Fri, Sep 18, 2020 19:54होमपेज › Kolhapur › ३२५५ प्रकल्प सरासरी ४६.८९ टक्के भरले

३२५५ प्रकल्प सरासरी ४६.८९ टक्के भरले

Published On: Jul 27 2018 1:25AM | Last Updated: Jul 26 2018 11:48PMराशिवडे : प्रवीण ढोणे

संततधार पावसामुळे अवघ्या महिनाभरातच राज्यातील मोठे, मध्यम, लघु प्रकल्प भरू लागले आहेत. या प्रकल्पामध्ये आजअखेर 46.89 टक्के पाणीसाठा झाला आहे. गतवर्षी हा साठा 41.71 टक्के इतका होता. 

राज्यातील पुणे विभागातील 561 मोठे, लघु, मध्यम प्रकल्पामध्ये सर्वाधिक म्हणजे 12705 द. ल. घ. मी. पाणीसाठा झाला आहे. हे प्रकल्प 63.08 टक्के भरले आहेत. तर पुणे विभागातील राधानगरी, काळम्मावाडी, तुळशी, तिलारी प्रकल्पाच्या पाणीसाठ्याची टक्केवारी सर्वाधिक आहे. त्यामुळे कोल्हापूर विभागात पाणीसाठा मोठ्या प्रमाणात झाला आहे.

गतवर्षीपेक्षा यावर्षी पावसाने लवकरच चांगली हजेरी लावली. राज्यातील मोठे, मध्यम, लघु प्रकल्पांमध्ये साधारणत: 15 ते 35 टक्के पाणीसाठा शिल्लक असतानाच पावसाने हजेरी लावली. त्यामुळे गतवर्षीच्या पाणीसाठ्याच्या तुलनेत हे प्रकल्प 6 टक्के  लवकर भरले आहेत. मराठवाड्यातील 725 प्रकल्पांमध्ये सध्या सर्वात कमी म्हणजे 19.52 टक्के  पाणीसाठा झाला असून गतवर्षीच्या पाणीसाठ्याच्या तुलनेत मराठवाड्यातील प्रकल्प दीड टक्‍का आधीच भरले आहेत, त्यामुळे तिथेही अपेक्षेपेक्षाही चांगला पाऊस झाला आहे हे स्पष्ट दिसत आहे. 

सर्वाधिक कोकण विभागातील प्रकल्प भरले असुन त्याची टक्केवारी 84.56 टक्के इतकी आहे. पुणे विभागामध्ये मोठे, मध्यम, लघू असे 561 प्रकल्प असुन या प्रकल्पामध्ये आजअखेर 12705 द. ल. घ. मी. म्हणजेच 63.08 टक्के  इतका पाणीसाठा झाला आहे. गतवर्षी या प्रकल्पांमध्ये 55.50 टक्के इतका पाणीसाठा झाला होता. पुणे विभागातील राधानगरी, काळम्मावाडी, तिलारी, तुळशी प्रकल्पामध्ये सर्वाधिक म्हणजे अनुक्रमे 99.42 टक्के , 87.76 टक्के , 83.35 टक्के , 96.91 टक्के  इतका पाणीसाठा झाला आहे. गतवर्षीच्या पाणीसाठ्याच्या तुलनेत हे प्रकल्पही लवकरच भरले आहेत. 

त्यामध्ये तिलारी प्रकल्प गतवर्षीच्या तुलनेत अंदाजे 23 टक्के आधीच भरला आहे. गतवर्षी हा प्रकल्प आजच्या दिवशी 49.10 टक्के भरला होता. सध्या हा प्रकल्प 83.35 टक्के  भरला आहे. प्रामुख्याने पावसाचा जोर असाच कायम राहीला तर महिनाभरातच कोकण, पुणे, नाशिक विभागातील प्रकल्प ओव्हर फ्लो होण्याची शक्यता आहे.