Mon, Sep 21, 2020 23:54होमपेज › Kolhapur › गुणवत्तेच्या आधारे बांधकाम व्यावसायिकांनी आपली प्रतिमा तयार करावी : आदित्य ठाकरे

गुणवत्तेच्या आधारे बांधकाम व्यावसायिकांनी आपली प्रतिमा तयार करावी : आदित्य ठाकरे

Last Updated: Jan 15 2020 1:44AM

आदित्य ठाकरेकोल्हापूर : प्रतिनिधी  

कामाच्या गुणवत्तेवर बांधकाम व्यवसायिकांनी आपली प्रतिमा तयार करावी. महानगरांमध्ये देण्यात येणार्‍या सुविधा ग्रामीण भागातही दिल्यास त्या परिसराचाही सर्वांगीण विकास होईल, असे प्रतिपादन पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी व्यक्‍त केले. 

क्रिडाई महाराष्ट्रच्या वतीने मुंबईत आयोजित ‘महाकॉन  2020’ या राज्यस्तरीय अधिवेशनाच्या उद्घाटन समारंभात ते बोलत होते.

 यावेळी क्रिडाई नॅशनलचे अध्यक्ष सतीश मगर, चेअरमन अक्षय शहा, क्रिडाई महाराष्ट्रचे अध्यक्ष राजीव परीख, उपाध्यक्ष शांतीलाल कटारीया, सुतील कोतवाल, अनंत जेगावकर उपस्थित होते. मंत्री ठाकरे म्हणाले, राज्याची सर्वसमावेशक प्रगती करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. बांधकाम व्यावसायिकांनी आपले काम दर्जेदार करावे. समान बांधकाम नियमावली ही काळाची गरज आहे. मिशन रोजगार ही संकल्पना संपूर्ण राज्यभरात राबवण्याचा प्रयत्न करणार आहे. विकसकांना आर्थिक साहाय्य देण्यासाठी बँकांशी चर्चा सुरू आहे. गृहनिर्माण प्रकल्पांसमोरही अनेक समस्या आहेत. या समस्या एकत्रितपणे सोडवण्याचा प्रयत्न करू.

 आ. रोहित पवार म्हणाले, बांधकाम व्यवसाय अनेक घटकांशी जोडला आहे. या क्षेत्राची  राज्याच्या अर्थव्यवस्थेवर मोठी पकड आहे. त्यामुळे या क्षेत्राला भेडसावणार्‍या अडचणी दूर करण्याचा प्रयत्न करू. 

आ. ऋतुराज पाटील यांनी, सोशल मीडिया हे आपले मत मांडण्याचे प्रभाव माध्यम आहे. त्याचा योग्य वापर केल्यास सामान्य नागरिकांपर्यंत शासन योजना पोहोचण्यास मदत होणार आहे, असे सांगितले.  

यावेळी ‘उत्तुंग झेप’ व ‘महारेरा मॅन्युअल 2020’ या दोन पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी गुंतणूकदार राकेश झुनझुनवाला, रचना भुसारी, बांधकाम व्यावसायिक बोमण इराणी, महारेराचे प्रमुख गौतम चॅटर्जी  यांनी महारेराच्या अंमलबजावणीबाबत मते मांडली.  

यावेळी महाराष्ट्र क्रिडाईचे उपाध्यक्ष श्रीकांत परांजपे, सुनील फुरडे, महेश यादव, कोल्हापूर क्रिडाईचे अध्यक्ष विद्यानंद बेडेकर, प्रकाश देवलापूरकर, गिरीश रायबागे व मान्यवर उपस्थित होते.

 "