कोल्हापूर : परितेत कोरोनाबाधित सापडल्याने भोगावती परिसर हादरला

Last Updated: Jul 11 2020 7:52PM
Responsive image


कौलव : पुढारी वृत्तसेवा

परिते (ता.करवीर) येथे कोरोनाबाधित रूग्ण सापडल्याने भोगावती परिसर भयकंपित झाला आहे. हा रूग्ण कोल्हापूरातील एका बाधित डॉक्टरच्या संपर्कात आला होता. मात्र गेल्या चार दिवसात त्या बाधिताचा गावाशी संपर्क आलेला नाही. त्यामुळे चिंतेची बाब नाही. 

गेल्या तीन महिन्यात भोगावतीसह परिसरातील गावागावात सोशल डिस्टन्सिंगचे पालन केल्यामुळे कोरोनाचा शिरकाव झालेला नव्हता. त्यामुळे एकही संशयित रूग्ण भोगावतीसह परिसरात सापडला नव्हता. त्यामुळे हळूहळू सर्व व्यवहार सुरळीत झाले होते. मात्र आज परिते येथे कोरोनाबाधित रूग्ण सापडल्यामुळे सर्वत्र खळबळ माजली आहे.

परिते येथील एक व्यक्ती मंगळवारी कोल्हापूरातील एका डॉक्टरकडे मधुमेह व उच्च रक्तदाबाची तपासणी करून रात्री उशिरा तो गावी परतला होता. मात्र संबंधित डॉक्टर कोरोनाबाधित निघाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर संबंधित व्यक्तिला तत्काळ त्याच दिवशी पहाटे कोल्हापूर येथील संस्थात्मक अलगिकरण केंद्रात ठेवण्यात आले होते. तसेच त्याचा स्वॅब तपासणीसाठी पाठवला होता. त्याचा आज रिपोर्ट पॉझिटिव्ह आला.

आज दुपारी ही बातमी परितेसह परिसरात पसरताच प्रचंड घबराट पसरली. संबंधित व्यक्ती एका दुध संस्थेचा कर्मचारी आहे. त्यामुळे ग्रामस्थांत मोठी भीती निर्माण झाली आहे. भोगावती साखर कारखाना स्थळावरील बाजारपेठ ही परितेच्या हद्दीतच येते. तसेच येथे पन्नासहून अधिक गावांचा संपर्क या गावाशी येतो. त्यामुळे परिसरात भीतीयुक्त चर्चा सुरू होती. मात्र सदर व्यक्ती अलगिकरण केंद्रात असल्याने गेल्या चार दिवसात गावाशी कोणताही संपर्क आलेला नाही. त्यामुळे लोकांनी विनाकारण घाबरुन जाऊ नये व सामाजिक सुरक्षिततेचे नियम कडकपणे पाळावेत असे आवाहन ग्रामपंचायतीने केले आहे. परिते गावासह भोगावतीच्या बाजारपेठेतील सव व्यवहार उद्या रविवारपासून मंगळवारपर्यंत सलग तीन दिवस बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.