Sun, Jul 12, 2020 18:16होमपेज › Kolhapur › महापौरपदासाठी भाजपची ‘टाईट फिल्डिंग’

महापौरपदासाठी भाजपची ‘टाईट फिल्डिंग’

Published On: Apr 17 2018 1:53AM | Last Updated: Apr 16 2018 11:14PMकोल्हापूर : सतीश सरीकर  

जिल्हा परिषदेवर मित्रपक्षांच्या साथीने भाजप-ताराराणी आघाडीची सत्ता आहे. जिल्ह्यातील काही नगरपालिका, ग्रामपंचायतींवरही भाजप-ताराराणीचे वर्चस्व आहे. परंतु, कोल्हापूर महापालिका मात्र भाजपच्या ताब्यात नाही. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या मनात ही ‘सल’ आहे. त्यामुळेच वारंवार ते काहीही ‘चमत्कार’ करा आणि महापालिकेत भाजपची सत्ता आणा, असे म्हणतात. पुढील महिन्यात महापौरपदाची निवडणूक असल्याने त्यासाठीच भाजप-ताराराणी आघाडीने ‘टाईट फिल्डिंग’ लावली आहे.

काँग्रेसमधून सौ. शोभा बोंद्रे यांचे नाव महापौरपदासाठी निश्‍चित आहे. भाजपकडून सौ. जयश्री जाधव या निवडणूक रिंगणात उतरणार असल्याचे स्पष्ट आहे. भाजप-ताराराणी आघाडीने काँग्रेस-राष्ट्रवादीतील ‘असंतुष्ट’ फुटीर नगरसेवकांना ‘गळ’ टाकायला सुरुवात केली आहे. महापौरपदाच्या निवडीनंतर थेट महापालिकेत ‘सत्तांतर’ घडवायचे, यासाठी भाजप-ताराराणी आघाडीचे प्रयत्न सुरू असल्याचे सांगण्यात येते.  नुकत्याच झालेल्या स्थायी समिती सभापतिपदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे दोन नगरसेवक फोडून भाजपने आपला सभापती केला आहे. साहजिकच, भाजपचा आत्मविश्‍वास वाढला असल्याने महापौरपदाच्या निवडणुकीसाठी कंबर कसली आहे. काँग्रेसनेही आतापासूनच एकही नगरसेवक भाजप-ताराराणी आघाडीच्या संपर्कात येणार नाही, याची खबरदारी घ्यायला सुरुवात केली आहे. 

सतेज पाटील यांच्याकडून व्यूहरचना

महापालिकेत काँग्रेस-राष्ट्रवादीची सत्ता असली, तरी राष्ट्रवादीचे नेते आमदार हसन मुश्रीफ हे महापालिकेच्या राजकारणात तितकेसे सक्रिय नाहीत. त्याचाच ‘फटका’ स्थायी समिती सभापतिपदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादीला बसल्याचे बोलले जाते. महापौरपदाची निवडणूक लक्षात घेऊन काँग्रेस नेते आमदार सतेज पाटील यांनी तेव्हापासूनच ‘व्यूहरचना’ आखायला सुरुवात केली. फुटणार नाहीत; पण ‘असंतुष्ट’ असलेल्या नगरसेवकांना पदाची माळ गळ्यात घालून ‘अडकवून’ ठेवले आहे. तसेच काँग्रेस-राष्ट्रवादीची ‘मोट’ बांधली असून, शिवसेनेची सोबत कायम ठेवली आहे. मागील वर्षी स्थायी सभापतिपदाच्या निवडणुकीत गैरहजर राहिलेल्या सौ. रिना कांबळे याही आता काँग्रेसमध्ये पूर्वीप्रमाणेच कार्यरत झाल्या आहेत. कोणत्याही परिस्थितीत ‘रिस्क’ नको म्हणून काँग्रेसकडून सर्व ती खबरदारी घेतली जात आहे. 

राष्ट्रवादीला खिंडार पडल्यास भाजपलाही पाडण्याचे प्रयत्न
 

सद्यस्थितीत सत्तेत असलेल्या राष्ट्रवादीला महापालिकेत कोणी ‘वाली’ नसल्याची स्थिती आहे. स्थायी समिती सभापतीपदाच्या निवडणूकीतील पराभवानंतर काही नगरसेवक महापालिकेकडे फिरकत नसल्याचे वास्तव आहे. स्थायी निवडणूकीत विरोधी मतदान केलेले अजिंक्य चव्हाण व अफजल पिरजादे यांच्यावर अपात्रतेसाठी कारवाईची मागणी विभागीय आयुक्तांकडे करण्यात आली आहे. साहजिकच ते राष्ट्रवादीसोबत राहणार नाहीत. तसेच काँग्रेसच्या उमेदवाराला मतदान करणार नाहीत. राष्ट्रवादीत आणखी काही ‘नाराज’ नगरसेवक असून त्यांच्यासाठी भाजप-ताराराणी आघाडीकडून फिल्डींग लावली जात आहे. त्यामुळे राष्ट्रवादीला ‘खिंडार’ पडण्याची शक्यता आहे. मात्र भाजप-ताराराणी आघाडीतही नाराज नगरसेवक आहेत. विविध कारणावरून त्यांच्यात नाराजी आहे. राष्ट्रवादीला खिंडार पडण्याची शक्यता झाल्यास काँग्रेसकडून भाजप-ताराराणी आघाडीमधील नाराजांना ‘हेरून’ त्यांना आपल्याकडे ओढण्याची शक्यता आहे. मते आपल्या पारड्यात पाडण्यासाठी राजकीय पक्षांकडून ‘वाट्टेल ते’ केले जाईल, अशी चर्चा आहे. 

Tags : Kolhapur, BJP,  tight, fielding,  post,  Mayor