Mon, Jul 13, 2020 07:22होमपेज › Kolhapur › जूनअखेरही पाण्याची चिंता नाही

जूनअखेरही पाण्याची चिंता नाही

Published On: May 07 2018 2:02AM | Last Updated: May 07 2018 1:22AMराशिवडे : प्रवीण ढोणे

संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यामध्ये तापमानाने 38 अंशांचा पारा ओलांडला असून, अंगाची लाही-लाही होत आहे. वाढत्या तापमानामुळे अनेक ठिकाणी पाणीटंचाई जाणवत आहे. राधानगरी, काळम्मावाडी, तुळशी व तिलारी धरणांतील पाणीसाठ्याची स्थिती समाधानकारक आहे. त्यामुळे हा पाणीसाठा जूनअखेरपर्यंत पुरविण्याच्या द‍ृष्टीने नियोजन करण्यात आले आहे. 

संपूर्ण जिल्ह्याला साधारणत: दूधगंगा (काळम्मावाडी), राधानगरी, तुळशी (धामोड), तर तिलारी (धामणे) या चार प्रमुख धरणांतून पाणीपुरवठा होतो. राधानगरीचे पाणी भोगावतीतून पंचगंगेकडे, तर दूधगंगेचे पाणी दूधगंगा नदीतून, तुळशीचे पाणी तुळशी नदीतून पंचगंगेत मिसळते. साधारणत:, या तिन्ही नद्या शेकडो गावांची तहान भागवत पुढे सरकतात. संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्याची तहान या धरणांतील पाण्यावरच शमविली जाते. 

तिलारी धरण वगळता अन्य तीन धरणांतील पाणीसाठा गतवर्षीच्या तुलनेत जास्त असल्याने जिल्ह्याला पाण्याची कमतरता भासणार नाही. जूनअखेर व्यवस्थित पाणी पुरेल, या पद्धतीने नियोजन करण्यात आल्याने पाणी-पाणी म्हणण्याची वेळ येणार नाही, हे मात्र नक्‍की असले, तरी पाण्याचा अपव्यय होणार नाही, याचीही काळजी घेणे महत्त्वाचे आहे.

दि. 6 मे 2018 अखेर जिल्ह्यातील प्रमुख धरणांचा पाणीसाठा, तर कंसात गतवर्षी याच तारखेला असणारा साठा...

तुळशी : 49.52 टक्के   (47.93. टक्के), तिलारी (धामणे) - 15.76 टक्के (42.19 टक्के), दूधगंगा (काळम्मावाडी) - 32.10 टक्के (25.74 टक्के), राधानगरी - 38.83 टक्के (17.65 टक्के).