Fri, Jul 10, 2020 02:16होमपेज › Kolhapur › अनुप... मित्रा परत ये!   मित्रांची आर्त हाक

अनुप... मित्रा परत ये!   मित्रांची आर्त हाक

Published On: Aug 02 2018 1:58AM | Last Updated: Aug 02 2018 1:04AMकोल्हापूर : विजय पाटील

अनुप चव्हाण आंतरराष्ट्रीय तलवारपट्टू... आर्किटेक्ट होण्याची स्वप्ने पाहत कॉलेजच्या पहिल्या दिवशी आनंदाने वर्गात जाऊन आला...हुशार होताच, तसाच स्वभावानेही गोड होता. चव्हाण कुटुंबीयांच्या अभिमानाचा विषय होता. मित्रांना जीव लावणारा जीवलग होता. तापाचं नुसतं कारण झालं आणि हसत-खेळत दिसणारा अठरावर्षीय अनुप सोमवारी सायंकाळी  सर्वांना सोडून निघून गेला. त्याच्या मित्रांना अजूनही पटत नाही. ते अनुपच्या वडिलांना विचारताहेत अनुप असा जाईलच कसा? वडील तानाजी चव्हाणांचं काळीजच चोरीला गेल्यासारखं झालंय. अख्ख चव्हाण कुटूंब उन्मळून पडलयं. अनुपचे मित्र ढसाढसा अश्रू ढाळताहेत...सोशल मीडियावरून अनुप मित्रा परत ये! अशी आर्त हाकही देताहेत. 

कसबा बावड्यातील तानाजी चव्हाण आणि त्यांचे कुटुंब म्हणजे सर्वसामान्यांचा आधारच.  कुणीही रात्री बारा वाजता हाक मारावी आणि चव्हाण कुटुंबाने  मदतीला धावून जावे,  असे हे कुटुंब. ही माणूसकी अनुपमध्येही ठासून भरली होती. आम्ही हाक द्यायची आणि अनुपने मदत करायची, असे वर्णन त्याचे मित्र करताहेत. वयाचा विचार केला तर अनुप तसा अगदीच नवतरुण. त्याने तीन वर्षांपासून तलवारबाजीचा सराव केला. तलवारबाजीत एवढी गती मिळवली की, मलेशियात झालेल्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेतून गोल्ड मेडल घेऊन आला. या यशामुळे  फ्रेंड सर्कलमध्ये अनुपला नवी ओळख मिळाली. त्याला सगळे ‘चॅम्प’ म्हणू लागले. जिथे जाईन तीथे गोल्डच घेऊन येणार, इतका आत्मविश्‍वासाने ओतप्रोत भरलेल्या अनुपची ‘एक्झिट’ तितकीच धक्‍कादायक आहे.

परदेशात स्पर्धा जिंकल्यावर इंग्लिश बोलायला लागते म्हणून इंग्लिश स्पिकिंग क्‍लासही तो पुढील आठवड्यात जॉईन करणार होता.   सहाफूट उंच असणार्‍या अनुपने गेल्या काही महिन्यांत जीम जॉईन करून शरीरयष्टी कमावली  होती. त्याची प्रेरणा घेऊन बावड्यातील अनेक तरुणांनी जीम जॉईन केली आहे. अनुप अभ्यासातही हुशार होता. वडील सिव्हिल इंजिनियर असल्याने त्याला लहानपणापासूनच आर्किटेक्ट होण्याची  आवड होती. बारावी सायन्स झाल्यानंतर आर्किटेक्ट अभ्यासक्रमासाठी त्याने डी. वाय. पाटील इंजिनियरिंग कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. अनुपने लहान वयातच कर्तबगारी दाखवल्याने बावड्यातील अनेक घरांत अनुपसारखा बन असे आई-वडील त्यांच्या  मुलांना सांगायचे. असा हा ‘चॅम्प’ अचानक नियतीने हिरावून नेला. त्याच्या जाण्याने त्याचे कुटुंब हादरले आहेच. मित्रांना अजूनही विश्‍वास बसत  नाही. त्यांना अजूनही वाटतयं अनुप परत येईल. अनुप नाही आहे हे चव्हाण कुटुंबीयांना काळजावर दगड ठेवून त्याच्या मित्रांना  सांगावे लागत आहे.