Wed, Aug 12, 2020 21:23होमपेज › Kolhapur › हद्दवाढविरोधी कृती समितीचा प्राधिकरणालाही विरोध

हद्दवाढविरोधी कृती समितीचा प्राधिकरणालाही विरोध

Published On: Aug 05 2018 1:29AM | Last Updated: Aug 04 2018 11:52PMकोल्हापूर : प्रतिनिधी

शहरालगतच्या 42 गावांचा समावेश करून स्थापन केलेल्या प्राधिकरणाला सरपंचांनी विरोध केल्यानंतर आता हद्दवाढविरोधी प्रस्तावित गावांमधील सर्वपक्षीय कृती समितीच्या बैठकीत हद्दवाढीला विरोध कायम ठेवत प्राधिकरणालाही विरोध करण्याचा ठराव एकमताने करण्यात आला. आ. चंद्रदीप नरके व आ. अमल महाडिक यांच्या प्रमुख उपस्थितीत शासकीय विश्रामधाम येथील राजर्षी शाहू सभागृहात ही बैठक झाली. 

आ. नरके यांनी, यापूर्वी टोल किंवा हद्दवाढीबाबत लोकांसोबतच आपण राहिलो आहे. लोकांना जे पाहिजे, तेच आपण करणार आहे. त्यामुळे या बैठकीत प्राधिकरणाला विरोध करायचा किंवा पाठिंबा द्यायचा, असा विषय आजच्या बैठकीत नाही. केवळ सर्वांची मते ऐकून घेण्यासाठी बैठक बोलावल्याचे स्पष्ट केले. 

नाथाजी पोवार म्हणाले, हद्दवाढ नको म्हटल्यानंतर प्राधिकरण पुढे आले आहे. मध्यंतरी प्राधिकरणाबाबत काही घटना घडल्याने लोकांमध्ये चर्चा सुरू आहे. त्यावर आजच्या बैठकीत सर्वांनी आपली मते मांडावीत. भगवान काटे म्हणाले, शेतकरी, सरपंच व ग्रामपंचायत सदस्य यांच्या अधिकारांवर आणि हक्कांवर गदा येणार नाही याची खात्री झाल्याशिवाय आणि शंकांचे निरसन झाल्याशिवाय प्राधिकरणाबाबत निर्णय घेतला जाणार नाही. यावर काही जण मध्येच उठून प्राधिकरण आम्हाला नकोच आहे, चर्चा कशाला करायची, असे म्हणत एकाचवेळी सगळे बोलू लागल्याने गोंधळ सुरू झाला.
आमदार नरके यांनी, सर्वांना शांत करत आपल्यात फूट आहे, असा संदेश बाहेर जाऊ नये, यासाठीच आजची बैठक आहे. त्यामुळे गोंधळ न करता प्रत्येकाला बोेलण्याची संधी दिली जाईल, असे सांगितले. सचिन चौगले म्हणाले, प्राधिकरणामुळे ग्रामपंचायतींची अवस्था शोभेच्या नवर्‍यासारखी झाली आहे. शेतकर्‍यांच्या मुळावर उठणारे प्राधिकरण आम्हाला नको. ‘भीक नको; पण कुत्रं आवर,’ असं म्हणण्याची वेळ प्राधिकरणामुळे येणार आहे. प्राधिकरणविरोधी सरपंच कृती समितीचे अध्यक्ष करवीरचे सभापती राजेंद्र सूर्यवंशी यांनी, शेतकर्‍यांना भूमिहीन करणारे आणि ग्रामपंचायतींचे अधिकार काढून घेणार्‍या प्राधिकरणाला आमचा विरोध आहे. प्राधिकरणाला स्थगिती द्यावी, तसेच ग्रामपंचायतींचे अधिकार पूर्वीप्रमाणे मिळावेत, असे ठराव करण्याची मागणीही यावेळी करण्यात आली. सुनील माने यांनी, प्राधिकरणविरोधी सरपंच कृती समिती व हद्दवाढविरोधी कृती समिती एक करावी, अशी सूचना मांडली. मात्र, त्याला विरोध करण्यात आला. शशिकांत खवरे यांनी, सरंपच कृती समिती स्वतंत्रच राहूदे, असे सांगितले.

यावेळी संदीप पाटील, अमर पाटील, दिनकर आडसूळ, शशिकांत खोत, बाबासाहेब पाटील, नारायण पोवार आदींनीही आपली मते मांडली.
बैठकीस ‘गोकुळ’चे संचालक बाबा देसाई, बाबासाहेब देवकर, तसेच प्राधिकरणमध्ये समावेश असलेल्या गावांचे सरपंच, सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.