Wed, Aug 12, 2020 21:04होमपेज › Kolhapur › नियमित पीक कर्जफेड करणार्‍यांना ५० हजारांचा लाभ

नियमित पीक कर्जफेड करणार्‍यांना ५० हजारांचा लाभ

Last Updated: Jan 14 2020 9:54PM
कोल्हापूर : चंद्रशेखर माताडे

नियमितपणे व वेळेत कर्जफेड केलेल्या शेतकर्‍यांनाही लवकरच कर्जमाफी योजनेचा लाभ मिळणार आहे. नियमित कर्जफेड केलेल्या कर्जदारांनी सोसायट्यांना टाळे ठोक आंदोलन केले आहे. त्याला यश मिळणार आहे. तसा प्रस्ताव सरकारच्या विचाराधीन असून किमान 50 हजार रुपयांपर्यंत हा लाभ मिळण्याची शक्यता आहे.

कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे, सोलापूर, अहमदनगर या पट्ट्यात उसाची शेती मोठ्या प्रमाणात आहे. येथे सोसायट्या कर्ज देताना ते कर्ज साखर कारखान्याशी बांधले गेलेले असते. ऊस कारखान्याला गेल्यानंतरच्या चौदा दिवसांत जी एफआरपी रक्‍कम मिळते, त्यातून सोसायटीच्या कर्जाची रक्‍कम कर्ज खात्याला जमा करूनच उर्वरित रक्‍कम शेतकर्‍याच्या खात्यावर जमा केली जाते.

त्यामुळे शेतकर्‍यांना दिलेल्या पीक कर्जाची आपोआपच वसुली होते. कोल्हापूर जिल्हा तर पीक कर्जाच्या वसुलीत राज्यात अव्वल क्रमांकावर आहे. येथे 98 ते 99 टक्के पीक कर्जाची वसुली होते. सोसायट्या आणि जिल्हा बँकेला त्याचे श्रेय मिळते. त्यांनाही पुरस्कार मिळतो.  मात्र, कर्ज वेळेत आणि नियमितपणे फेडले नसते तर    पान 4 वर 
 आम्हालाही कर्जमाफीचा लाभ मिळाला असता, अशी भावना या शेतकर्‍यांमध्ये आहे. आम्ही वेळेत कर्ज फेडून चूक तर केली नाही ना? असा संतप्‍त सवाल कर्जफेड केलेले सामान्य शेतकरी विचारत आहेत.

यातूनच नियमित कर्जफेड करणार्‍या शेतकर्‍यांचे आंदोलन कोल्हापूर जिल्ह्यात उभे राहिले. या आंदोलकांनी आपापल्या गावातील सोसायट्यांना टाळे ठोकून आंदोलनाची सुरुवात केली. कर्ज थकविल्यानंतरच शेतकर्‍यांना त्याचा फायदा मिळणार असेल तर नियमित कर्जफेड करून काय मिळणार, असाही सवाल या शेतकर्‍यांनी आंदोलनादरम्यान बोलून दाखविला. 

टाळेठोक आंदोलनाची दखल घेऊन अनेक मंत्र्यांनीही वेळेत कर्जफेड केलेल्या शेतकर्‍यांना याचा लाभ मिळाला पाहिजे, अशी जाहीर भूमिका व्यक्‍त केली.
ज्यांचे कर्ज थकले आहे, तेथे परिस्थितीच तशी असेल, अशी उदार भूमिका घेत जो दोन लाख रुपये कर्जमाफीचा निर्णय झाला, त्याच्या निम्मा तरी लाभ आम्हाला मिळवून द्या, अशी मागणी काही शेतकर्‍यांनी केली.

सरकारही आता या मागणीवर सकारात्मक विचार करीत आहे. नियमितपणे व वेळेत कर्जफेड केलेल्या शेतकर्‍यांच्या खात्यावर किमान 50 हजार रुपये तरी जमा करावेत, असा प्रस्ताव सरकारच्या विचाराधीन असल्याचे खात्रीलायक सूत्रांनी सांगितले.

अन्यथा जिल्हा बँक अडचणीत

कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत झालेल्या बैठकीत नियमित व वेळेत कर्जफेड केलेल्या शेतकर्‍यांना कर्जमाफी योजनेचा लाभ मिळवून देण्याची गरज आहे. तसे न केल्यास शेतकरी कर्ज थकवतील. त्यामुळे सोसायट्या अडचणीत येतील. त्याचा फटका बसून जिल्हा  बँक अडचणीत येईल, अशी भीती गटसचिवांनी व्यक्‍त केली होती.