घोडेबाजार, गुंडगिरी हाच राष्ट्रवादीचा ‘करेक्ट कार्यक्रम’

Last Updated: Feb 28 2021 6:32AM
Responsive image
कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा

सांगली महापालिकेच्या महापौर आणि  उपमहापौर निवडणुकीत घोडेबाजार, नगरसेवकांची पळवापळवी, गुंडगिरी झाली. काहींचे गुन्हे काढून घेण्याचे आमिष दाखविण्यात आले. त्यामुळे भाजपचे काही नगरसेवक बाजूला गेले. त्याला राष्ट्रवादी ‘करेक्ट कार्यक्रम’ म्हणत आहे; मात्र नागरिकच त्यांना करेक्ट उत्तर देतील, अशी टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली. भाजपमधून फुटलेल्या नगरसेवकांवर कारवाई अटळ आहे, असेही त्यांनी सांगितले. 

पाटील हे शनिवारी कोल्हापुरात पत्रकारांशी बोलत होते. पाटील म्हणाले, सांगली महापालिकेत भाजपकडे स्पष्ट बहुमत आहे. महापौर निवडणुकीच्या अनुषंगाने मी सांगलीत बैठकीसाठी गेलो होतो. त्यावेळी भाजपचे सर्व नगरसेवक उपस्थित होते. महापौर निवडीसंदर्भात चर्चा झाली. जेवणही एकत्रित केले. त्यानंतर हा सर्व प्रकार घडला. 

महापौर निवडणुकीत घोडेबाजार झाला. आमिषे दाखविण्यात आली. नगरसेवकांच्या नातेवाईकांना भेटू दिले नाही. नगरसेवक पळवून नेण्याचे प्रकार घडले. काहींना गुन्हे काढून घेण्याचे आमिष दाखविण्यात आाले. या सर्व प्रकारांची माहिती घेतली आहे. चौकशी केली आहे. अशा प्रकारांमुळे तीव्र प्रतिक्रिया व्यक्त झाल्या असत्या. मोर्चे निघाले असते. मात्र आम्ही कार्यकर्त्यांना सांगितले की त्यांना जे करायचे आहे ते करू द्या. नागरिकच त्यांना उत्तर देतील. जे नगरसेवक पक्षापासून बाजुला गेले आहेत, त्यांच्यावर पक्षाकडून कारवाई केली जाईल. संबंधित नगरसेवकांना लवकरच कारणे दाखवा नोटीसा पाठवल्या जातील, असेही पाटील यांनी सांगितले. 

भाजपच्या फुटीर 6 नगरसेवकांना सोमवारी नोटीस

भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष दीपक शिंदे म्हणाले, महापौर निवडणुकीत भाजपचे 6 व सहयोगी 1 नगरसेवक फुटले. भाजपच्या 6 पैकी 4 नगरसेवकांनी भाजपविरोधी मतदान केले, तर 2 नगरसेवक मतदानाला आले नाहीत. त्यांच्यावर अपात्रता कारवाईच्या हालचाली जोरात सुरू आहेत. भाजपच्या फुटीर सर्व 6 नगरसेवकांना सोमवारी कारणे दाखवा नोटीस बजावली जाणार आहे. कारवाई निश्चितपणे होईल. प्रदेश भाजपनेही हा प्रकार अतिशय गांभिर्याने घेतला आहे.