Fri, Feb 28, 2020 23:00होमपेज › Kolhapur › अंतिम आकडेवारी : कोल्हापुरात 70.70 तर हातकणंगलेत 70.28 % मतदान

जिल्ह्यात ७०.८९ टक्के

Published On: Apr 25 2019 1:44AM | Last Updated: Apr 25 2019 1:20AM
कोल्हापूर : प्रतिनिधी

कोल्हापूर व हातकणंगले या मतदार संघात सरासरी 70.49 टक्के मतदान झाले. तर कोल्हापूर जिल्ह्यातील दहा विधानसभा मतदार संघात 70.89 टक्के मतदान झाले. कोल्हापूर मतदार संघात 70.70 टक्के, तर हातकणंगलेत 70.28 टक्के मतदान झाल्याचे उपजिल्हा निवडणूक अधिकारी सतीश धुमाळ यांनी बुधवारी सांगितले. जिल्हा प्रशासनाच्या वतीने मतदानाची अंतिम आकडेवारी सायंकाळी जाहीर करण्यात आली. जिल्ह्यात गत निवडणुकीच्या तुलनेत दोन टक्के मतदान कमी झाले.

जिल्ह्यात मंगळवारी चुरशीने मतदान झाले. 2014 च्या लोकसभा निवडणुकीत जिल्ह्यात सरासरी 72 टक्के मतदान झाले होते. यावेळीही मतदानाची टक्केवारी कायम राहील, अशी अपेक्षा होती. मतदानानंतर जिल्हा प्रशासनाने प्राथमिक टप्प्यातील जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार मतदानाचा टक्‍का गतवेळेपेक्षा कमी झाल्याचे स्पष्ट होते. बुधवारी सायंकाळी मतदानाची अंतिम आकडेवारी निश्‍चित करण्यात आली. यानंतर पत्रकार परिषदेत अंतिम आकडेवारीची माहिती देण्यात आली.

कोल्हापूर मतदार संघात 18 लाख 74 हजार 345 मतदारांपैकी 13 लाख 25 हजार 174 मतदारांनी मतदानाचा हक्‍क बजावला. त्यात 6 लाख 93 हजार 592 पुरुष, तर 6 लाख 31 हजार 578 महिला, तर 4 इतर मतदारांचा समावेश होता. हातकणंगले मतदार संघात 17 लाख 72 हजार 563 मतदारांपैकी 12 लाख 45 हजार 797 मतदारांनी मतदानाचा हक्‍क बजावला. त्यात 6 लाख 57 हजार 652 पुरुष तर 5 लाख 88 हजार 127 महिला मतदारांचा समावेश होता. या मतदार संघात इचलकरंजी विधानसभा मतदार संघातील 11 सह एकूण 18 इतर मतदारांनीही मतदानाचा हक्‍क बजावला.

हातकणंगले मतदार संघात समाविष्ट असलेल्या सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर व शिराळा विधानसभा मतदार संघ वगळता जिल्ह्यातील दहा विधानसभा मतदार संघात सरासरी 70.89 टक्के मतदान झाले. या दहा मतदार संघातील एकूण 30 लाख 86 हजार 834 मतदारांपैकी 21 लाख 88 हजार 473 मतदारांनी मतदानाचा हक्‍क बजावला.

गेल्यावेळी झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या मतदानाच्या तुलनेत यावर्षी हातकणंगले विधानसभा वगळता अन्य सर्व मतदार संघात कमी मतदान झाले. हातकणंगलेत 2014 ला 72.01 टक्के मतदान झाले होते, यावेळी मात्र 75.94 टक्के मतदान झाले.

करवीर, कागल, हातकणंगलेत उच्चांकी मतदान

कोल्हापूर मतदार संघातील करवीर व कागल आणि हातकणंगले मतदार संघातील हातकणंगले विधानसभा मतदार संघात उच्चांकी मतदान झाले. या तीनही मतदार संघात 75 टक्क्यांवर मतदान झाले. करवीरमध्ये 75.42 टक्के मतदान झाले. एकूण 3 लाख 2 हजार 32 मतदारांपैकी 2 लाख 27 हजार 802 मतदारांनी मतदान केले. यामध्ये 1 लाख 23 हजार 290 पुरुष तर 1 लाख 4 हजार 512 महिला मतदारांचा समावेश आहे. या मतदार संघात तीन इतर मतदार आहेत. मात्र, त्यापैकी एकानेही मतदान केले नाही. कागलमध्ये 75.24 टक्के मतदान झाले. एकूण 3 लाख 21 हजार 284 मतदारांपैकी 2 लाख 41 हजार 749 मतदारांनी मतदानाचा हक्‍क बजावला. त्यात 1 लाख 23 हजार 937 पुरुष तर 1 लाख 17 हजार 812 महिला मतदारांचा समावेश आहे. या मतदार संघातही एकाने इतर मतदार म्हणून नोंदणी केली आहे. मात्र, त्याने मतदान केले नाही. हातकणंगले मतदार संघातील हातकणंगले विधानसभा मतदार संघात 75.94 टक्के मतदान झाले. एकूण 3 लाख 19 हजार 716 मतदारांपैकी 2 लाख 42 हजार 802 मतदारांनी मतदान केले. 1 लाख 31 हजार 188 पुरुष व 1 लाख 11 हजार 610 तर 4 इतर मतदारांचा यामध्ये समावेश होता. गत निवडणुकीत हातकणंगले लोकसभा मतदार संघात सर्वाधिक मतदान शिरोळ विधानसभा मतदार संघात झाले होते. यावेळी या मतदार संघात दोन टक्के कमी मतदान झाले.