Mon, Nov 30, 2020 12:25होमपेज › Kolhapur › मुंबई, पुण्याचा दूधपुरवठा रोखण्याचा प्रयत्न

मुंबई, पुण्याचा दूधपुरवठा रोखण्याचा प्रयत्न

Last Updated: Sep 18 2020 1:20AM
कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा

पूर्वलक्षी प्रभावाने मराठा आरक्षण जाहीर करा, प्रस्तावित पोलिस भरती थांबवा आदी प्रमुख मागण्यांसाठी सकल मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी गुरुवारी ‘गोकुळ’चा मुंबई-पुण्याला जाणारा दूधपुरवठा रोखण्याचा प्रयत्न केला. आंदोलनकर्त्यांना गोकुळ शिरगाव येथील दूध संघाच्या कार्यालयात प्रवेश करण्यास पोलिसांनी परवानगी नाकारली. त्यामुळे आंदोलनकर्त्यांनी प्रवेशद्वारात ठिय्या मारत शासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.गोकुळ शिरगाव एमआयडीसी  येथील ‘गोकुळ’च्या प्रक्रिया केंद्रातून मुंबई - पुण्याकडे जाणारे दुधाचे टँकर अडवण्याचा इशारा सकल मराठा समाजाने दिला होता. यापार्श्‍वभूमीवर  सकाळी सातपासूनच  मोठा पोलिस फौजफाटा तैनात  होता. पोलिसांच्या उपस्थितीत रात्रीच सुमारे 35 टँकर मुंबई-पुण्याकडे लागणारे दूध ‘गोकुळ’ने रवाना केले होते. 

दरम्यान, सकाळी साडेनऊच्या सुमारास मुख्य चौकातून आंदोलक  भगवे झेंडे घेऊन घोषणा देत संघाच्या कार्यालयाकडे आले. पोलिसांनी प्रवेशद्वारावर कडे केले होते. मुख्य गेट बंद  होते. पोलिसांनी आंदोलकांना प्रवेशद्वारातच रोखत संघाच्या कार्यालयात जाण्यास परवानगी नाकारली. त्यानंतर कार्यकर्त्यांनी  दारातच ठिय्या मारला. आरक्षणाची मागणी करीत जोरदार घोषणा दिल्या. राज्य सरकारच्या धोरणांचा निषेध केला.

मराठा समाजाला न्यायालयात टिकणारे आरक्षण द्या, साडेबारा हजार पोलिसांची भरती प्रक्रिया त्वरित थांबवा, आदी प्रमुख मागण्यांसाठी यानंतर जिल्ह्यातील विविध दूध संघाच्या दारात आंदोलन करणार असल्याची घोषणा कार्यकर्त्यांनी केली. पुणे-मुंबईला जाणारे दूधपुरवठा रोखून सरकारचे मराठा आरक्षण मागणीकडे यापुढेही लक्ष वेधत राहू. गनिमीकाव्याने मराठा समाज आंदोलन करत राहील, असेही आंदोलकांनी यावेळी स्पष्ट केले. 

अर्धा तासाच्या आंदोलनानंतर पोलिस उपअधीक्षक डॉ. प्रशांत अमृतकर यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतले. गोकुळ शिरगाव पोलिस ठाण्यात आणले. दुपारी सोडून दिले. या आंदोलनात सचिन तोडकर, दिलीप पाटील, स्वप्निल पार्टे, सचिन खांडेकर, प्रतिराज लाड, अजिंक्य पाटील, शुभम गिरी, नितीन देसाई, उत्तम पोवार, रवींद्र मुदगी, लखन पाटील, उदय प्रभावळे, राजेंद्र चव्हाण, आदी कार्यकर्ते सहभागी झाले.

सकल मराठा समाजाच्या मागण्या

न्यायालयात टिकणारे मराठा आरक्षण जाहीर करा, जाहीर करताना ते पूर्वलक्षी प्रभावाने द्या, शिक्षण आणि नोकरीतील मराठा समाजाचा कोटा कायम ठेवा, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळासाठी कायद्यात बदल करून कर्ज देण्याचे स्वतंत्ररीत्या स्वतंत्र अधिकार द्या, तसेच महामंडळासाठी पाचशे कोटी रुपये निधीची तरतूद करा. सारथी संस्थेचे सक्षमीकरण करा, आरक्षणाला स्थगिती मिळाल्याने मराठा विद्यार्थ्यांचे प्रवेश शुल्क सरकारने भरावे.