Thu, Sep 24, 2020 05:58होमपेज › Kolhapur › ठरावांची जुळवाजुळव!

ठरावांची जुळवाजुळव!

Last Updated: Jan 17 2020 10:58PM
कोल्हापूर : प्रतिनिधी

कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघाच्या (गोकुळ) 3659 दूध संस्थांना ठराव जमा करण्यासाठी बुधवारपर्यंत (दि. 22) अंतिम मुदत आहे. दोन्ही आघाडींनी किमान दोन हजार ठराव जमा करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. मात्र, सत्ताधारी आणि विरोधी आघाडींच्या बाजूंनी ठराव जमा करताना दूध संस्था ‘वेट अँड वॉच’च्या भूमिकेत आहेत. त्यामुळे सोमवारी (दि. 20) एकत्रित ठराव जमा करून ते अंतिम क्षणी सहकार विभागाकडे जमा करण्याचे नियोजन केले आहे.

गोकुळ दूध संघाची निवडणूक एप्रिल महिन्यात होणार आहे. दरम्यान, प्रारूप मतदार याद्या तयार करण्यासाठी 3659 दूध संस्थांकडून ठराव मागविण्यात येत आहेत. गेल्या तीन आठवड्यांत सहकारी दूध संस्थांनी सहकार विभागाकडे ठराव जमा करण्यास निरुत्साह दाखविला. तर तालुकास्तरावर इच्छुकांकडून ठराव जमा करण्याचे काम सुरू आहे. सत्ताधारी आणि विरोधी आघाडींनी ठराव जमा करण्यासाठी खास माणसांची नेमणूक केली आहे. आतापर्यंत दोन हजारांपेक्षा अधिक ठराव दोन्ही आघाडींकडे जमा झाल्याचे समजते.

दरम्यान, सत्ताधारी आघाडीने शनिवारी (दि. 18) एकत्रितपणे ठराव जमा करण्याचे नियोजन केले होते. मात्र, या पूर्वनियोजित ठराव जमा करण्याचा कार्यक्रमात आता बदल केला आहे. सत्ताधारी आणि विरोधी आघाडी सोमवारी (दि. 20) ठराव जमा करणार आहेत. आघाडीच्या नेत्यांकडे तालुकावार ठराव जमा करण्याचे नियोजन आहे. सत्ताधारी आघाडीतर्फे ‘गोकुळ’च्या ताराबाई पार्क कार्यालयात, तर विरोधी आघाडीकडून अजिंक्यतारा कार्यालयात ठराव जमा करून घेतले जाण्याची शक्यता आहे. यानंतर या ठरावांची छाननी केली जाणार आहे. त्यानंतर सोईनुसार हे ठराव साहाय्यक दुग्ध निबंधक यांच्याकडे जमा केले जाणार आहेत. ‘गोकुळ’ निवडणुकीच्या निमित्ताने ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, पालकमंत्री सतेज पाटील, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील,  खा. संजय मंडलिक, आ. पी. एन. पाटील, महादेवराव महाडिक, आ. विनय कोरे, माजी खासदार धनंजय महाडिक आदी तगडे नेते मैदानात उतरले आहेत. 

वारसदारांसाठी फिल्डिंग

‘गोकुळ’च्या शिलेदारांनी वारसदारांसाठी फिल्डिंग लावल्याची चर्चा सुरू आहे. मागील आठवड्यात  ‘गोकुळ’चे ज्येष्ठ संचालक अरुण नरके यांनी निवृत्तीची घोषणा केली. त्यानंतर ‘गोकुळ’चे संस्थापक चेअरमन आनंदराव पाटील -चुयेकर यांच्या पत्नी जयश्री पाटील यांनीही ‘गोकुळ’च्या राजकारणातून निवृत्त होणार असल्याचे जाहीर केले. निवृत्ती जाहीर करत असताना दोघांनीही आपल्या मुलांना वारसदार म्हणून पुढे आणले
 आहे. 

‘गोकुळ’चे राजकारण राजकीय ईर्षेच्या टिपेला पोहोचले आहे. गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीत मागील पंचवार्षिक निवडणुकीपासून टोकाचा संघर्ष सुरू झाला आहे. गत निवडणुकीत विरोधी आघाडीने काही जागांवर बाजी मारली. तर अनेक ठिकाणी शंभर ते दीडशे मतांच्या फरकाने मात खाल्ली. ही निवडणूक संघाच्या कारभार्‍यांच्या चिंतेत वाढ करणारी अशीच ठरली. यंदाची निवडणूक दोन्ही आघाडींनी अस्तित्वाची मानली जाते. 

 चुरशीच्या ठरणार्‍या या निवडणुकीकडे राज्याचे लक्ष लागून राहिले आहे. असे असताना निवडणुकीपूर्वी अनेक जण खांदेपालट करण्याच्या प्रयत्नात आहेत. नरके आणि चुयेकर यांनी संघाच्या राजकारणातून माघार घेत, आपल्या वारसदारांना पुढे केले आहे. 

 "