होमपेज › Kolhapur › 'राधानगरी'चे सातही स्वयंचलित दरवाजे बंद

'राधानगरी'चे सातही स्वयंचलित दरवाजे बंद

Published On: Aug 07 2019 12:02PM | Last Updated: Aug 07 2019 11:45AM

राधानगरीराशिवडे/राधानगरी : प्रतिनिधी

गेल्या पाच दिवसापासुन सुरु असणाऱ्या धुवाँधार पावसाने उसंत घेतली आहे. राधानगरी धरण क्षेत्रामध्ये पावसाने विश्रांती घेतल्याने आज सकाळी सातही स्वयंचलित दरवाजे बंद झाले. सध्या आपत्कालिन तीन दरवाजे दोन फुटाने उचलले असून त्यातुनच फक्त पाण्याचा विसर्ग सुरु आहे. भोगावती नदीपात्रातील पुराचे पाणी सहा तासात दीड फुटाने कमी झाले आहे.

राधानगरी तालुक्यासह धरण क्षेत्रामध्ये पावसाची संततधार चार दिवसापासुन सुरु होती. त्यामुळे सातही स्वयंचलित दरवाजे खुले होऊन त्यातुन मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरु होता. पावसाचा जोर वाढल्याने पुन्हा आपत्कालिन दोन दरवाजे दोन फुटाने उचलण्यात आले होते. त्यामुळे दळणवळण व्यवस्था आणी दुरध्वनी, वीजपुरवठा खंडीत झाला आहे. संपर्क यंत्रणा बंद झाल्याने अफवांनाही पिक आले होते. 

नदीपात्रात सुमारे सतरा हजार क्युसेस प्रतिसेकंद पाण्याचा विसर्ग सुरु असल्याने पुरस्थिती बनली आहे. राधानगरी तहसिल, पोलीस वसाहत पाण्यात गेली होती. तालुक्यातील रस्ते पाण्याखाली गेले होते. कालपासुन पावसाचा जोर ओसरल्याने राधानगरी धरणाचे सातही स्वयंचलीत दरवाजे बंद झाले. सध्या आपत्कालिन दोन दरवाजे दोन फुटाने सुरु असुन पाण्याचा विसर्ग सुरु आहे. धरणातुन मोठ्या प्रमाणात होणारा पाण्याचा विसर्ग थांबल्याने पाण्याची पितळी दीड फुटाने उतरली आहे.