Sat, Sep 26, 2020 22:30होमपेज › Kolhapur › जिल्ह्यातील ८,२७० घरे अजूनही ‘अंधारात’!

जिल्ह्यातील ८,२७० घरे अजूनही ‘अंधारात’!

Published On: Jan 02 2018 1:33AM | Last Updated: Jan 01 2018 11:20PM

बुकमार्क करा
कोल्हापूर : नसिम सनदी 

जिल्ह्यातील 8 हजार 270 घरे वीज जोडणीअभावी अजूनही अंधारातच चाचपडत आहेत. केंद्र सरकारच्या सौभाग्य योजनेंतर्गत जिल्हा परिषदेने केलेल्या गावनिहाय सर्वेक्षणात ही बाब उघड झाली आहे. यात गावठाणातील 4 हजार 744 तर गावठाणाबाहेरील 3 हजार 526 घरांचा समावेश आहे. या घरांतील बीपीएल कुटुंबांना मोफत तर एपीएल कुटुंबांना 10 हफ्त्यात  500 रुपये रकमेत वीज जोडणी देण्याचे नियोजन करण्यात आले आहे. ग्रामसेवकांच्या बहिष्कारामुळे मंडल अधिकार्‍यांकडून करवून घेतलेल्या या सर्वेक्षणानुसार वीज जोडणीसाठी 1331 विजेचे पोल लागणार आहेत. 

विजेपासून कोणतेही घर वंचित राहू नये, म्हणून सप्टेंबरमध्ये प्रधानमंत्री सहज बिजली हर घर योजना सौभाग्य या नावाने कार्यान्वित करण्याचे आदेश जिल्हा परिषदेला प्राप्‍त झाले. मार्च 2019 पर्यंत सर्व घरांना वीज देण्याचे धोरण निश्‍चित करण्यात आले आहे. त्यानुसार वीज नसलेल्या गावांचे सर्वेक्षण करून ग्रामसभांची त्याला मान्यता घेऊन 30 नोव्हेंबरपर्यंत जिल्हा परिषदेकडे अंतिम यादी पाठवावी, असे आदेश मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांना काढण्यात आले होते. तथापि याच कालावधीत ग्रामपंचायत निवडणुका, मतदार यादी आदी कामांचा ताण असल्याचे सांगत ग्रामसेवकांनी हे काम करण्यास नकार देत असल्याचे पत्र 5 डिसेेंबरला जिल्हा परिषदेला दिले होते. 

मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी विभागीय आयुक्‍तांपर्यंत सचिवांकडे याबाबतीत पत्रव्यवहार करून मार्गदर्शन मागवले होते. तसेच ग्रामसेवकांना यातून वगळण्याबाबत पत्रव्यवहार केला होता; पण शासनाने 6 डिसेंबरला पत्र काढून काम नाकारणार्‍या ग्रामसेवकांवर शिस्तभंगाची कारवाई करा, असे आदेश देतानाच महावितरण व मंडल अधिकार्‍यांकडून सर्व्हे करून अंतिम याद्या डिसेंबरअखेरपर्यंत पाठवण्यास सांगितले होते. त्यानुसार जिल्हा परिषदेने मंडल अधिकार्‍यांकडून सर्व्हे करून घेत यादी तयार केली आहे. त्यानुसार जिल्ह्यात आजही 8 हजार 270 घरांमध्ये वीज नसल्याचे समोर आले आहे. आता या घरांना वीजपुरवठा सुरू करण्याचे काम हाती घेतले जाणार आहे. टप्प्याटप्प्याने मार्च 2019 पर्यंत विजेचे कनेक्शन दिले जाणार आहेत.

गावठाणातील व गावठाणाबाहेरील अशी विभागणी करण्यात आली आहे. जिल्ह्यातील सर्व गाव, वाड्या वस्त्यांवर वीज पोहोचवण्यात महावितरणाला यश आले आहे; पण गावठाणांचा विस्तार वेगाने होत असल्याने आणि घरकूल योजनांमुळे घर असणार्‍यांची संख्या वाढत असल्यानेच वीज जोडणी नसल्याचे समोर येत आहे.  आता सौभाग्य योजनेमुळे ही समस्यादेखील मिटणार आहे.