Fri, Feb 28, 2020 23:45होमपेज › Kolhapur › रुग्णवाहिकेतच झाल्या 970 प्रसूती!

रुग्णवाहिकेतच झाल्या 970 प्रसूती!

Published On: Jul 30 2018 1:29AM | Last Updated: Jul 30 2018 12:10AM
कोल्हापूर : एकनाथ नाईक

प्रसूतीची दिलेली तारीख कधी लांब असते किंवा त्याआधीच अचानक प्रसूतीपूर्वी वेदना येतात आणि नातेवाइकांची धावपळ सुरू होते. रुग्णालयात दाखल करण्यासाठी आता महाराष्ट्र शासनाने मोफत रुग्णवाहिकेची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. 108 दूरध्वनी क्रमांक डाईल केल्यावर काही मिनिटातच महाराष्ट्र इमर्जन्सी मेडिकल सर्व्हिसची रुग्णवाहिका डॉक्टरांच्या पथकासह दाखल होते. राज्यातील 25 हजार 768 बाळांचे जन्म ठिकाण रुग्णवाहिकाच आहे. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आजअखेर 970 बाळांचा जन्म धावत्या रुग्णवाहिकेतच झाला आहे.

राज्यातील 35 जिल्ह्यांमध्ये महाराष्ट्र इमर्जन्सी मेडिकल सर्व्हिस रुग्णांना वरदान ठरली आहे. तब्बल एका वर्षात धावत्या रुग्णवाहिकेत 25 हजार 768 बाळांचा जन्म झाला आहे. रुग्णवाहिकेत प्रसूतीदरम्यानच्या आणि नंतरच्या प्राथमिक उपचार, औषधे उपलब्ध असल्याने त्या माता आणि बाळांचे आरोग्यही चांगले आहे. आरोग्य प्रशासन माता आणि अर्भक मृृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी प्रयत्न करत आहे. जिल्ह्यातील ग्रामीण भागात याबाबत जनजागृतीदेखील सुरू आहे. गर्भवती महिलांना 108 रुग्णवाहिकेेची सेवा प्रामुख्याने मिळवून दिली जाते. अपघातासह कोणत्याही आजारी रुग्णांना रुग्णालयापर्यंत पोहोचविण्यासाठी 108 रुग्णवाहिका मोफत सेवा देत आहेत. 108 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधून नेमके ठिकाण सांगितल्यानंतर शक्य तितक्या लवकर रुग्णवाहिका पोहोचते आहे. 

रुग्णवाहिकेत प्रथमोपचार, बेसिक लाईफ सपोर्ट आणि औषधे उपलब्ध आहेत. त्यामुळे अनेक रुग्णांना जीवदान मिळाले आहे. प्रसूतीसाठीच्या सेवा असणारी रुग्णालये आजही अनेक गावांत नाहीत. दळणवळणाची व्यवस्था चांगली नसल्याने प्रसव वेदना सुरू झाल्यानंतर गर्भवतीस रुग्णालयात दाखल करेपर्यंत बराच वेळ जातो. अशावेळी गर्भवतीची प्रसूती रुग्णालयात दाखल करेपर्यंत होते. बसस्थानक, रेल्वे, एस.टी.मध्ये प्रसूती झाल्याच्या घटना घडल्या आहेत. मात्र, गेल्या काही वर्षांपासून 108 रुग्णवाहिकेची सेवा तत्पर मिळत आहे. त्यामुळे गरीब, सर्वसामान्य, मध्यमवर्गीय कुटुंबातील गर्भवतींना खासगी वाहतुकीपेक्षा 108 रुग्णवाहिकेतून प्रसूतीसाठी दाखल केले जाते. धावत्या रुग्णवाहिकेत तातडीने उपचार झाल्याने 25 हजार 768 माता व बालके सुखरूप आहेत. महाराष्ट्र इमर्जन्सी मेडिकल सर्व्हिसच्या राज्यात एकूण 937 रुग्णवाहिका आहेत. यामध्ये 233 अत्याधुनिक असून, 704 बेसिक आहेत. कोल्हापूर जिल्ह्यात 8 अत्याधुनिक, तर 28 बेसिक सुविधा असणार्‍या रुग्णवाहिका आहेत. या रुग्णवाहिका रुग्णांना वरदान ठरत आहेत.

नोंदणी जवळच्या केंद्रात 
गर्भवतींना रुग्णालयात दाखल होण्यासाठी नेले जात असताना रुग्णवाहिकेतच प्रसूती होण्याचे प्रमाण वाढत आहे. प्रत्यक्षात बाळाचा जन्म 108 रुग्णवाहिकेत झाला, तरी त्याची नोंद जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात केली जाते. जन्माची नोंद कायदेशीरदृष्ट्या महत्त्वाची असल्याने प्रसूती रुग्णवाहिकेत झाली, तरी जन्म नोंद जवळच्या आरोग्य केंद्रात केली जाते. 

जिल्हानिहाय रुग्णवाहिकेत जन्मलेल्या बाळांची संख्या अशी...

अहमदनगर 1142, अकोला 569, अमरावती 615, औरंगाबाद 1075, बीड 1046, भंडारा 217, बुलडाणा 593, चंद्रपूर 544, धुळे 940, गडचिरोली 326, गोंदिया 292, हिंगोली 426, जळगाव 766, जालना 562, कोल्हापूर 970, लातूर 806, मुंबई 585, नागपूर 716, नांदेड 753, नंदूरबार 536, नाशिक 1743, उस्मानाबाद 623, पालघर 927, परभणी 503, पुणे 2109, रायगड 380, रत्नागिरी 331, सांगली 707, सातरा 1304, सिंधुदुर्ग 161, सोलापूर 1484, ठाणे 644, वर्धा 368, वाशिम 399, यवतमाळ 606.