Thu, Jun 24, 2021 12:08
‘सीईटी’ परीक्षेतील गुणांच्या आधारेच अकरावीची शहरस्तरीय प्रवेश प्रक्रिया

Last Updated: Jun 05 2021 11:04PM

कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा

दहावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर झाल्यानंतर सीईटी परीक्षा घेतली जाणार आहे. या परीक्षेत मिळालेल्या गुणांच्या आधारे शहरातील कनिष्ठ महाविद्यालयांत कला, वाणिज्य, शास्त्र शाखेसाठी यावर्षीची ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया राबविली जाणार आहे, अशी माहिती अकरावी केंद्रीय प्रवेश प्रक्रिया समितीचे सचिव, सहायक शिक्षण संचालक सुभाष चौगुले यांनी दिली.  

शासनाने दहावीची परीक्षा रद्द केली असून, मूल्यमापनाची अंतर्गत पद्धती जाहीर केली आहे. 28 मे रोजी शासनाने अकरावी प्रवेश प्रक्रियेसंदर्भात निर्णय घेतला आहे. यात प्रवेशाबाबत स्पष्टता दिली आहे. सीईटी परीक्षा दहावी उत्तीर्ण सर्वच विद्यार्थ्यांना देता येणार असून, ती ऐच्छिक स्वरूपाची आहे. सीईटीचा अभ्यासक्रम दहावीच्या अभ्यासक्रमाच्या धर्तीवर असणार आहे. ओएमआरच्या माध्यमातून बहुपर्यायी पद्धतीने शंभर गुणांची परीक्षा घेतली जाणार आहे. 

सीईटी परीक्षेत मिळालेल्या गुणांच्या आधारे शहरातील 35 कनिष्ठ महाविद्यालयांतील कला, वाणिज्य, शास्त्र शाखेत सुमारे 14 हजार 600 उपलब्ध जागांसाठी ही प्रवेश प्रक्रिया राबविली जाणार आहे. सीईटी परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांना अकरावी प्रवेशासाठी प्राधान्य दिले जाईल. त्यानंतर उर्वरित शिल्लक जागा राहिल्यास सीईटी परीक्षा न दिलेल्या विद्यार्थ्यांना संधी दिली जाईल. शासनाकडून याबाबत सर्वसमावेश मार्गदर्शक सूचना लवकरच येणार आहेत. त्यानंतरच पुढील कार्यवाही होईल, असे चौगुले यांनी सांगितले.

अकरावीची दोन फेर्‍यांत प्रवेश प्रक्रिया

अकरावी प्रवेशासाठी सामाईक प्रवेश परीक्षा घेतली जाणार असल्याने अनिश्चितता संपली आहे. शहरातील कनिष्ठ महाविद्यालयांतील उपलब्ध प्रवेश जागांसाठी दोन फेर्‍यांमध्ये ही प्रवेश प्रक्रिया राबविली जाणार आहे. दहावी परीक्षा निकालानंतर सीईटी परीक्षा होईल, त्यानंतरच अकरावी प्रवेशाला गती मिळणार आहे. यासंदर्भात शिक्षण उपसंचालक कार्यालयाने नियोजन सुरू केले आहे.