Sun, Aug 09, 2020 11:11होमपेज › Kolhapur › बालिंगा उपसा केंद्र सुरू काही भागाला पाणी 

बालिंगा उपसा केंद्र सुरू काही भागाला पाणी 

Published On: Aug 15 2019 1:20AM | Last Updated: Aug 15 2019 1:06AM
कोल्हापूर : प्रतिनिधी

महापालिकेच्या अधिकारी-कर्मचार्‍यांनी स्मॅक व गोशिमाच्या सहकार्याने अखेर बालिंगा उपसा केंद्र सुरू केले. या उपसा केंद्रातून ए व बी वॉर्डातील काही भाग तसेच संपूर्ण सी व डी वॉर्डातील पाणी पुरवठा सुरू झाला. परंतु नागदेववाडी उपसा केंद्रालाही यातील काही भाग जोडला असल्याने हे केंद्र सुरू होईपर्यंत दिवसाआड पाणी पुरवठा केला जाणार आहे. 

शनिवारपर्यंत नागदेववाडी व पुढील आठवड्यात शिंगणापूर उपसा केंद्र दुरुस्त करून कार्यान्वित होतील. परिणामी अधिकारी - कर्मचार्‍यांनी कोल्हापूर शहरातील पाणी पुरवठा सुरळीत करण्यासाठी आता मिशन नागदेववाडी व शिंगणापूर केले जाणार आहे.

कोल्हापूर शहराला पाणी पुरवठा करणारे शिंगणापूर, बालिंगा व नागदेववाडी उपसा केंद्रे महापुराच्या पाण्याने वेढली होती. सुमारे पाच ते सहा फूट पाण्यात केंद्रातील मशिनरी होती. गेल्या दहा दिवसापासून कोल्हापूर शहरातील पाणी पुरवठा ठप्प आहे. आता पुराचे पाणी ओसरू लागले आहे. परिणामी पहिल्यांदा बालिंगा उपसा केंद्र सुरू करण्यासाठी प्रयत्न सुरू झाले. दोन दिवसानंतर बुधवारी पहाटे उपसा केंद्र सुरू करण्यात यश आले. त्यामुळे येथून उपसा करून शहरातील काही भागाला पाणी पुरवठा सुरू करण्यात आला.

बालिंगा उपसा केंद्र सुरु करण्यासाठी नगरसेवक शेखर कुसाळे यांच्या समन्वयाने सहाय्यक अभियंता (यांत्रिकी) रामदास गायकवाड, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे सहाय्यक अभियंता जयेश जाधव, शिवाजी हरेर, अरविंद यादव, अशोक मेंगाणे, स्मॅकचे दिपक परांडेकर, राजेंद्र चौगुले, अभिषेक परांडेकर, प्रमोद पाटील, राहुल पवार, विजय पाटील, लक्ष्मी इलेक्ट्रीकलचे मोहन गुरव, साई ईलेक्ट्रीकचे मारुती लोहार, हिंदुस्थान ईलेक्ट्रीकचे मुस्ताक मोमीन या सर्वांनी गेले चार रात्र आणि दिवस काम करुन मशिनरीची दुरुस्ती केली.