान होणार आहे, असे त्यांनी एका प्रश्‍नाला उत्तर देताना स्पष्ट केले. 

 "