Fri, Feb 28, 2020 22:38होमपेज › Kolhapur › हातकणंगलेत 75.95 टक्के मतदान

हातकणंगलेत 75.95 टक्के मतदान

Published On: Apr 24 2019 1:38AM | Last Updated: Apr 24 2019 12:48AM
हातकणंगले : प्रतिनिधी

सर्वांचे लक्ष लागून राहिलेल्या हातकणंगले लोकसभा मतदारसंघामध्ये अटीतटीच्या निवडणुकीसाठी हातकणंगले विधानसभा मतदारसंघात अत्यंत चुरशीने 75.94 टक्के मतदान झाले.

सकाळी सुरुवातीपासूनच मतदारांचा ओघ वाढला होता. दुपारी उन्हाच्या तडाक्यामुळे थंडावलेली मतदान प्रक्रिया चारनंतर वेगात सुरू झाली. युवक-युवतींसह महिलांनी इर्ष्येने मतदान केले. निवडणूक निर्णय अधिकारी स्मिता कुलकर्णी व सुधाकर भोसले यांच्या कुशल नियोजनामुळे कुठही अनुचित प्रकार न घडता मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली.

हातकणंगले लोकसभा मतदारसंघामधे काँग्रेस, राष्ट्रवादी, स्वाभिमानी आघाडीचे उमेदवार राजू शेट्टी, भाजप-शिवसेना युतीचे उमेदवार धैर्यशिल माने, बहुजन वंचित आघाडीचे हाजी असलम सय्यद आदी प्रमुख उमेदवारांसह 17 उमेदवार निवडणूक रिंगणात उतरून आपले नशीब आजमावत आहेत. 

सकाळी 7 वाजता मतदानास सुरुवात झाली. सकाळी 11 वाजेपर्यंत 25.89 टक्के, 1 वाजेपर्यंत 42.71 टक्के, दुपारी 3 वाजेपर्यंत 53.50 टक्के तर सांयकाळी 5 वाजेपर्यंत 69 टक्के मतदारांनी मतदानाचा हक्‍क बजावला. या निवडणुकीत नवमतदारांची संख्या मोठी असल्याने त्यांनी सकाळीच उत्स्फूर्तपणे मतदान करून लोकशाहीचे आपण साक्षीदार असल्याचा पहिलाच अनुभव घेतला. बहुतांशी मतदान केंद्रांवर वृद्ध, दिव्यांग मतदारांनी वाहनातून येऊन व्हीलचेअरद्वारे मतदान केंद्रापर्यंत येऊन मतदानाचा हक्‍क बजावला. काही मतदान केंद्रांवर उन्हाच्या प्रचंड तीव्रतेमुळे व्हीव्हीपॅट मशिन बंद पडल्या. यामुळे काही काळ मतदान प्रक्रिया खोळंबली. रूकडीसह संवेदनशिल मतदारसंघात कडक पोलिस बंदोबस्त होता.

दुपारी 4 नंतर उन्हाची तीव्रता कमी झाल्यावर मतदारांनी मतदान केंद्रांवर मोठी गर्दी केली होती. काही मतदार उशिरा मतदान केंद्रावर आले. मात्र, मतदानाची वेळ संपण्यापूर्वी ते मतदान केंद्रांच्या आत आल्याने त्यांना मतदानाचा हक्‍क बजावता आला. यामुळे काही मतदान केंद्रांवर बराच वेळ मतदान प्रक्रिया सुरू होती.

अन् मतदार केंद्राचा नूरच बदलला

मतदान केंद्राच्या अंगणात सुशोभित मंडप, दुतर्फा झाडांच्या कुंड्या, सुंदर काढलली रांगोळी, जमिनीवरती अंथरलेला गालीचा आणि स्वागताकरिता उभे केलेले पुतळे यामुळे मतदान केंद्र लग्‍न मंडप असल्यासारखे जाणवत होते. याबरोबरच दिव्यांग, अपंगांसाठी ठेवलेली व्हिलचेअर्स यामुळे तालुक्यातील प्रातिनिधीक स्वरूपात उभा केलेल्या हातकणंगले, मिणचे, नागाव यासह मतदान केंद्राचा नूरच बदलला होता.