Wed, Sep 23, 2020 23:08होमपेज › Kolhapur › उपमहापौरांसह आजी-माजी नगरसेवकांवरील नोटिसा मागे

उपमहापौरांसह आजी-माजी नगरसेवकांवरील नोटिसा मागे

Published On: May 23 2019 1:41AM | Last Updated: May 23 2019 1:10AM
कोल्हापूर : प्रतिनिधी 

उपमहापौर भूपाल शेटे,  काँग्रेसचे नगरसेवक प्रवीण केसरकर, लाला भोसले, नगरसेविका छाया कवाळे यांचा मुलगा गणेश कवाळे, ताराराणी आघाडीच्या नगरसेविका सविता घोरपडे यांचे पती सतीश घोरपडे,माजी नगरसेवक जालंदर पोवार, शिवसेनेचा पदाधिकारी रघुनाथ टिपुगडे यांच्यासह 21 जणांवरील आज गुरुवारी मतमोजणी दिवशी प्रवेशबंदीच्या नोटिसा पोलिस प्रशासनाने सायंकाळी मागे घेतल्या आहेत. हमीपत्र न दिलेल्या 120 जणांना शुक्रवारी मध्यरात्रीपर्यंत हद्दपार करण्यात आले आहे.

पदाधिकारी, आजी-माजी नगरसेवकासह विविध संघटनांच्या कार्यकर्त्यांनी लोकसभा निवडणूक मतमोजणीच्या काळात आपणकडून कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही, याचे हमीपत्र दिल्याने प्रवेश मनाईसाठी लागू करण्यात आलेल्या नोटिसा मागे घेण्यात आल्याचे शहर पोलिस उपअधीक्षक प्रेरणा कट्टे यांनी बुधवारी पत्रकारांना सांगितले.

लोकसभेच्या निवडणूक मतमोजणी निकालानंतर कायदा व सुव्यवस्था बिघडू नये, याची दक्षता घेण्यासाठी जिल्ह्यातील 400 जणांनी दि. 22 ते 24 मे मध्यरात्री 12 वाजेपर्यंत शहर, जिल्ह्यात थांबायचे नाही, असे नोटिसीत म्हटले आहे.

त्यात कोल्हापूरचे उपमहापौर भूपाल शेटे यांच्यासह आजी, माजी नगरसेवकांनाही नोटिसा बजाविण्यात आल्याने शहरात एकच खळबळ उडाली होती. बहुतांशी आजी, माजी नगरसेवकांनी पोलिस प्रशासनाच्या या निर्णयाला न्यायालयात आव्हान देण्याचा पवित्रा घेतला होता. शिष्टमंडळाने पोलिस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांची भेट घेऊन हा प्रकार बदनामीकारक व अन्यायी असल्याचे निदर्शनास आणून दिले होते. डॉ. देशमुख यांच्या आवाहनानुसार पदाधिकार्‍यांनी सकारात्मक भूमिका घेऊन या वादावर पडदा टाकला.

मात्र, नोटिसा बजावूनही हमीपत्र न दिलेल्या 121 जणांना दि. 24 मेअखेर जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले आहे. त्यांची नावेही शहर उपअधीक्षक प्रेरणा कट्टे यांनी रात्री प्रसिद्धीस दिली आहेत. त्यामध्ये जुना राजवाडा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील सागर कदम, सुरज साखरे, तानाजी पाटील, स्वप्निल चौगुुले, अमर झाड, सागर साळोखे, सचिन कुरडे, सागर कुरडे, अमित ठिकपुर्लेकर, संतोष चांदणे, खंडू माने, सचिन गायकवाड, रावसाहेब इंगवले, दयानंद नागटिळे, ऋषिकेश इंगवले, विशाल दिंडोर्ले, रोहित पोवार, वैभव राऊत, रिंकू ऊर्फ विजय वसंतराव देसाई यांचा समावेश आहे.

लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्याच्या अंतर्गत अभिजित मोरे, प्रसाद ऊर्फ पप्पू रणदिवे, जमीर मणेर, इम्रान मुजावर, रणजित पाटील, संदीप शहाजी कांदेकर, हेमंत कांदेकर, सुजित ऊर्फ भय्या जरग, रणजित मोरस्कर, शाहरूख शिकलगार, युनूस मुजावर, अजय हत्तेकर आदी प्रमुखांचा तडीपार करण्यात आलेल्यांमध्ये समावेश आहे, असेही कट्टे यांनी यावेळी सांगितले.