Mon, Jan 18, 2021 09:41होमपेज › Kolhapur › तुमचं काम नाही अडणार!

तुमचं काम नाही अडणार!

Published On: Jul 24 2018 1:08AM | Last Updated: Jul 24 2018 12:44AMकोल्हापूर : विजय पाटील

लाचेची रक्‍कम दोन लाख असेल किंवा पाच लाख असेल, तर शक्यतो लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे (एसीबी) तक्रार देण्यास टाळाटाळ केली जाते. याचे कारण लाचेची रक्‍कम जप्‍त झाल्यावर आपले पैसे फौजदारी प्रक्रियेत अडकतील. तसेच आपले कामसुद्धा होणार नाही, अशी पोकळ चिंता बहुतेक जण करतात; पण आता अशी चिंता करण्याची गरज नाही. कारण, एसीबीच्या सापळ्यात जप्‍त झालेली तुमची रक्‍कम सरकारकडून धनादेशाच्या माध्यमातून तुम्हाला लवकरात लवकर दिली जाते. तसेच तुमचे काम एसीबीच्या पाठपुराव्याने केले जाते. 

सगळ्या सरकारी आणि निमसरकारी कार्यालयांत ‘येथे लाच दिली व घेतली जात नाही,’ अशा आशयाचे फलक लावलेले दिसतात. काही अधिकार्‍यांच्या खुर्चीच्या मागील भिंतीवर ‘मी प्रामाणिक आहे,’ अशा शब्दातला स्टीकर चिकटवलेला असतो. प्रत्यक्षात मात्र हा सगळा शब्दांपुरता मामला दिसून येतो. कारण, लाच दिली तरच अशा काही कार्यालयांत काम होते; अन्यथा हेलपाट्याने माणूस थकून जातो, असे वास्तव असते. 

आपले काम होणार नाही, या भीतीने बहुतेक जण लाच देऊन मोकळे होतात. मुळात सेवा हमी कायदा असल्याने ठराविक वेळेत आपले काम झालेच पाहिजे, हा दंडक आहे. तरीही जाईल तेथे लाच द्यावीच लागेल, असे चित्र सर्वसामान्यांच्या मनात पक्के रुजले आहे. एसीबीने यासाठी काही कठोर पावले उचलली असल्याचे दिसून येते. 

तक्रार केली तर लाचेसाठी दिलेली रक्‍कम परत मिळेल का नाही, अशी एक शंका नेहमीच उपस्थित केली जाते; पण ही रक्‍कम सरकारकडून लवकरात लवकर संबंधित तक्रारदाराला पोहोच केली जाते. त्यामुळे रक्‍कम अडकण्याचा विषयच नाही. दुसर्‍या बाजूला तक्रार दिली तर आपले काम होणार नाही, असा एक सूर आळवला जातो; पण संबंधितांचे हे नियमानुसार असलेले काम एसीबी अधिकारी पाठपुराव्याने करून देतात. कारण, तक्रारदाराला सर्व बाजूंनी संरक्षण आणि पाठबळ एसीबीकडून दिले जाते. त्यामुळेच लाच देऊन कामे करण्यापेक्षा धैर्याने अशांना वठणीवर आणण्यासाठी धाडस दाखवण्याची गरज आहे.  कारण, त्यामुळे तुमची कामे अडणार नाहीत आणि तुमचेही काही तटणार नाही, हे ध्यानात घ्यायला हवे. 

साडेसात महिन्यांत झाल्या 483 कारवाई 

1 जानेवारी 2018 ते 20 जुलैअखेर म्हणजे मागील साडेसात महिन्यांत राज्यात एकूण 483 प्रकरणांत सापळे यशस्वी झाले आहेत. तर भ्रष्टाचार करून अपसंपदा जमवल्याप्रकरणी 13 प्रकरणांचा तपास सुरू आहे. यासह इतर भ्रष्टाचाराच्या 16 प्रकरणांचा तपास सुरू आहे. यामध्ये कोल्हापूरमध्ये आतापर्यंत 21 सापळे यशस्वी झालेत, तर इतर भ्रष्टाचार या प्रकारातील एका प्रकरणाचा तपास सुरू आहे. गतवर्षाच्या तुलनेत रंगेहाथ पकडण्याच्या प्रकरात (सापळा) राज्यात 1 टक्‍का, तर कोल्हापुरात 75 टक्के वाढ झाली आहे.