होमपेज › Kolhapur › ‘स्वप्नवत कमाई’ची तरुणांना चटक

‘स्वप्नवत कमाई’ची तरुणांना चटक

Published On: Apr 29 2018 2:08AM | Last Updated: Apr 29 2018 12:42AMकोल्हापूर : गौरव डोंगरे

आयपीएल स्पर्धेतील सामन्यांवर बेटिंग घेणार्‍या 24 जणांना चार दिवसांपूर्वीच कोल्हापूर पोलिसांनी अटक केली. शाहूपुरीतील दोन ठिकाणी बेटिंग गोळा करणार्‍यांवर कारवाई करण्यात आली. यासोबतच छुप्या पद्धतीने ऑनलाईन बेटिंगचे फॅडही फोफावले असून अनेक तरुणांना झटपट पैशाची चटक यामुळे लागल्याचे दिसत आहे. सामना सुरू होण्यापूर्वी संघ निवडून त्या संघाची कामगिरी संबंधिताला पैसा मिळवून देते, अशी ‘ड्रिम‘ संकल्पना या बेटिंगमागे आहे. 

ऑनलाईन बेटिंगच्या या प्रकारात आपले अकाऊंट तयार करून ‘इंट्री फी’ भरावी लागते. ही फी अगदी 50 रुपयांपासून ते 500 रुपयांपर्यंत आकारली जाते. एकाचवेळी अनेकजण फी भरत असल्याने लाखांच्या घरात पैसे वेबसाईटद्वारे जमा होतात. सामना सुरू होण्याआधी अकरा जणांना संघ निवडला जातो आणि मग सुरू होतो ‘स्वप्नवत कमाईचा‘ प्रवास. 

या अकरा खेळाडूंनी केलेल्या कामगिरीवर संबंधिताच्या खात्यावर बक्षिसाची रक्कम जमा होते. नव्याने खेळणार्‍यास ही लिंक सहज उपलब्ध होत नाही. ही दुसर्‍याकडून घेतल्यास रेफरन्स कोड म्हणून 100 रुपयांचे बक्षीस देण्याचे आमिष दाखविण्यात येते. सध्या कोल्हापुरातील अनेक जण या माध्यमातून झटपट आणि विनाश्रम पैसा कमविण्याचे ‘ड्रिम’ पाहताना दिसत आहेत. याद्वारे काहींनी पैसे मिळत असल्याचे उघडपणे सांगितले असले तरी पुढे याच तरुणांना बेटिंगच्या मायाजालमध्ये ओढण्याचे हे कारस्थान दिसून येते. 

अँड्रॉईड मोबाईलमुळे प्रत्येकाच्या खिशात जगाची माहिती समावली जाते. आता कोणीही जगात कुठेही घडणार्‍या घटनेपासून दूर नाही. एका क्लिकमध्ये ज्ञानाचे भांडार इंटरनेटच्या माध्यमातून घरबसल्या उपलब्ध होते. मात्र, ज्ञानप्राप्तीऐवजी तरुणांचा ओढा पैसे कमाईचे शॉर्टकट शोधताना दिसत आहे. यामुळे बेटिंगसारख्या प्रकारात तरुणाई आपसूकपणे ओढली जात असताना अशा वेबसाईटबाबत पोलिस प्रशासनाने निर्णय घेण्याची आवश्यता आहे.