Sat, Sep 26, 2020 23:10होमपेज › Kolhapur › लोकसभा निवडणुकीचे पडसाद; महापालिकेच्या राजकारणात भाजप पडणार एकाकी

भाजप-ताराराणी आघाडीत वितुष्ट

Published On: Apr 30 2019 8:44AM | Last Updated: Apr 30 2019 8:44AM
कोल्हापूर:सतीश सरीकर

लोकसभेची रणधुमाळी संपली. निकाल अद्याप लागलेला नाही. तोपर्यंत निवडणुकीचे पडसाद उमटायला सुरुवात झाली आहे. त्याचा पहिला प्रत्यय कोल्हापूर महापालिकेत आला आहे. महापालिकेच्या राजकारणात आघाडी असलेल्या ‘भाजप-ताराराणी आघाडीत बिघाडी होऊन वितुष्ट’ निर्माण झाले आहे. 

ताराराणी आघाडी पक्ष भाजपला ‘एकाकी’ पाडणार असल्याचे सांगण्यात येते. त्याला ‘कोल्हापूर उत्तर’ विधानसभा मतदारसंघातील राजकारण कारणीभूत असल्याचेही सांगण्यात येते. ऑक्टोबर 2015 मध्ये महापालिका निवडणुकीपूर्वी भाजप-ताराराणी आघाडी यांची आघाडी झाली होती. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस यांनी स्वतंत्रपणे निवडणुका लढविल्या. परंतु, भाजप-ताराराणी आघाडीयांनी एकत्रित निवडणूक लढविली.

निवडणुकीनंतर काँग्रेसचे 29, राष्ट्रवादी15, भाजप 14 व ताराराणी आघाडीचे 19 नगरसेवक झाले. सत्तेसाठी काँग्रेस राष्ट्रवादी आघाडी झाली. भाजप-ताराराणी आघाडी विरोधात बसले. तेव्हापासून महापालिकेतील प्रत्येक निवडणूक व सभागृहात भाजप-ताराराणी आघाडी प्रबळ विरोध पक्ष म्हणून हातात हात घालून काम करत आहेत. महापालिकेत काँग्रेस राष्ट्रवादीचे बहुमत असूनही केवळ ताराराणी आघाडीच्या मदतीनेच गेल्यावर्षी भाजपने स्थायी समिती सभापतिपद मिळविले होते. 

लोकसभा निवडणुकीत भाजप- ताराराणी आघाडी यांच्यात ठिणगी पडली. माजी आमदार महादेवराव महाडिक यांचा मुलगा व भाजपचे आमदार अमल महाडिक यांचे भाऊ स्वरूप महाडिक हे ताराराणी आघाडी पक्षाचे अध्यक्ष आहेत. स्वरूप यांचे चुलतभाऊ खा. धनंजय महाडिक हे काँग्रेस- लोकसभेचे उमेदवार होते. साहजिकच ताराराणी आघाडीची सर्व ताकद खा. महाडिक यांच्यासाठी पणाला लागली. भाजपचे अनेक नगरसेवक खा. महाडिक यांच्यासाठी छुप्या प्रचारात गुंतले होते. परंतु, त्यांना भाजप पदाधिकार्‍यांकडून प्रचार न करण्यासाठी प्रचंड दबाव टाकण्यात आल्याचा आरोप ताराराणी आघाडीच्या नगरसेवकांतून केला जात आहे. 

कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघावर वर्चस्व राखण्यासाठीच संबंधित नगरसेवकांवर दबाव टाकल्याचेही सांगण्यात येते. भाजपच्या काही पदाधिकार्‍यांनी ताराराणी आघाडीच्या नगरसेवकांनाही प्रचारासापासून रोखण्याचा प्रयत्न केल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळेच भाजप-ताराराणी आघाडीत दुरावा निर्माण होत गेला. आता महापालिकेत भाजपची ताकद त्यांची ते दाखवू देत, असे म्हणून ताराराणी आघाडी स्वतंत्रपणे राहण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ऑक्टोबरमध्ये होणार्‍या विधानसभा निवडणुकीपर्यंत कदाचित आघाडी तुटेलही अशी चर्चा नगरसेवकांत सुरू आहे. लोकसभा निवडणुकीचा निकाल काहीही झाला तरी महापालिकेसह कोल्हापूर जिल्ह्यातील राजकीय समीकरणे बदलणार आहेत, हेच यावरून स्पष्ट होते.
==============================
पहिल्यांदाच स्वतंत्र पार्टी मिटिंग

महापालिका सभागृह अस्तित्वात आल्यापासून भाजप-ताराराणी आघाडी यांच्या पार्टी मिटिंग एकत्रितच होतात. दोन्ही पक्षांच्या वतीने सर्वच नगरसेवकांना एकत्रित निमंत्रण दिले जात होते. अनेकवेळा पार्टी मिटिंगला भाजपच्या वतीने पालकमंत्री चंद्रकांत पाटील, आ. अमल महाडिक व ताराराणी आघाडीतर्फे स्वरूप महाडिक, सत्यजित कदम यांच्यासह इतर उपस्थित राहत होते.

मंगळवारी होणारी पार्टी मिटिंग मात्र पहिल्यांदाच स्वतंत्रपणे होत आहे. त्याची निमंत्रणेही ताराराणी आघाडी गटनेता सत्यजित कदम व भाजप गटनेता विजय सूर्यवंशी यांनी वेगवेगळी काढली आहेत. लोकसभेवरूनच भाजप-ताराराणी आघाडी यांच्यात बिनसलं असल्याचे नगरसेवकांनी सांगितले.