Mon, Jul 06, 2020 21:46होमपेज › Kolhapur › सावधान! तुमच्या हालचालींवर  ‘चिन्यांचा डोळा’!

सावधान! तुमच्या हालचालींवर  ‘चिन्यांचा डोळा’!

Published On: Jan 29 2018 1:40AM | Last Updated: Jan 28 2018 11:20PMकोल्हापूर : सुनील कदम

सुरक्षाविषयक साधन म्हणून आपापल्या परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याची एक क्रेझ आली आहे. अनेक शासकीय कार्यालयांसह बँका, अतिसंवेदनशील ठिकाणे, शाळा-महाविद्यालये इतकेच काय; पण अनेक छोटी-मोठी शहरे आणि त्या शहरांमधील अनेक खासगी निवासस्थानेसुद्धा सीसीटीव्ही कॅमेर्‍याच्या निगरानीत आणली गेली आहेत; पण सुरक्षितता म्हणून आपण योजलेल्या या माध्यमातून ‘चिनी ड्रॅगन’ आपल्यावर लक्ष ठेवून आहे, असे सांगितल्यास सहसा कुणाचा विश्‍वास बसणार नाही; पण ती वस्तुस्थिती आहे. चिनी बनावटीच्या सीसीटीव्ही कॅमेर्‍यांचा वापर करून चीन जागतिक पातळीवर हेरगिरी करीत असल्याचा प्रकार समोर आला आहे.

अमेरिकेतील 2001 साली ट्विन टॉवर्सवर हल्ला झाल्यानंतर युद्धपातळीवर वेगवेगळ्या सुरक्षाविषयक उपाययोजना करण्याची मोहीम सुरू करण्यात आली होती. या मोहिमेचाच एक भाग म्हणून अमेरिकेतील बहुतेक सगळी शहरे आणि सर्व शासकीय कार्यालये सीसीटीव्ही कॅमेर्‍यांच्या कक्षेत आणली गेली. इतकेच काय; पण अमेरिकेची सर्व संरक्षणविषयक सिद्धताही या सीसीटीव्ही कॅमेर्‍यांच्या कक्षेत होती. विशेष म्हणजे, हे सगळे कॅमेरे चीन सरकारची मालकी असलेल्या ‘हॅगझाऊ हाईकव्हिजन डिजिटल टेक्नॉलॉजी’ या  कंपनीच्या बनावटीचे होते. कालांतराने अमेरिकी गुप्तहेर कंपन्यांच्या लक्षात आले की, या कॅमेर्‍यांच्या माध्यमातून चीन आपल्यावर हेरगिरी करीत आहे. कारण, हे सगळे कॅमेरे इंटरनेटला जोडता येत होते आणि नेमका त्याचाच वापर करून चिनी ड्रॅगन अमेरिकेच्या हालचालींवर लक्ष ठेवून होता. ही बाब लक्षात येताच अमेरिकेने ताबडतोब देशातील या कंपनीचे सर्व सीसीटीव्ही कॅमेरे हटविले आणि या कंपनीच्या कॅमेर्‍यांच्या आयातीवर बंदी लादली. 

आपल्या देशात सध्या वापरात आणि बाजारपेठेत असलेल्या सीसीटीव्ही कॅमेर्‍यांपैकी जवळपास 80 टक्क्यांहून अधिक कॅमेरे हे चिनी बनावटीचे आहेत. त्यामुळे देशातील बहुतेक सगळ्या शासकीय कार्यालयांसह मोठ-मोठ्या बँका, संरक्षणविषयक स्थळे, मोठ-मोठी शहरे आणि वैयक्तिक वापरातील सीसीटीव्ही कॅमेरेसुद्धा चिनी बनावटीचेच असण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसे असेल तर त्याचा वापर करून चिनी ड्रॅगन आपल्या प्रत्येक हालचालीवर डोळा ठेवून असण्याची शक्यता आहे. कारण, या बाबतीतील अमेरिकेचा ताजा अनुभव सगळ्या जगासमोर आलेलाच आहे. त्यामुळे हे कॅमेरे वापरताना काळजी घेण्याची गरज आहे. 

चिनी ड्रॅगनचा कावा!

गेल्या काही दिवसांपासून चीनच्या भारतविरोधी कुरापतींमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. डोकलामची घटना हे त्याचे मोठे उदाहरण आहे. चिनी बनावटीच्या कॅमेर्‍यांच्या माध्यमातून चिनी ड्रॅगनने भारतातील अनेक ठिकाणी डोळा ठेवला असावा आणि त्या माध्यमातून मिळालेल्या माहितीमुळेच चिनी ड्रॅगन भारतविरोधी फुत्कारत असावा, अशी कुणाला शंका आल्यास नवल वाटू नये. कारण, याबाबतीत आजपावेतो चिनी लौकिक सगळ्या जगभर पसरलेला आहे.