Wed, Sep 23, 2020 22:53होमपेज › Kolhapur › रस्त्यावर पार्किंगमुळे ‘ब्लॉक’ होतोय रोड

रस्त्यावर पार्किंगमुळे ‘ब्लॉक’ होतोय रोड

Published On: Jun 21 2018 1:36AM | Last Updated: Jun 20 2018 11:43PMकोल्हापूर  : विजय पाटील 

तावडे हॉटेलपासून मोटारसायकलवरून शहरात प्रवेश करून बघा. रस्ता एकेरी असतानाही वाहतूक कोंडीचा तुम्हाला सामना करावा लागणार. ताराराणी पुतळ्यापासून पुढे स्टेशन रोडवरून अगदी दसरा चौकापर्यंत जायचे म्हटले तर वाहतूक कोंडी तुमचा पिच्छा सोडणार नाही. गंगावेस रोड, राजारामपुरी, भाऊसिंगजी रोड किंवा मिरजकर तिकटी या हमरस्त्यांवर एक द‍ृश्य हमखास दिसणार. ते म्हणजे, अनेक वाहने रस्त्याकडेला पार्किंग केली जातात. या पार्किंगच्या बेशिस्तीमुळे होणार्‍या वाहतुकीच्या कोंडीने वाहनधारकांचा वेळ नाहक वाया जात आहे. ‘रस्त्यावर पार्किंगची खोड आणि ब्लॉक होतोय रोड,’ अशी सर्वसामान्यांची बोलकी प्रतिक्रिया यानिमित्ताने ऐकायला मिळत आहे.प्रत्येकाने वाहतुकीचे प्राथमिक नियम पाळले, तर कितीही वाहने असली आणि रस्ता अरुंद असला, तरी वाहतूक कोंडी होत नसल्याचा दावा सातत्याने वाहतूकतज्ज्ञ करतात. यासाठी रांगेने चालणार्‍या हजारो मुंग्यांचे उदाहरण दिले जाते. 

असं समजा की या रांगेने जाणा-या मुंग्यात एखादी मुंगी  रांग सोडून आगाऊपणा करायला लागली तर. असं झालं तर अख्खी रांग विस्कळीत होऊन सगळंच सैरावैर होऊन जाईल. इवलासा जीव असणा-या मुंग्या या कधीही रांग सोडत नाहीत, बरं का! पण माणसांना मात्र रांगेत वाहन उभं राहणंच अवघडल्यासारखं वाटतं. कारण प्रत्येकजण पुढच्याला हॉर्न देत ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न करतो किंवा कसेही आडवे-तिडवे वाहन चालवून सगळ्या वाहतूकीचाच खोळंबा करुन निघून जातो. हे असं खोळंबा करणा-यांचे प्रमाण शहरात जास्त दिसत आहे. 

सर्वाधिक रहदारी..

शहरात सर्वाधिक रहदारीचा रस्ता म्हणजे स्टेशन रोड यानंतर भाऊसिंगजी रोड, गंगावेश, रंकाळा रोड, महाव्दार रोड, मिरजकर तिकटी, बिंदू चौक, दसरा चौक, जोतिबा रोड, असा क्रम ढोबळ मानाने लावता येईल. या रस्त्यांवर एखादा अर्धाफुट दगड जरी आडवा ठेवला तरी वाहनांचा वेग निम्मा होऊन कोंडी होऊ शकते. इतकी रहदारी या रस्त्यांवर असते.   

 रस्त्यावर वाहने लावू नका

रस्त्यावर खुशाल वाहने लावून एक-दोन तास वाहनधारक निघून जातात. जर अशी वाहने वाहतूक नियंत्रक पोलिसांनी सील केली, तर अशा मंडळींचा दावा असतो की, मग वाहन कुठे लावू? मुळात बहुतेकांना दुकानाच्या दारात वाहन लावून खरेदी करण्याची भारी हौस असते. सरकारी कार्यालयांच्या दारात गाडी लावूनच काम आटोपण्यात अनेकजण खेळ करताना दिसतात. या प्रकाराने पार्किंगच्या नियमांचा हरताळ फासला तर जातोच, त्याशिवाय हे रस्ते ब्लॉक होतात. मग चार-दोघांच्या या प्रवृत्तीने अख्ख्या वाहनधारकांची पंचाईत होते. यामध्ये मग अ‍ॅम्ब्युलन्ससारखे वाहनही अडकून पडते. माणसांचा वेळ रस्त्यातच वाया जातो. आपले काम ज्या ठिकाणी असते तेथपासून अलीकडे किंवा पलीकडे थोडी लांब पार्किंगसाठी निश्‍चितपणे जागा असते. तेथे वाहने पार्किंग केली, तर सगळ्याच गोष्टी सहज, सोप्या होतील. याशिवाय चालण्याचा व्यायामही होईल. आता पार्किंगबाबत नियम पाळलेच पाहिजेत. कारण, त्याशिवाय पर्याय राहिलेला नाही. नाहीतर शहरात काही रस्त्यांवर ढकलगाडीच्या स्पीडसारखी वाहने कासवगतीने चालवावी लागतील. याचा फटका सगळ्यांचाच किमती वेळ वाया जाण्याला बसणार आहे.