Thu, Feb 27, 2020 22:45होमपेज › Kolhapur › असुरक्षित ‘लॉकअप’मुळे पोलिसांचा वाढतोय ‘बीपी’

असुरक्षित ‘लॉकअप’मुळे पोलिसांचा वाढतोय ‘बीपी’

Published On: May 19 2018 1:32AM | Last Updated: May 18 2018 10:40PMकोल्हापूर : दिलीप भिसे

जिल्ह्यातील बहुतांशी पोलिस ठाण्यांचा कारभार ब्रिटिशकालीन, सद्यस्थितीत धोकादायक इमारतीतून चालविला जातो आहे. एकेकाळी दिमाखदार, जिल्ह्याच्या सौदर्यात भर घालणार्‍या टोलेजंग वास्तूंच्या देखभालीसह डागडुजी न झाल्याने ठाण्यांच्या इमारती धोकादायक, डोकेदुखी ठरू लागल्या आहेत. 31 पोलिस ठाण्यांपैकी बहुतांशी पोलिस ठाण्यांत ‘लॉकअप’ची स्वंतत्र यंत्रणा नसल्याने गुन्हेगारांवर पाळत ठेवताना पोलिसांना तारेवरची कसरत करावी लागत आहे.

शाहूवाडी पोलिस ठाण्यातील कालबाह्य ‘लॉकअप’चे गज उचकटून कोल्हापूर, सांगली जिल्ह्यासह कर्नाटकात दहशत माजविलेल्या ‘सुरजा-गोंद्या’ टोळीतील साथिदारांनी पलायन केल्याचा प्रकार गुरुवारी मध्यरात्रीला घडला. रखवालीतून सराईतांनी धूम ठोकल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

 यंत्रणा ठरली अपयशी

‘मोका’ अंतर्गत कारवाई झालेल्या टोळीने पोलिसांना चकवा दिल्याने पोलिस ठाण्यांच्या धोकादायक ‘लॉकअप’च्या सुरक्षिततेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. ‘लॉकअप’मधून पलायनाची जिल्ह्यातील पहिली घटना नाही. 2010-2018 या काळात अनेक गंभीर गुन्ह्यांतील 17 गुन्हेगारांनी पोलिसांनाही चकवा देऊनही ‘लॉकअप’च्या सुरक्षिततेची खबरदारी घेण्यात यंत्रणा अपयशी ठरली 
आहे.

आरोपींची तोबा तोबा गर्दी...

शहरात गुन्हेगारीचा आलेख वाढत असतानाही लक्ष्मीपुरी, राजवाडा,  शाहूपुरी पोलिस ठाण्यांसाठी अद्यापही स्वतंत्र ‘लॉकअप’ची व्यवस्था नाही, त्यामुळे जेरबंद टोळ्यातील संशयितांना राजारामपुरी, करवीरच्या ‘लॉकअप’मध्ये स्थलांतर करावे लागते. एलसीबी, सीआयडी, आर्थिक गुन्हे अन्वेषणसह एसआयटी या संवेदनशील तपास पथकांनाही ‘करवीर’च्या लॉकअपचा वापर करावा लागतो 
आहे.

जीव मुठीत धरूनच...

महिलांसाठी स्वतंत्र लॉकअपची व्यवस्था नसल्याने संशयिताना मूरगूड पोलिस ठाण्यात हलविण्यात येते. करवीर विभागांतर्गत शिरोली, गोकुळ शिरगाव, इस्पुर्ली पोलिस ठाण्यांतही लॉकअपची व्यवस्था नसल्याने सराईत गुन्हेगारांना हाताळताना पोलिसांना नाकीनऊ येते. 

धरलं तर चावतंय अन् ...

जीव मुठीत धरूनच पोलिसांना कर्तव्याचे पालन करावे लागते. ही स्थिती वरिष्ठाधिकारीही नाकारत नाहीत, अन् पर्याय शोधण्यासाठी प्रयत्नही करीत नाहीत. हे पोलिसाचं दुखणं आहे. धरलं तर चावतंय आणि सोडलं तर पळतंय... अशीच काहीशी बिचार्‍यांची अवस्था झाली आहे.

‘लॉकअप’चा  तीन ठाण्यांना पत्ताच नाही !

अलीकडच्या काही काळात शहर, उपनगरात गुन्हेगारीचा टक्‍का वाढतो आहे. जुना राजवाडा, लक्ष्मीपुरी, शाहूपुरी, राजारामपुरी आणि ग्रामीणसाठी करवीर पोलिस ठाणे स्वतंत्रपणे कार्यरत आहेत. त्यापैकी राजारामपुरी, शाहूपुरी, जुना राजवाडा संवेदनशील समजण्यात येते.