होमपेज › Kolhapur › पूरग्रस्त मदतीसाठी केंद्राकडे 6,813 कोटींची मागणी

पूरग्रस्त मदतीसाठी केंद्राकडे 6,813 कोटींची मागणी

Published On: Aug 14 2019 12:16AM | Last Updated: Aug 14 2019 12:16AM
मुंबई : विशेष प्रतिनिधी

महापुरामुळे मोठ्या प्रमाणात मालमत्ता आणि शेतीचे नुकसान झाले असून पूरग्रस्तांच्या मदत आणि पुनर्वसनासाठी केंद्र सरकारकडे 6 हजार 813 कोटी रुपयांच्या मदतीची मागणी करण्यात येणार असल्याची माहितीही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. मदत कार्यातील प्रश्‍न तातडीने सोडवण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळाची उपसमिती नेमण्याचाही निर्णय घेण्यात आला.

मंत्री परिषदेच्या बैठकीत पूरस्थितीचा आढावा घेण्यात आला. कोल्हापूर, सांगली व पुणे येथील पूरस्थितीत मदत व पुनर्वसनासाठी 4,700 कोटी; तर कोकण, नाशिक व उर्वरित राज्यातील मदत, पुनर्वसनासाठी दोन हजार कोटी अशी एकूण 6,813 कोटी रुपयांची मदत केंद्र सरकारकडे मागण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र, केंद्राकडून मदत येण्याची वाट न पाहता राज्याच्या आकस्मिकता निधीमधून खर्च करण्याचा निर्णय मंत्री परिषदेत घेण्यात आल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

या पत्रकार परिषदेला महसूल मंत्री चंद्रकांत पाटील व जलसंपदा मंत्री गिरीश महाजन हे दोघेही मंत्री त्यांच्या समवेत उपस्थित होते.महाजन यांचा कथित सेल्फी व पाटील यांनी पूरग्रस्ताला ‘गप रे’ म्हटल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्याबाबत त्यांना विचारणा केली असता, मुख्यमंत्र्यांनी दोघांचेही जोरदार समर्थन केले. बोटीतून निघाले असता महाजन हात दाखवतात, असा फोटो हा मुळात सेल्फी नाही. काठावरून कोणीतरी हा फोटो काढला. त्यात महाजन हसतात ते कदाचित योग्य नाही, पण सांगलीवाडीत कुणी जात नव्हते, तेथे जीव धोक्यात घालून महाजन गेले हे विसरता येणार नाही, असे ते म्हणाले.

चंद्रकांत पाटील हे मदतीची माहिती सांगताना कोणी कार्यकर्ता मध्येच बोलत होता. त्याला पाटील यांनी गप्प केले असले तरी हा प्रकार आमच्या सर्वांबाबत घडतो. एक विषय सुरू असताना लोक भलतेच बोलतात, तेव्हा त्यांना गप्प करावे लागते, असे मुख्यमंत्री म्हणाले.

वस्तू पाठवू नका : मुख्यमंत्री

पूरग्रस्तांसाठी राज्यातून मोठ्या प्रमाणात वस्तुरूपाने मदत सुरू आहे. मात्र, ही मदत आता नको. आता कोणीही आता वस्तू पाठवू नयेत. त्या ऐवजी मुख्यंत्री सहाय्यता निधीसाठी देणग्या द्याव्यात, असे आवाहन फडणवीस यांनी केले.

अभूतपूर्व पाऊस पडल्याने पूरस्थिती

दि. 1 ते 9 ऑगस्ट या कालावधीत या भागात झालेला पाऊस अभूतपूर्व असा मोठा होता, असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, एरवी जितका पाऊस होतो, त्याच्या दसपटीने अधिक पाऊस या काळात झाला. पुणे 401 टक्के, सोलापूर 94 टक्के, सातारा 618, सांगलीत 758 टक्के तर कोल्हापुरात 480 टक्के इतका पाऊस झाला. या काळात महामार्ग बंद पडल्याने मदतकार्यात अडचणी आल्या व लोकांचा त्रास वाढला. हे भविष्यात टाळावे यासाठी पाणी भरलेल्या जागांवर पूल बाधावेत का याचा विचार करावा लागेल. या दृष्टीने केंद्रीय मंत्री नितीन गडकरींशी चर्चा केल्याचेही फडणवीस म्हणाले.

शेती, फळबागांना मदत व्यापार्‍यांना प्रथमच मदत

पुरामुळे ऊस, फळबागा आदी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. जमीन खरडून गेली आहे. या नुकसानभरपाईसाठी 2 हजार 88 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. आपद्ग्रस्त, मृत व्यक्‍तींच्या कुटुंबीयांच्या मदतीसाठी 300 कोटी रुपये, बचावकार्यासाठी 25 कोटी रुपये, निवारा केंद्रात भरती करण्यात आलेल्या लोकांसाठी अन्‍न, औषधे व कपड्यांसाठी 27 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

साफसफाईसाठी 70 कोटी

पुरामुळे तयार झालेली घाण व साफसफाईसाठी 70 कोटी रुपयांची तरतूद प्रस्तावित आहे. ज्यांची जनावरे दगावली आहेत, अशा शेतकर्‍यांसाठी 30 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. तसेच मृत जनावरांच्या नुकसानभरपाईसाठी पोलिस पाटील तसेच सरपंचाने केलेला पंचनामाही ग्राह्य धरण्यात येणार आहे. जनावर मृत झाले की नाही याची खातरजमा करण्याची वाट पाहिली जाणार नाही, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

मत्स्य व्यावसायिकांना 11 कोटी रुपयांची नुकसानभरपाई, घरबांधणीसाठी 222 कोटी रुपये तर आरोग्य सेवेसाठी 75 कोटी रुपये देण्यात येणार आहेत. रस्ते व पूल बांधणीसाठी 876 कोटी रुपये, जलसंपदा आणि पाणी स्रोतांच्या दुरुस्तीसाठी 168 कोटी रुपये तर शाळा व पाणीपुरवठा योजनेसाठी 125 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. छोट्या-मोठ्या व्यापार्‍यांसह हॉटेल चालकांचे झालेले नुकसान पाहता त्यांच्यासाठी 300 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आहे. या छोटया व्यावसायिकांना त्यांच्या 75 टक्के नुकसानीची भरपाई देण्यात येणार आहे. कमाल 50 हजार रुपयांपर्यंतची ही मदत असणार असेल. छोट्या व्यापार्‍यांना प्रथमच अशा प्रकारे मदत करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

पूरस्थिती अभ्यासासाठी तज्ज्ञांची समिती 

वातावरणातील होणार्‍या बदलांमुळे कोल्हापूर, सांगली, सातार्‍यात इतका मोठा पाऊस का झाला आणि पुन्हा इतका मोठा पाऊस झाला तर परिस्थितीशी कसा सामना करायचा, याचा अभ्यास करण्यासाठी तज्ज्ञांची समिती नेमण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने घेतला आहे.