Sun, Jul 05, 2020 03:33होमपेज › Kolhapur › सरकार फसवणूक करणारे : अशोक चव्हाण

सरकार फसवणूक करणारे : अशोक चव्हाण

Published On: Dec 02 2017 1:08AM | Last Updated: Dec 02 2017 1:08AM

बुकमार्क करा

कोल्हापूर : प्रतिनिधी

गेल्या तीन वर्षांत भाजप सरकारने मराठा, मुस्लिम व धनगर आरक्षणाचा प्रश्‍न लटकत ठेवला आहे. लोकांना आमिष व खोटी आश्‍वासने देऊन फसवणूक करण्याचे काम केले आहे. त्यामुळे फडणवीस सरकार हे फसणवीस सरकार आहे, अशी घणाघाती टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी शुक्रवारी येथे केली.

शहर जिल्हा काँग्रेसच्या वतीने राजोपाध्येनगर येथे आयोजित काँगे्रस पक्षाच्या मेळाव्यात ते बोलत होते. खा. चव्हाण म्हणाले, राज्य व जिल्ह्यातील चित्र बदलत आहे. नोटा बंदी व बेरोजगारी विषय लावून धरल्याने महाराष्ट्रात नुकत्याच झालेल्या निवडणुकीत नांदेड, परभणी, मालेगाव, भिवंडीत यश संपादन करता आले. केंद्र व राज्य सरकारचा अजेंडा वेगळा आहे. वर्षाला दोन कोटी नोकर्‍या देण्याची घोषणा केली, प्रत्यक्षात नोटा बंदीने घामाच्या पैशासाठी दोन महिने रांगेत उभे रहावे लागले. विजय मल्ल्यासारखा उद्योगपती बँकेचे नऊ हजार कोटी रुपये बुडवून पळून गेला. मग काळा पैसा कुठे गेला, हा प्रश्‍न सरकारला विचारण्याची गरज निर्माण झाली आहे.

सरकार ऑफलाईन

ते म्हणाले, 34 हजार कोटींची कर्जमाफीची घोषणा केली. सामान्य शेतकर्‍यांच्या खात्यात अद्याप पैसा जमा झाला नाही.  कापूस, सोयाबीन व कर्जमाफीसाठी शेतकर्‍यांना ऑनलाईन अर्ज भरण्यास सांगण्यात आले. परंतु, गावात वीज, इंटरनेटची सुविधा सरकार उपलब्ध करून देऊ शकले नाही. भाजप- सेनेला सरकार चालविता येत नाही. हे सरकार ऑफलाईन झाले असून त्यांना जागा दाखविण्याची वेळ आली आहे.

परिवर्तनाची लाट येईल

भाजपची देशाच्या इतिहासात नोंद नाही. फक्‍त हाफ पँटची फूल पँट तेवढी झाली आहे. राज्य सरकारने तीन वर्षांत गरिबीऐवजी गरिबांना हटविण्याचे काम केले असून त्यांचा अजेंडा श्रीमंतांसाठी राहिला आहे. सरकारने महाराष्ट्रातील मनरेगाच्या कामाचा पैसा कमी केला आहे. विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्ती बंद केल्या आहेत. एस.सी. व एस.टी. प्रवर्गाचे अनुदान व जिल्हा नियोजन अनुदानास 40 टक्के कट लावला आहे. महाराष्ट्राचा इतिहास बदलण्यासाठी 2019 साली होणारी निवडणूक आव्हान समजून काँग्रेसचे सरकार आणण्यासाठी प्रत्येकाला मेहनत घ्यावी लागणार आहे. नांदेड व कोल्हापुरातील पेटलेली ही क्रांतीची मशाल राज्यभर परिवर्तनाची लाट आणेल व काँग्रसेची पुन्हा सत्ता येईल, असा आशावाद खा. चव्हाण यांनी व्यक्‍त केला.

भाजपमध्ये जाणार्‍यांनी इतिहास पहावा : आ. कदम

आ. कदम म्हणाले, लोक सत्तारूढ पक्षातच का सहभागी होतात, त्याची दोन कारणे आहेत, एक म्हणजे मंत्र्यांकडून संरक्षण मिळावे आणि कोणत्या तरी मंडळावर जाण्याची संधी मिळेल, अशी अपेक्षा असते. माणिक पाटील-चुयेकर आपल्याला सांगून भाजपमध्ये गेला; पण गेल्या तीन वर्षांत त्याला झुलवत ठेवण्याचे काम भाजपवाल्यांनी केले आहे. त्यामुळे भाजपमध्ये प्रवेश करणार्‍यांनी अगोदर आजवर गेलेल्यांचा इतिहास तपासून पहा आणि मगच निर्णय घ्या.

आ. कदमांमुळे काँग्रेसला मनपात यश : आ. सतेज पाटील

आ. सतेज पाटील म्हणाले, महापालिकेच्या निवडणुकीपूर्वी देशात व राज्यात भाजपची सत्ता होती. त्यावेळी एकप्रकारे सत्तेची त्सुनामीच होती, अशा परिस्थितीत महापालिकेची निवडणूक जाहीर झाली. या निवडणुकीला सामोरे जात असताना आ. पतंगराव कदम यांनी डळमळीत न राहता, आरपारची लढाई करण्यासाठी रोखठोकची भूमिका घेतली. ज्यांना काँग्रेस पक्षातून निवडणूक लढवावयाची असेल, त्यांनी पक्षातील नेत्यांची भूमिका समजून घेतली पाहिजे, असे नेत्यांना ठणकावून सांगितले. यामुळे कोल्हापूर मनपात यश मिळवू शकलो. महापालिकेला लागलेली कीड बाजूला करू शकलो. जिल्हा परिषदेमध्येही काँग्रेसची सत्ता येऊ शकते, त्यासाठी आ. कदम यांनी लक्ष घातल्यास तेही शक्य होईल.

नांदेडच्या विजयाने भाजपमध्ये जाणारे थांबले

आ. पाटील म्हणाले, निवडणुकीपूर्वी भाजपने मोठी आश्‍वासने दिली होती. सत्तेवर आल्यानंतर भाजपकडून त्या आश्‍वासनांची पूर्तता होईल, अशी जनतेला अपेक्षा होती, त्यामुळे अनेक लोक भाजपमध्ये प्रवेश करत होते. पालकमंत्री चंद्रकांत पाटील हे प्रत्येकाला भाजपमध्ये प्रवेश करणार का, अशी विचारणा करत होते; पण नांदेड, परभणी, भिवंडी महापालिकेत काँग्रेस पक्षाने मिळवलेले अफाट यश पाहून भाजपमध्ये प्रवेश करणारे थांबले आहेत. कारण भाजपकडून प्रवेश करणार्‍यांना न्याय मिळत नाही, असे दिसते आहे. प्रवेश करणार्‍यांपैकी अनेकांचा एक पाय भाजपमध्ये व एक पाय बाहेर, अशी परिस्थिती जिल्ह्यात आहे. 

आश्‍वासने देऊन फसविण्याचे काम : पी. एन.

भाजप सरकारने गेल्या तीन वर्षांत काहीच केले नाही. नोटा बंदी, जीएसटी लागू करणे या बाबीतून देशातील जनतेला कसलाही फायदा झालेला नाही, असे जिल्हाध्यक्ष पी. एन. पाटील म्हणाले. यावेळी सरलाताई पाटील यांनी विचार मांडले. प्रास्ताविक नगरसेवक शारंगधर देशमुख यांनी केले. आभार माजी नगरसेवक सचिन चव्हाण यांनी मानले.