Thu, Sep 24, 2020 10:45होमपेज › Kolhapur › भय इथले संपत नाही!

भय इथले संपत नाही!

Published On: Jan 30 2018 1:51AM | Last Updated: Jan 29 2018 11:24PMकोल्हापूर : विजय पाटील 

शिवाजी पुलावरील भीषण अपघाताची घटना घडून बहात्तर तास उलटले असूनही अद्याप या घटनेचे भय कायम आहे. सध्या पूल वाहतुकीसाठी बंद आहे. असे असताना पुलावर येऊन खाली खोल पाण्याकडे पाहत भीत-भीत घटनास्थळ पाहणार्‍यांची संख्या सोमवारी दिवसभर मोठी होती. स्थानिक रहिवासी अजूनही या अपघाताचे वर्णन सांगताना अस्वस्थ होतात. एकूणच भय इथले संपत नाही, अशीच स्थिती आहे. 

ट्रॅव्हलरच्या अपघातात 13 जणांचा बळी गेला. शिवाजी पुलावर घडलेली आजवरची सर्वाधिक हृदयद्रावक आणि भीषण घटना होती. पुलावरील तुटलेल्या संरक्षक कठड्याचे बांधकाम सुरू आहे. दक्षता म्हणून दुचाकी व पादचारी वगळता इतर वाहतूक त्यामुळे बंद ठेवण्यात आली आहे. सोमवारी सकाळपासून रात्री उशिरापर्यंत शेकडोजण या पुलावरून ये-जा करत होते. यातील बहुतेकजण पुलाच्या मध्ये येऊन थांबत. पुलावरून अपघात घडलेल्या ठिकाणी शून्य नजर लावून पाहत असल्याचे दिसले.

तर काहीजणांचे चेहरे पुलावरून जाताना भांबावलेले दिसून आले. पादचार्‍यांपैकी अनेकजण फक्‍त अपघाताचे ठिकाण पाहण्यासाठी सतत येत होते. पुलावरून नदीच्या खोल डोहाकडे पाहत चुकचुकत होते. जास्त वेळ थांबल्यावर बंदोबस्ताला असलेले पोलिस त्यांना हटकत होते. चला थांबू नका, असे पोलिसांनी म्हणताच, अपघात इथंच झाला काय, असे उलट विचारून पोलिसांशीच चर्चा करणार्‍यांची संख्याही मोठी दिसून आली. घटना पाहत असणार्‍या लोकांशी बोलण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी अनेकांनी अंगाचा थरकाप होत असल्याचे सांगितले. फारच दुर्दैवी प्रकार होता. हा प्रकार कसा घडला असेल, हे पाहण्यासाठी पुन्हा-पुन्हा पुलावर येत असल्याचे काहीजण म्हणाले. अपघाताची भीषण घटना घडली. 

आता बांधकाम सोडलं, तर घटनास्थळी काहीच खाणाखुणा शिल्लक नाहीत. असे असूनही हे ठिकाण पाहण्यासाठी माणसं सातत्याने येत असल्याचे पाहून पोलिसांनाही आश्‍चर्य वाटत आहे. घटना भीषणच होती. अगदी कौर्यसीमा गाठणारी. लहानग्या चिमुरड्यासह तेराजणांना या घटनेत नियतीने हिरावून नेले. या घटनेने सर्वांनाच हेलावून सोडलं. अस्वस्थ केलं. ज्यांनी हा अपघात पाहिला. त्यांच्या मनातून या घटनेची भीती अजूनही ताजी आहे.