Wed, Jul 08, 2020 15:24होमपेज › Kolhapur › पूरग्रस्तांच्या मागणीसाठी माकपचा मोर्चा

पूरग्रस्तांच्या मागणीसाठी माकपचा मोर्चा

Published On: Sep 17 2019 1:51AM | Last Updated: Sep 16 2019 11:54PM
कोल्हापूर : प्रतिनिधी
पूरग्रस्तांच्या विविध मागण्यांसाठी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या विविध जनसंघटनांच्या वतीने सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून ठिय्या आंदोलन करण्यात आले. यावेळी शिष्टमंडळाच्या वतीने जिल्हाधिकार्‍यांना निवेदन देण्यात आले. जिल्हा प्रशासनाच्या अखत्यारीत येणारे प्रश्‍न मार्गी लावण्याचे आश्‍वासन देण्यात आले. तसेच यासंदर्भात दि. 19 सप्टेंबर रोजी पुन्हा बैठक घेण्याचे ठरले. 

जिल्ह्यातील पूरग्रस्तांच्या विविध मागण्यांसाठी मोर्चा काढण्याचा निर्णय मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने घेण्यात आला होता. त्यासाठी सकाळपासून कार्यकर्ते दसरा चौकामध्ये जमत होते. दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास हलगी, घुमक्याच्या निनादात मोर्चास सुरुवात झाली. मोर्चात महिलांचा सहभाग मोठा होता. हातामध्ये लाल झेंडे आणि फलक कार्यकर्त्यांनी धरले होते.  घोषणा देत हा मोर्चा व्हिनस कॉर्नर, बसंत-बहार रोड मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आणण्यात आला. याठिकाणी कार्यकर्त्यांनी ठिय्या मारला. त्यानंतर शिष्टमंडळाच्या वतीने निवेदन देण्यात आले.

प्रत्यक्ष पाहणी करून पूरग्रस्तांना शंभर टक्के नुकसानभरपाई द्यावी, अतिवृष्टीने पडलेली घरे शासनाने विनामूल्य बांधून द्यावीत, बागायती शेतीला एकरी 1 लाख व जिरायत शेतीच्या नुकसानीसाठी एकरी 50 हजार द्यावेत, जाहीर केलेली रक्‍कम विना विलंब द्यावी, शेतकर्‍यांना कर्जमुक्‍त करा आदी मागण्यांचा निवेदनात समावेश आहे. मोर्चात अखिल भारतीय किसान सभा, सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियन्स, जनवादी महिला संघटना, महाराष्ट्र राज्य शेतमजूर युनियन, एस.एफ.आय., डी.वाय.एफ.आय. आदी संघटना सहभागी झाल्या होत्या. शिष्टमंडळात डॉ. उदय नारकर, डॉ. सुभाष जाधव, सुभाष निकम, विजयाराणी पाटील, मुमताज हैदर आदींचा समावेश होता.