Sat, Feb 29, 2020 11:46होमपेज › Kolhapur › चंदगड आयडियल मतदारसंघ म्हणून विकसित करण्याचे भाजपकडून प्रयत्न

चंदगड आयडियल मतदारसंघ म्हणून विकसित करण्याचे भाजपकडून प्रयत्न

Published On: Sep 24 2019 1:38AM | Last Updated: Sep 24 2019 1:38AM
कोल्हापूर : डी. बी. चव्हाण 
चंदगड हा सधन तालुका आहे; पण औद्योगिकद‍ृष्ट्या कमकुवत आहे. येथील साखर कारखानदारी कोलमडली आहे. शेतीमालास योग्य भाव मिळत नाही. युवकांना रोजगार नाही. अशा या तालुक्याचा आणि मतदार संघाचा विकास करण्याच्या द‍ृष्टीने भारतीय जनता पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांच्या बैठकीत हा मतदार संघ आयडियल मॉडेल म्हणून पुढे आणण्याचा विचार सुरू आहे. त्यानुसार या निवडणुकीत राजकारणविरहित पण प्रशासकीय अनुभव असलेल्या उमेदवाराची चाचपणी भाजपने सुरू केली आहे. पालकमंत्री चंद्रकांत पाटील आणि केंद्रीय पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचे स्वीय सहायक प्रकाश बेलवाडे यांच्या नावाची या मतदारसंघातून चर्चा सुरू आहे. 

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपने ‘बेंगळूर दक्षिण’ मतदारसंघात तेजस्वी सूर्या हा युवा चेहरा देऊन वेगळा प्रयोग केला.  त्याच धर्तीवर चंदगडमधून भाजपतर्फे प्रकाश बेलवाडे  यांच्या  नावाची जोरदार चर्चा सुरू आहे. 

सध्या या मतदार संघातून रमेश रेडेकर, भरमू पाटील, गोपाळराव पाटील, शिवाजी पाटील, अशोक चराटी, अ‍ॅड. हेमंत कोलेकर इच्छुक असून त्यांनी पक्षाकडे मुलाखती देण्याचे सोपस्कर पूर्ण केले आहेत.  याचबरोबर   डॉ. नंदिनी बाभूळकर यांनीही निवडणूक लढविण्याची इच्छा व्यक्‍त केली आहे;  पण त्या कोणत्या पक्षाकडून निवडणूक लढविणार हे स्पष्ट झालेले नाही. त्यामुळे पक्षांच्या नेतृत्वापुढे येथील इच्छुकांची कोंडी फोडण्याचे मोठे आव्हान निर्माण झाले आहे. 

भाजपमध्ये इच्छुक उमेदवारांची संख्या मोठी आहे. यातील एखादा उमेदवार निश्‍चित केला तर विभागनिहाय बंडाळी माजण्याची शक्यता नेत्यांना वाटत आहे. त्यामुळे सर्वांना एकत्र करून तरुण आणि  प्रशासकीय अनुभव असलेला उमेदवार या मतदार संघासाठी देण्याचे भाजपचे प्रयत्न सुरू आहेत. 

या मतदार संघातून मंत्री चंद्रकांत पाटील किंवा प्रकाश बेलवाडे यांना उमेदवारी देण्यासाठी भाजप आग्रही आहे. बेलवाडे यांनी या मतदार संघातील काही गावांमध्ये भाजपच्या वतीने निधी आणून विकास कामे केली आहेत. पण त्यांनी निवडणूक लढविण्याची इच्छा व्यक्‍त केलेली नाही. मात्र, पक्षाने आदेश दिल्यास ते निवडणुकीस तयार होतील, असे सुत्रांनी सांगितले.

बेलवाडे संघ स्वयंसेवक

प्रकाश बेलवाडे हे वडकशिवाले (ता. आजरा) येथील आहेत. ते गेली 14 वर्षे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक आहेत. संघामध्ये त्यांनी आजवर विविध जबाबदार्‍या यशस्वीरीत्या पार पाडल्या आहेत. ते उच्चशिक्षित असून सध्या ते केंद्रीय पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचे स्वीय सहायक आहेत.