Wed, Sep 23, 2020 21:47होमपेज › Kolhapur › सत्ता केंद्रे ताब्यात घेण्यासाठी महाडिकांचा भाजपला फायदा

सत्ता केंद्रे ताब्यात घेण्यासाठी महाडिकांचा भाजपला फायदा

Published On: Sep 03 2019 1:54AM | Last Updated: Sep 03 2019 2:03AM
कोल्हापूर : प्रतिनिधी

कोल्हापूर जिल्ह्यातील बडे राजकीय प्रस्थ असलेले महाडिक कुटुंबीय रविवारी भाजपमध्ये वास्तव्याला गेले. याचा फायदा जसा महाडिकांना होणार तसाच तो भाजपलाही होणार आहे. कारण आगामी विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून रचलेली ही चाल नाही तर जिल्ह्याची जी खरी आर्थिक आणि राजकीय ताकद आहे त्या संस्थांवर कब्जा करण्यासाठी महाडिकांचा भाजपला उपयोग होणार आहे. मग ती जिल्हा बँक असेल, कोल्हापूर महापालिका असेल, जिल्हा परिषद वा बाजार समिती  असेल.

महाडिक घराण्याचे राजकीय स्थान निर्माण करणार्‍या महादेवराव महाडिक यांची जिल्ह्यात राजकीय ताकद आहे. थोडीफार असेल, पण प्रत्येक तालुक्यात आपल्याला मानणारा राजकीय गट तयार करण्यात महादेवराव महाडिक यांनी लक्ष केंद्रित केले होते. त्याचा फायदा त्यांना झाला. प्रत्येक तालुक्यात महाडिक गटाची ताकद आहे; ती कोठे कमी असेल किंवा कोठे जास्त असेल, पण ती आहे हे महाडिकांचे राजकीय विरोधकही मान्य करतात. 

याच राजकीय ताकदीचा त्यांना फायदा होत आला आहे. महाडिकांनी कोणतीही राजकीय भूमिका घेतली तरी त्यांच्याबरोबर त्यांचा हा गट वाटचाल करायला तयार असतो, ही राजकीय ताकद त्यांनी तयार केली आहे. ‘गोकुळ’वर तर वर्षानुवषेर्र्र्  महाडिक यांचीच सत्ता राहिली आहे. त्यांच्याबरोबर या सत्तेत ज्येष्ठ काँग्रेस नेते पी. एन. पाटील असले तरी याच गोकुळच्या संचालक मंडळात भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष बाबा देसाई यांना कसे स्थान मिळाले याची चर्चा आहेच. आमदारकी नको, पण गोकुळमध्ये संचालक करा, अशी आग्रही भूमिका घेणार्‍या या गोकुळच्या सत्तेत भाजपला स्थान मिळाले आहे. गोकुळचे नेटवर्क संपूर्ण जिल्हाभर आहे. त्याचा राजकीय फायदा उठविता येतो. 

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत महाडिकांचे पुतणे व तत्कालीन खासदार धनंजय महाडिक यांना राष्ट्रवादीच्या तिकिटावर पराभव पत्करावा लागला. राष्ट्रवादी व काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी विशेषत: प्रमुख नेत्यांनी आपल्याला पराभूत केल्याची भावना महाडिक यांची आहे. यातूनच आता नवा राजकीय प्रवास त्यांनी सुरू केला आहे. अर्थात महाडिक यांना युती नवी नाही. कारण 1995 साली राज्यात युतीचे सरकार आले तेव्हा पश्‍चिम महाराष्ट्रातील काँग्रेस संपविण्याची भाषा महादेवराव महाडिक यांनी केली होती. आता त्यांच्या या घोषणेला मूर्त स्वरूप येणार का? याचे उत्तर येणारा काळच देणार आहे. आता नव्याने राजकीय मांडणी सुरू होणार आहे. तसेच राजकीय सूडनाट्याचा प्रवासही सुरू होणार आहे. राजकारण हा नेहमीच हिशेब चुकता करण्याचा खेळ असतो. तो आता पुन्हा सुरू होणार आहे. चित व पट यासाठी नव्याने पटमांडणी होणार आहे.

प्रत्येक तालुक्यात काही ना काही राजकीय ताकद असणार्‍या महाडिक गटाची ताकद आता भाजपला उपयोगात येणार आहे. कोल्हापूर दक्षिण, इचलकरंजी, चंदगड आणि कागल हे चार मतदारसंघ वगळता इतर सहा मतदारसंघांत शिवनसेनेचे आमदार आहेत. कोल्हापूर दक्षिण व इचलकरंजीला अनुक्रमे अमल महाडिक व सुरेश हाळवणकर हे भाजपचे आमदार आहेत. तर कागल व चंदगडला राष्ट्रवादीचे अनुक्रमे हसन मुश्रीफ आणि संध्यादेवी कुपेकर हे राष्ट्रवादीचे आमदार आहेत. आता या चार मतदारसंघांत भाजप लढणार अशी प्राथमिक चर्चा आहे. अर्थात मुलाखती घेताना त्या सर्व दहाही मतदार संघांत घेतल्या जातील आणि त्या त्या ठिकाणची पक्ष संघटना मजबूत केली जाईल. या मजबुतीला महाडिक गटाचा आता आधार मिळणार आहे. 

दक्षिणला काँग्रेसचे नेते सतेज पाटील आणि कागलला राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आ. हसन मुश्रीफ यांना भाजपने टार्गेट केले आहे. धनंजय महाडिक यांच्या पराभवानंतर त्यांच्याही मनात या दोघांविषयी सल आहे. आता नव्या पटमांडणीत महाडिकांचा भाजप पुरेपूर वापर करून घेणार हे स्पष्ट आहे. अर्थात महाडिक ही गोकुळसह आपल्या कुटुंबाच्या ताब्यातील  सर्व संस्थांच्या हितरक्षणाची हमी भाजपकडून घेतल्याशिवाय सोडणार नाहीत आणि आपली ताकदही वापरणार नाहीत, हेही तेवढेच सत्य आहे.

चंदगडला संध्यादेवी कुपेकर आणि त्यांच्या कन्या डॉ. नंदिनी बाभुळकर राष्ट्रवादीसेाबत राहणार का? यावर तेथील गणितं अवलंबून आहेत. बाबासाहेब कुपेकर हे राष्ट्रवादीच्या संस्थापकांपैकी एक असले तरी आता पद्मसिंह पाटील यांचे सुपुत्रच भाजपात गेले, तेथे कुपेकर कुटुंब तरी एकनिष्ठता दाखवतील का, हा प्रश्‍न आहे. या सार्‍या राजकीय खेळीत पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी चंदगड, गडहिंग्लज, आजरा तालुक्यावर आपले लक्ष केंद्रित केले आहे. त्यामुळे भाजपची वाटचाल त्यादिशेने सुरू आहे. त्याला महाडिकांचे बळ मिळेल. कुपेकरांचे नातेसंबंध आणि तालुक्यातील ताकद याचा फायदा भाजपला होईल. 
कागलमध्ये समरजितसिंह घाटगे यांना पुणे म्हाडाचे अध्यक्षपद देऊन भाजपने राजे घराण्यात मानाचे पान दिले आहे. आता संपूर्ण राजकीय फायदा उठविण्यासाठी आणि हसन मुश्रीफ यांना शह देण्यासाठी भाजपने पुरती ताकद पणाला लावण्याचे ठरविले आहे. त्यासाठी महाडिक फॅक्टर महत्त्वाचा ठरणार आहे. कारण भाजप आणि महाडिक या दोघांसाठीही हसन मुश्रीफ हे शत्रूच आहेत. महाडिक यांच्या मनात मुश्रीफ यांच्याबद्दल असलेली कटुता राजे कितपत कॅश करणार, यावर भाजपचे यश ठरणार आहे. 

कोल्हापूर दक्षिणला ऋतुराज पाटील विरुद्ध अमल महाडिक असा जंगी सामना परत होणार आहे. या सामन्यात 2014 च्या निवडणुकीतही संपूर्ण महाडिक कुटुंब ताकदीने उतरले होते तसेच आताही उतरेल. तर इचलकरंजीत महाडिकांच्या जोडीला खा. धैर्यशील मानेही असणार आहेत. 

युती, जागा वाटप या सगळ्या चर्चेतून भाजपच्या वाट्याला चार जागा असे गृहीत धरून त्याचबरोबर युती झाली नाही तर सर्व दहा जागा लढवाव्या लागतील हे गृहीत धरून भाजपच्या मुलाखती होणार आहे. त्यातून भाजपच्या मागे महाडिक गटाची ताकद, गोकुळची ताकद, युवा शक्‍ती आणि भागीरथी महिला व्यासपीठाची शक्‍ती भाजपला मिळेल. 

कोण कुणाला देणार मात

काँग्रेसमध्ये प्रदेश उपाध्यक्ष पी. एन. पाटील, जिल्हाध्यक्ष प्रकाश आवाडे, जिल्ह्यातील एकमेव काँग्रेसचे आमदार सतेज पाटील, माजी मंत्री जयवंतराव आवळे हे प्रमुख नेते आहेत तर राष्ट्रवादी काँग्रेसकडे हसन मुश्रीफ, के. पी. पाटील, ए. वाय. पाटील, व्ही. बी. पाटील असे प्रमुख नेते आहेत. हे सर्व नेते जसे महाडिकांना ओळखून आहेत तसेच महाडिक देखील या सर्वांना ओळखून आहेत. त्यामुळे राजकीय संघर्षात कोण कुणाला कशी मात देणार यावर जिल्ह्याचा राजकीय नकाशा ठरणार आहे.