Wed, Aug 12, 2020 03:53होमपेज › Kolhapur › खासगी रुग्णालयांत अवयवांचा ‘बाजार’!

कोल्हापूर : खासगी रुग्णालयांत अवयवांचा ‘बाजार’!

Last Updated: Nov 16 2019 2:00AM
पुणे : प्रतिनिधी

पुण्यातील खासगी रुग्णालयांना अवयव प्रत्यारोपणाच्या माध्यमातून एकाच दिवसांत लाखो रुपये कमविण्याचा एक नवीनच मार्ग मिळाला आहे. किडनी, यकृत, ह्रदय प्रत्यारोपणातून रुग्णालये ‘मालामाल’ होत आहेत. या प्रत्यारोपणाचा खर्च गरीब रुग्णांना परवडणारा नसल्याने त्याचा अधिकाधिक फायदा केवळ श्रीमंत रुग्णांनाच होताना दिसून येत आहे. गरीब रुग्ण मात्र यासाठी लागणार्‍या प्रचंड खर्चामुळे त्यापासून वंचित राहत आहेत. 

ससून रुग्णालयात गेल्या आठवड्यात एका तरुण शेतकर्‍यावर यकृत प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया करण्यात आली. त्या रुग्णांच्या नातेवाइकांनी याआधी प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करण्यासाठी खासगी रुग्णालयांचे उंबरठे झिजवले. परंतु, त्यांना प्रत्यारोपणाचा 20 ते 25 लाख रुपयांचा खर्च सांगण्यात आला. हा खर्च परवडणारा नसल्याने या रुग्णाने ससून रुग्णालयात त्याची नोंदणी केली आणि अखेर त्याचे प्रत्यारोपण तेथे परवडणार्‍या दरात झाले. परंतू, सध्या अनेक रुग्ण पैशाअभावी प्रत्यारोपणाच्या प्रतीक्षेत आहेत. त्यांच्या शस्त्रक्रियेचे काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

सध्या बदललेली जीवनशैली, सकस अन्नाचा अभाव, जंक फुडचे वाढलेले प्रमाण, मधुमेहाचे वाढते प्रमाण आणि प्रदुषण यामुळे अवयवांचे निकामी होण्याचे प्रमाण वाढत आहे. दुसरीकडे वैद्यकिय क्षेत्रात तंत्रज्ञानही झपाटयाने विकसित होत आहे. दुसर्‍याच्या शरीरातील अवयव गरजू रुग्णांच्या शरीरात बसवण्याचे, असे एक प्रकारे त्याचे पुरर्रोपण करण्याचे वैद्यकिय तंत्र सध्या वैद्यकिय विश्वात विकसित झालेले आहे. मात्र, त्याचे उपचार सर्वसामान्यांच्या आवाक्यात येणे गरजेचे आहे. त्यासाठी शासनाने प्रयत्न करणे गरजेचे आहे, असे मत रुग्ण व आरोग्य क्षेत्रातील कार्यकर्ते व्यक्‍त करतात.

प्रत्यारोपण शस्त्रक्रियेला हवे ’कॅपिंग’

पुण्यातील रुग्णालयांनुसार प्रत्यारोपण शस्त्रक्रियेचा खर्च वेगवेगळा आहे. एका रुग्णालयांत हृदय प्रत्यारोपणाचा खर्च 25 लाख तर दुसर्‍या रुग्णालयांत त्याच प्रत्यारोपणासाठी 40 लाख रुपये सांगितले जातात. अशा प्रकारे प्रत्यारोपण हा एक बाजार बनला आहे. त्यामुळे शासनाने जसे स्टेंट, गुडघ्याचे इंप्लांट व औषधांवर ’कॅपिंग’ (किंमतीव नियंत्रण) केले; तसे प्रत्यारोपण शस्त्रक्रियांवर करणे गरजेचे आहे. त्याचबरोबर शस्त्रक्रियेच्या खर्च सर्व ठिकाणी एक असणे, अनुदान उपलब्ध करणे, धर्मादाय रुग्णालयांचा फंड उपलब्ध करणे गरजेचे आहे. 

ससूनचे योगदान 

खासगी रुग्णालयांमध्ये सध्या यकृतासह, हृदय प्रत्यारोपण करण्यासाठी 25 ते 40 लाख रूपये आकारतात. मात्र, ससून रुग्णालयात हीच शस्त्रक्रिया माफक दरांत होते. त्यातही डॉक्टर त्यांची फी न घेता ही शस्त्रक्रिया करतात. त्यामुळे अनेक रुग्णांचे पावले सध्या यकृत प्रत्यारोपण करण्यासाठी ससूनकडे वळत आहेत. मात्र, त्यांनाही मर्यादा असल्याने हा प्रश्न बिकट बनला आहे. 

प्रत्यारोपणाचा खर्चाचा आकडा पाहून गरीब रुग्णांच्या तोंडचे पाणी पळते. हा अमाप खर्च गरीब रुग्णांच्या आवाक्याबाहेरचा आहे. प्रत्यारोपण शस्त्रक्रिया कमीत कमी खर्चात व्हाव्यात व त्यांचे दर निदान सर्व रुग्णालयांसारखे असावेत. या भरमसाठ दरांमुळे या प्रक्रियेत दलाली होण्याची शक्यता निर्माण होते.                                                                                                                                            - प्रताप यादव, आरोग्य क्षेत्रातील कार्यकर्ते