Sun, Sep 27, 2020 00:01होमपेज › Kolhapur › कोल्हापूर : पत्नीच्या अपघाताने संतप्‍त पतीचे रस्त्यातील खड्ड्यात झोपून आंदोलन (video)

कोल्हापूर : पत्नीच्या अपघाताने संतप्‍त पतीचे रस्त्यातील खड्ड्यात झोपून आंदोलन (video)

Last Updated: Dec 27 2019 4:19PM

खड्ड्यात झोपून आंदोलन करणारे विजय पोरेफुलेवाडी : शिवराज सावंत

रस्त्यांवर भरपूर खड्डे झालेले... चुकवून चुकवून किती चुकवायचे... नजर हटी और दुर्घटना घटी... खांडसरी परिसरात अशीच स्थिती सध्या रंकाळा-गगनबावडा मार्गाची झालेली आहे. कुणीही लक्ष द्यायला तयार नाही. गुरुवारी सकाळी 11 च्या सुमाराला फुलेवाडी चौथा बसथांबा परिसरातील रहिवासी शिल्पा पोरे या मुलगा शौर्य याच्यासह दुचाकीवरून या रस्त्यावरून जाताना एका खड्ड्यात चाक दणकून पडल्या... शिल्पा या अपघातात गंभीर जखमी झाल्या. सुदैवाने लहानग्या शौर्यचे किरकोळ दुखापतीवर निभावले.

अधिक वाचा : फायनान्स कंपनीची ११ कोटींची फसवणूक

शिल्पा यांना दवाखान्यात दाखल करण्यात आले. त्यांचे पती विजय यांना जखमांमुळे विव्हळत असलेल्या शिल्पा यांच्या वेदना असहनीय झाल्या आणि ते तडक अपघात घडला तिथे खांडसरी परिसरात धडकले. रस्त्यांवरील खड्ड्यांविरुद्ध त्यांनी शड्डू ठोकले. प्रशासनाचा धिक्‍कार केला आणि थेट रस्त्यावर आडवे झाले.

जोवर प्रशासनाला जाग येत नाही, तोवर मी इथेच झोपणार आहे आणि जोवर प्रशासन रस्त्याची दुरुस्ती करत नाही तोवर रस्त्यावरील या खड्ड्यांच्या नावाने खडे फोडत राहणार आहे, अशी भूमिका विजय पोरे यांनी घेतली. पोरे हे रस्त्याच्या मधोमध झोपलेले असल्याने वाहतूक अर्थातच ठप्प झाली होती. रस्त्यावर दोन्ही बाजूला 2 ते 3 किलोमीटरपर्यंत वाहनांची रांग लागली होती. तासभर हा गदारोळ चालला. करवीर पोलिसांनी कशीबशी पोरे यांची समजूत काढली. सुरक्षेचे कारण नमूद करून महापालिकेकडे, सार्वजनिक बांधकाम विभागाकडे आम्ही पाठपुरावा करू, असा शब्द पोरे यांना पोलिसांनी दिला. या दरम्यान योगेश दरवान, चंद्रकांत पाटील, अमर  जत्राटे, रमेश वरुटे यांनी पोलिसांना वाहतूक सुरळीत करण्यात मदत केली.

अधिक वाचा : यंदाचा डिसेंबर दहा वर्षांतील सर्वात उष्ण

आता रास्ता रोको करणार

रस्ता दुरुस्त करावा म्हणून भाजपचे अमर जत्राटे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी आयरेकर यांना निवेदन देऊन बरेच दिवस उलटले आहेत, त्याचा उपयोग झालेला नाही. आता युवा सेनेचे अजय वाडकर, शिवसेनेचे चंद्रकांत पाटील यांनी 2 दिवसांची मुदत प्रशासनाला दिलेली आहे. अन्यथा रास्ता रोको आंदोलन  करण्यात येईल, असा इशारा दिलेला आहे.
 

 "