कोल्हापूर : राजेंद्र जोशी
भारतामध्ये प्रतिवर्षी होणार्या गर्भपाताच्या घटनेविषयी दोन दिवसांपूर्वी प्रसिद्ध झालेल्या एका संशोधन अहवालाने शासकीय यंत्रणेची झोप उडविली आहे. आरोग्य विज्ञानाच्या क्षेत्रामध्ये जागतिकदृष्ट्या अतिप्रतिष्ठित समजल्या जाणार्या नियतकालिकामध्ये प्रसिद्ध झालेल्या या संशोधन अहवालात शासन आकडेवारी देत असलेल्या गर्भपाताच्या संख्येपेक्षा तब्बल वीसपटीहून अधिक गर्भपात भारतात होत असल्याचे या अहवालात नमूद करण्यात आले आहे. यामुळे विशेषतः आरोग्य विज्ञानाच्या क्षेत्रामध्ये देशात नियोजनासाठी आवश्यक अचूक आकडेवारीचा किती दुष्काळ आहे, यावर झगझगीत प्रकाश पडला आहे.
जागतिक आरोग्यविषयक प्रतिष्ठित ‘लॅन्सेट’ या नियतकालिकात सोमवारी हा अहवाल प्रसिद्ध करण्यात आला आहे. इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ पॉप्युलेशन सायन्स, लोकसंख्या परिषद, नवी दिल्ली व गटमॅशर इन्स्टिट्यूट, न्यूयॉर्क यांच्या वतीने संयुक्तरीत्या हा संशोधन प्रकल्प हाती घेण्यात आला होता. या अहवालात भारतात 2014-15 या आर्थिक वर्षामध्ये 1 कोटी 56 लाख गर्भपात भारतामध्ये झाल्याचे नमूद केले आहे. केंद्र शासनाच्या आरोग्य मंत्रालयाने हाच आकडा सात लाख असल्याचे नोंद केले होते.
भारतातील या गर्भपाताच्या घटनांमध्ये सर्वाधिक गर्भपात हे अत्याधुनिक औषधांचा वापर करून घरीच केले जात असल्याची धक्कादायक माहिती या अहवालात आहे. यामध्ये मिफेप्रिस्टोन आणि मिफेप्रिस्टोन-मिसोप्रोस्टोल संयुग या औषधांचा वापर करून हे गर्भपात केले जातात. या औषधांचा लक्षणीय वापर लक्षात घेऊन केंद्र शासनाने गेल्या दोन वर्षांत त्यावर नियंत्रण आणण्यासाठी कडक मोहीम राबविली. यातून संबंधित औषधांच्या वापराचे प्रमाण 12 टक्क्यांवरून आठ टक्क्यांवर खाली आणण्यात यश मिळाले असले, तरी हे प्रमाणही चिंताजनक आहे. कारण देशातील एकूण गर्भपातांमध्ये संबंधित औषधांचा वापर करून होणार्या गर्भपातांचे प्रमाण तब्बल 81 टक्के इतके आहे. या गर्भपाताखालोखाल शस्त्रक्रियेद्वारे होणार्या गर्भपातांचे प्रमाण 14 टक्के इतके, तर देशातील 5 टक्के गर्भपात हे अन्य मार्गाने केले जातात.
अहवालातील निरीक्षण; नवजात अर्भक मृत्यू प्रमाणात वाढ
अनपेक्षित गर्भधारणा हे सर्वात महत्त्वाचे कारण गर्भपातामागे असल्याचे आणखी एक निरीक्षण या अहवालात पुढे आले आहे. सर्वेक्षणानुसार भारतात 2014-15 सालामध्ये गर्भधारणा झालेल्यांपैकी म्हणजेच एकूण चार कोटी गर्भाधारणांमध्ये निम्म्याहून अधिक गर्भधारणा या अनपेक्षित होत्या. यामुळेच गर्भपाताचे प्रमाण एकूण गर्भधारणेच्या 30 टक्क्यांवर, तर अनपेक्षित गर्भधारणांच्या निम्म्यावर जाते आहे. संशोधन अहवालानुसार गर्भपातांच्या या घटनांमुळे नवजात अर्भक मृत्यूचे प्रमाण वाढते आहे. या पार्श्वभूमीवर विशेषतः अनपेक्षित गर्भधारणेच्या घटना टाळण्यासाठी गर्भनिरोधकांचा वापर अनिवार्य असल्याचे नमूद करताना देशात गर्भनिरोधकांचा योग्य व सुरक्षित वापर यांच्या प्राथमिक ज्ञानाचाही अभाव असल्याकडे लक्ष वेधण्यात आले आहे.