Thu, Feb 27, 2020 16:08होमपेज › Kolhapur › भाजप-ताराराणी आघाडीचा सभात्याग

भाजप-ताराराणी आघाडीचा सभात्याग

Published On: May 01 2019 1:39AM | Last Updated: Apr 30 2019 11:06PM
कोल्हापूर : प्रतिनिधी  

बजेटवर (अर्थसंकल्प) उपसूचना सर्व पक्षीय गटनेत्यांच्या स्वाक्षरीने करावी, असे मागील सभेत ठरले होते. तरीही बजेटवर सर्व पक्षीय गटनेत्यांच्या स्वाक्षरी न घेता फक्‍त सत्ताधारी काँग्रेस-राष्ट्रवादी गटनेत्यांच्याच स्वाक्षरी घेतल्या आहेत. सर्व गटनेत्यांच्या स्वाक्षरी नसतानाही प्रशासनाने ते मंजूर केलेच कसे? आम्हाला हे मान्य नाही. असली मनमानी खपवून घेणार नाही, असा आरोप करत महापालिकेतील विरोधी पक्ष भाजप-ताराराणी आघाडीने मंगळवारी महासभेतून निषेध करून सभात्याग केला. यात सुधारणा न केल्यास न्यायालयात दाद मागणार असल्याचा इशारा ताराराणी आघाडी गटनेता सत्यजित कदम व भाजप गटनेता विजय सूर्यवंशी यांनी दिला. सभेच्या अध्यक्षस्थानी महापौर सरिता मोरे होत्या. आयुक्‍त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी प्रमुख उपस्थित होते. 

विरोधकांना डावलून बजेट मंजूर...

लोकसभा निवडणुकीसाठीची आचारसंहिता शिथिल झाली आहे का? झाली नसेल तर बजेट कॉपी का दिली? असा प्रश्‍न कदम व सूर्यवंशी यांनी उपस्थित केला. नगरसचिव दिवाकर कारंडे आचारसंहिता शिथिल झाली असल्याबाबत कोणतेही आदेश आले नसल्याचे स्पष्ट केले. स्थायी समितीने मंजूर केलेले बजेट सभागृहापुढे मंजुरीसाठी ठेवण्यापूर्वी त्यात उपसूचना देण्यात आल्या होत्या. सर्व पक्षाच्या गटनेत्यांनी उपसूचना दिल्या होत्या. मात्र, नगरसेवकांना वितरित झालेल्या कॉपीवर फक्‍त काँग्रेस, राष्ट्रवादीच्या गटनेत्यांच्या स्वाक्षरी आहेत. त्यामुळे विरोधकांना डावलून बजेट मंजूर करण्याचा हा प्रयत्न निषेधार्ह आहे. त्यावर महापौर मोरे यांनी सभागृहात वाद घालू नये. आपण बैठक घेऊन मार्ग काढू, असे सांगितले. त्यानंतरही ताराराणी आघाडी व भाजपच्या नगरसेवकांनी गोंधळ घालायला सुरुवात केली. कदम यांनी महापौर व आयुक्‍तांना प्रोसिडिंगची कागदपत्रे दाखविली. अखेर दुपारी 12.45 वा. ताराराणी आघाडीने प्रशासनाचा निषेध करून सभात्याग केला. त्यानंतर 12.50 ला भाजपच्या नगरसेवकांनी सभात्याग केला.  

भाजप-ताराराणीचे नगरसेवक वेगवेगळे बसले

लोकसभा निवडणुकीमुळे भाजप-ताराराणी आघाडी यांच्यात वितुष्ट निर्माण झाले आहे. ताराराणी आघाडीचे सर्व नगरसेवक राष्ट्रवादीचे खा. धनंजय महाडिक यांच्या प्रचारात पूर्ण ताकदीनिशी 
उतरले होते. ताराराणी आघाडीचा मित्र पक्ष असलेल्या भाजपचेही काही नगरसेवक खा. महाडिक यांचा छुपा प्रचार करत होते. मात्र, भाजप पदाधिकार्‍यांनी त्या नगरसेवकांना नोटिसा बजावून रोखण्याचा प्रयत्न केला होता. त्यावरून भाजप-ताराराणी आघाडी यांच्यात दुरावा निर्माण झाला आहे. साडेतीन वर्षांत पहिल्यांदाच भाजप-ताराराणी आघाडीच्या स्वतंत्रपणे पार्टी मिटिंग झाल्या. सभागृहातही ताराराणी आघाडी व भाजपचे नगरसेवक स्वतंत्रपणे बसले होते. सभात्याग करतानाही ताराराणी आघाडी व भाजपने स्वतंत्रपणे केला.  

खा. महाडिकांचा प्रचार न केल्यानेच सभात्याग : महापौर

भाजप-ताराराणी आघाडीच्यावतीने झालेला सभात्याग हा राजकीय हेतून असल्याचा आरोप महापौर मोरे व माजी स्थायी समिती सभापती नंदकुमार मोरे यांनी केला. यापूर्वीही  महापौरांचा काहीही दोष नसताना भाजप-ताराराणी आघाडीने सभात्याग केला होता. आताही सभात्याग करण्यामागे लोकसभा निवडणूकीचे राजकारण आहे. लोकसभा निवडणूकीत खा. महाडीक यांचा आम्ही प्रचार केला नसल्याने त्याचा राग मनात धरूनच ताराराणी आघाडीने सभात्याग केल्याचेही मोरे यांनी पत्रकारांना सांगितले. तसेच ताराराणी आघाडी गटनेता सत्यजित कदम हे काँग्रेसचे स्विकृत नगरसेवक तौफीक मुल्लाणी, राष्ट्रवादीचे मुरलीधर जाधव यांना निधी का दिला अशी विचारणा करत आहे. कदम यांना हा अधिकार कुणी दिला? निधी कुणाला द्यायचा हा महापौरांचा अधिकार असल्याचेही मोरे यांनी सांगितले. 

स्विपिंग मशिनच्या माध्यमातून मनपावर दरोडा

कोल्हापूर ः प्रतिनिधी 

कोल्हापूर शहरातील रस्त्यांची स्विपिंग मशिनद्वारे स्वच्छता केली जात असल्याचे भासविले जात आहे. प्रत्यक्षात फक्‍त रस्त्यावरून मशिन फिरवून ठेकेदार बिल उचलत आहे. मशिनद्वारे कसलीही स्वच्छता केली जात नसून संबंधित ठेकेदार महापालिकेची फसवणूक करत आहे. स्विपिंग मशिनच्या माध्यमातून महापालिकेच्या तिजोरीवर दरोडा टाकला जात आहे, असा आरोप महासभेत मंगळवारी करण्यात आला. सभेच्या अध्यक्षस्थानी महापौर सरिता मोरे होत्या. आयुक्‍त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी प्रमुख उपस्थित होते. 

ठेकेदाराकडून फसवणूक...

कोल्हापूर शहरातील रस्त्यांची स्वच्छता करण्यासाठी खासगी ठेकेदाराला काम देण्यात आले आहे. संबंधित ठेकेदाराने दोन स्विपिंग मशिनद्वारे रस्त्यांची सफाई करायची आहे. 
त्यासाठी 520 रु. प्रतिकिलोमीटर प्रमाणे दररोज किमान 70 कि. मी. चे पैसे द्यायचे आहेत. दिवसाला 36 हजार 400 व महिन्याला 10 लाख 92 हजार द्यावे लागतात. आतापर्यंत ठेकेदाराने 51 लाख रु. बील उचलले आहे. परंतू प्रत्यक्षात स्विपींग मशिनच्या नावाखाली ठेकेदार कामगारांकडून स्वच्छता करून घेत आहे. अशाप्रकारे ठेकेदार महापालिकेची फसवणूक करत आहे, असा आरोप उपमहापौर भूपाल शेटे यांनी केला. 

न केलेल्या स्वच्छतेच्या बीलासाठी रक्कम... 

आयआरबी कंपनीच्या वतीने 49 कि. मी. व नगरोत्थान योजनेतून 39 कि. मी. लांबीचे रस्ते करण्यात आले. त्या रस्त्यांची दैनंदिन स्वच्छता करण्यासाठी दोन स्विपिंग मशिन भाड्याने घेण्याचा महापालिकेने निर्णय घेतला होता. दोन वर्षे दोन स्विपिंग मशिनद्वारे शहरातील रस्त्यांची साफसफाई संबंधित ठेकेदाराने करायची आहे. रोज किमान 70 कि. मी. बिल द्यावे लागणार आहे. त्यापेक्षा जास्त काम झाल्यास त्याचेही बिल द्यावे लागणार आहे. मशिन नादुरुस्त झाल्यास 5 हजार दंड आणि रोज 70 कि. मी. पेक्षा अंतर कमी झाल्यास साफसफाई न झालेल्या रस्त्यांसाठी प्रतिकिलोमीटर 100 रु. दंड वसूल करावा. रस्ते, दुभाजक व बाजूची पदपथावरील दैनंदिन स्वच्छतेच्या कामाचा दर्जा उच्च प्रतीचा असावा. उणीव आढळल्यास रोज 500 रु. दंड करावा. दोन्ही मशिनवर दोन चालक व 20 कामगार उपलब्ध असणे बंधनकारक; अन्यथा प्रतिकामगार दररोज 300 रु. दंड आकारून तो बिलातून वसूल करावा, अशा अटी आहेत. करारातील बहुतांश अटींचा भंग करूनही ठेकेदाराकडून दंड घेण्याऐवजी त्याच्यावर बिनकामाच्या बीलाची बरसात केली आहे, असा आरोपही शेटे यांनी केला. 

भांडवली मूल्यावरच घरफाळा...

प्रवीण केसरकर यांनी मुंबईत भांडवली मूल्यावर आधारीत घरफाळा घेतला जात होता. परंतू भांडवली मूल्यावर कर वसूल करू नये, असे आदेश उच्च न्यायालयाने दिले आहेत. कोल्हापूरात घरफाळा वसुली कशी होणार? अशी विचारणा केली. कर निर्धारक व संग्राहक दिवाकर कारंडे यांनी भांडवली मूल्यावर घरफाळा लागू झाल्यावर राज्यात मुंबई, कोल्हापूर व नांदेड महापालिकेने त्यानुसार घरफाळा वसुली केली. न्यायालयाने महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमासंदर्भात आदेश दिलेला नाही. मुंबई महापालिकेने केलेल्या नियमावलीवर निर्णय दिला आहे. त्यामुळे विधी विभागाच्या अभिप्रायानुसार कोल्हापूरात भांडवली मूल्यानुसारच घरफाळा आकारणी होत आहे. 

भूपाल शेटे-विजय पाटील यांच्यात वादावादी

उपमहापौर शेटे यांनी सभेत मुख्य आरोग्य निरीक्षक डॉ. विजय पाटील यांच्यावर स्विपींग मशिनसह कत्तलखाना व इतर विषयावरून गंभीर आरोप केले. त्यानंतर डॉ. पाटील यांनीही त्याच त्वेषाने उत्तर द्यायला सुरूवात केली. मात्र त्यांचा आवाज वाढत गेल्याने प्राथमिक शिक्षण मंडळ सभापती अशोक जाधव यांनी त्यावर तीव्र आक्षेप घेतला. नगरसेवक व पदाधिकार्यांशी बोलताना अधिकार्यांनी खालच्या आवाजात बोलावे, असे सुनावले. त्यानंतरही विविध प्रश्‍नावरून शेटे व पाटील यांच्यात जोरदार वादावादी झाली. 

रिंगरोडची कामे कधी पूर्ण होणार?

अश्‍विनी रामाने यांनी हॉकी स्टेडीयम ते कळंबा कारागृहपर्यंतच्या रस्त्याचे काम कधी पूर्ण करणार? अशी विचारणा केली. प्रशासनाच्यातवीने जागा संपादनाचे काम सुरू आहे. लवकरच काम पूर्ण होईल, असे सांगण्यात आले. रिना कांबळे यांनी फुलेवाडी रिंगरोडचे काम कधी पूर्ण होणार? असा प्रश्‍न उपस्थित केला. प्रशासनाच्यावतीन निविदा प्रक्रिया सुरू असून अंतिम टप्यात असल्याचे सांगण्यात आले. शोभा कवाळे यांनी शहरातील पॅचवर्क पावसाळ्यापूर्वी पूर्ण करा, अशी सूचना केली. दरम्यान, सभागृहात फक्त नगरसेवकच बोलतात. नगरसेविकांना बोलू दिले जात नाही. फक्त कोरम पूर्ण करण्यासाठीच नगरसेविकांचा वापर केला जातो, असा आरोप करत नगरसेविका सभागृहातून बाहेर पडत होत्या. परंतू महापौर मोरे यांनी पुढील सभेपासून नगरसेविकांना बोलण्यासाठी प्रथम संधी दिली जाईल, अशी ग्वाही दिली.  

आयआरबीची इमारत आय.टी. कंपनीला द्या...

जयश्री चव्हाण यांनी 2018-19 या आर्थिक वर्षात तब्बल 130 कोटींची तूट आली असून ती कशी भरून काढणार? असा प्रश्‍न उपस्थित केला. आर्थिक स्त्रोत निर्माण करण्यासाठी महापालिकेने आयआरबी कंपनीला दिलेल्या जागेवरील टेंबलाईवाडी येथील इमारत आय. टी. कंपनीला द्यावे, अशी सूचना केली. या इमारतीजवळून राष्ट्रीय महामार्ग, रेल्वे स्टेशन, विमानतळ जवळ असल्याने चांगला प्रतिसाद मिळेल. तसेच पडून असलेल्या इमारतीमधून महापालिकेला चांगल्या प्रकारे भाडे मिळू शकेल, असेही त्यांनी सांगितले.  

२८ लाखांची झाडे वाळत आहेत - जाधव

मुरलीधर जाधव यांनी अमृत योजनेतंर्गत गेल्या वर्षी शहरात ठिकठिकाणी वृक्षारोपण करण्यात आल्याचे सांगुन सद्यस्थितीत माती व पाण्याशिवाय ही झाडे वाळत असल्याकडे लक्ष वेधले. त्यामुळे वृक्षारोपणासाठी राजारामपुरी, टाकाळा परिसरात केलेला 28 लाखांचा खर्च वाया जात असल्याचे सांगितले. शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत यांनी पाहणी करून योग्य ती कार्यवाही करू, अशी ग्वाही दिली.