Thu, Aug 06, 2020 03:50होमपेज › Kolhapur › शिवरायांचे विचार संपवण्याचे भाजपचे षड्यंत्र

शिवरायांचे विचार संपवण्याचे भाजपचे षड्यंत्र

Published On: Sep 12 2019 1:48AM | Last Updated: Sep 12 2019 1:26AM

कोल्हापूर : काँग्रेस कमिटीच्या सभागृहात बुधवारी कार्यकर्त्यांसमोर बोलताना नूतन जिल्हाध्यक्ष आ. सतेज पाटील. समोर उपस्थित कार्यकर्ते.(छाया : पप्पू अत्तार)कोल्हापूर : प्रतिनिधी 
छत्रपती शिवरायांच्या पराक्रमी इतिहासाचा वारसा असणार्‍या गडकिल्ल्यांवर हॉटेल-रिसॉर्टसाठी राज्य सरकारने परवानगी दिली आहे. हे गड-किल्‍ले पर्यटनस्थळ म्हणून विकसित केले, तर या वास्तूंच्या इतिहासाऐवजी फक्‍त पर्यटनाचीच चर्चा होईल. हा प्रकार  छत्रपती शिवरायांचा इतिहास पुसण्याचा कुटिल डाव आहे.  छत्रपती शिवरायांचे विचार संपवण्याचे हे भाजपचे  षड्यंत्र असल्याचा आरोप काँग्रेसचे नूतन जिल्हाध्यक्ष आ. सतेज पाटील यांनी बुधवारी काँग्रेस कमिटी कार्यालयात केला. 

आ. पाटील यांनी  जिल्हाध्यक्ष पदाचा कार्यभार काँग्रेस कमिटीत येऊन स्वीकारला. यावेळी त्यांचे कार्यकर्त्यांनी जल्‍लोषी स्वागत केले. यानंतर झालेल्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात आ. पाटील बोलत होते. महापुराच्या आपत्तीमुळे आ. पाटील यांनी हार-पुष्पगुच्छ स्वीकारले नाहीत. कार्यकर्त्यांनी वह्या देऊन त्यांचा सत्कार केला. काँग्रेस कमिटीत आ. पाटील येताच कार्यकर्त्यांनी त्यांना उचलून सभागृहात आणले.   

 आ. पाटील म्हणाले, मी चौदा वर्षे आमदार आहे. पक्षाने मला आमदार, मंत्री केले. त्यामुळे संकटाच्या काळात पक्षासोबत राहिलेच पाहिजे, ही माझी भूमिका आहे. 15 वर्षे आघाडीच्या सरकारमध्ये काही उणिवा राहिल्या असणार. त्यामुळे जनतेने आम्हाला घरी बसवले; पण आता भाजप-शिवसेना सरकारचे पाच वर्षे जनतेने गुण पाहिले आहेत. काँग्रेस पक्ष संपलेला नाही. दुर्दैवाने जिल्ह्यातील काही मंडळींनी पक्ष सोडला आहे; पण आता कोणताही नेता पक्ष सोडणार नाही.  पक्षासमोर आव्हान आहे; परंतु निकराने लढाई करणार आहे. 

भाजपकडून आमच्यात भांडणे लावून गट पाडण्याचे प्रयत्न सुरू आहेत. अडचणी येतील. संकटे दिसतील; पण तुम्ही अजिबात घाबरू नका. आशा सोडू नका. जनतेनेही या सरकारचा  कडेलोट करण्याची भूमिका घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले.  

अ‍ॅड. गुलाबराव घोरपडे, नगरसेवक शशांक बावचकर, सरलाताई पाटील, हिंदुराव चौगले यांनी मनोगत व्यक्‍त केले. दरम्यान, प्रदेश उपाध्यक्ष पी. एन. पाटील, माजी खासदार जयवंतराव आवळे हे पूर्वनियोजित कार्यक्रमामुळे उपस्थित नसल्याचे माजी नगरसेवक सचिन चव्हाण यांनी स्पष्ट केले. 

जिल्हा बँकेच्या संचालिका उदयानी साळुंखे, शहराध्यक्ष प्रल्हाद चव्हाण, ऋतुराज पाटील, राजू  आवळे,  उपमहापौर भूपाल शेटे, माजी आमदार संजीवनीदेवी गायकवाड, स्थायी समिती सभापती शारंगधर देशमुख, यशवंत हप्पे, कुरुंदवाडचे नगराध्यक्ष जयराम पाटील, अ‍ॅड. सुरेश कुर्‍हाडे, महिला जिल्हाध्यक्षा सुप्रिया साळोखे, शहराध्यक्षा संध्या घोटणे, एस. के. माळी आदींसह  तालुकाध्यक्ष,  पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. नगरसेवक तौफिक मुल्‍लाणी यांनी प्रास्ताविक केले. 

मी काम करणारा औताचा बैल

मी काम करणारा औताचा बैल आहे. नांगरटीपासून सर्व मशागतीसाठी माझा वापर करून घ्या. मशागत चांगली केल्यावर पीकसुद्धा जोमदार येईल, असे आ. पाटील यांनी सांगताच टाळ्यांचा कडकडाट झाला. कार्यकर्त्यांनी आणि नेत्यांनी आत-बाहेर असे काही करू नये. हा माझा, तो त्याचा, असे काही होणार नाही. जो काँग्रेसचे चिन्ह निष्ठेने घेईल, तो आमचा असणार आहे. त्यामुळे इतरांची उणीदुणी काढण्यापेक्षा पक्षासाठी काम करावे, असे आवाहनही त्यांनी केले.

आमच्यात ढोल बडवणारे कमी

काँग्रसकडे ढोल बडवणारे कमी आहेत. कमी बोलणारी मंडळी असल्याने आमच्या कामाचे मार्केटिंग होत नाही. फक्‍त उपमहापौर भूपाल शेटे सोडले तर सगळे कमी बोलत असल्याचे आ. पाटील यांनी स्पष्ट केले.

‘गोकुळ’चे संचालक राजेश पाटील उपस्थित

चंदगडचे ‘गोकुळ’चे संचालक राजेश पाटील आजच्या या मेळाव्याला उपस्थित होते. त्यांच्या उपस्थितीची चर्चा कार्यकर्त्यांत होती.