Thu, Aug 06, 2020 03:56होमपेज › Kolhapur › तस्करांकडून ६ गावठी पिस्तुले हस्तगत

तस्करांकडून ६ गावठी पिस्तुले हस्तगत

Published On: Sep 12 2019 1:48AM | Last Updated: Sep 12 2019 1:43AM

कोल्हापूर : गुन्हेगारी टोळ्यांना शस्त्रे पुरविणार्‍या तस्करांना कोल्हापूर पोलिसांनी बुधवारी जेरबंद केले. याबाबत माहिती देताना पोलिस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, तिरुपती काकडे, तानाजी सावंत.कोल्हापूर : प्रतिनिधी
बिहारमधील मुंगेरा आणि मध्य प्रदेशातील खांडवा येथील कुख्यात शस्त्र तस्करांशी संधान साधून पश्‍चिम महाराष्ट्रासह कोकण, कर्नाटक व अन्य राज्यात शस्त्रांचा पुरवठा करणार्‍या आंतरराज्य टोळीतील तस्करांना कोल्हापूर पोलिसांनी बुधवारी बेड्या ठोकल्या. अर्जुनवाडी (ता. गडहिंग्लज) येथील म्होरक्यासह तिघांना गजाआड करून मोठा शस्त्रसाठा हस्तगत करण्यात आला आहे.

या टोळीने मुंबई, रायगडसह कर्नाटक व अन्य राज्यातील टोळ्यांना शस्त्रे पुरविल्याचे उघड झाले आहे. कोल्हापूर, सांगलीतील गुन्हेगारांशीही त्यांचे लागेबांधे असल्याचे समोर आले आहे. शुभम शांताराम शिंदे (वय 25, रा. अर्जुनवाडी), आदिनाथ तुकाराम बडेकर (38, बीड खुर्द, ता. खालापूर, जि. रायगड), शर्मेश रोहिदास राठोड (32, देवशिस बिल्डिंग, कामोठे, नवी मुंबई) अशी जेरबंद करण्यात आलेल्या तस्करांची नावे आहेत. शुभम शिंदे हा टोळीचा म्होरक्या असून त्याचे साथीदारही सराईत गुन्हेगार आहेत. शिंदेच्या संपर्कातील अन्य दोघांची नावे निष्पन्‍न झाली आहेत. त्यांनाही लवकरच ताब्यात घेण्यात येईल, असे सांगण्यात आले.

शिंदेवर यापूर्वी चंदगडमध्ये, बडेकर, राठोडविरुद्ध कर्जत, अलिबाग, खोपोली, सी.बी.डी. कळंबोली पोलिस ठाण्यात शस्त्र तस्करीचे डझनभर गुन्हे दाखल आहेत.त्यापैकी बडेकरला शस्त्र तस्करीच्या एका गुन्ह्यात सात वर्षांचा कारावास झाला आहे. या तिघांच्या चौकशीत तस्करीचे अनेक गुन्हे उघडकीला येण्याची शक्यता आहे, असे पोलिस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, स्थानिक गुन्हे अन्वेषणचे निरीक्षक तानाजी सावंत यांनी पत्रकारांना सांगितले.

गडहिंग्लज, नवी मुंबई, रायगडमध्ये छापे

शुभम शिंदे शस्त्रांची खुलेआम तस्करी करीत असल्याची माहिती एलसीबीचे फौजदार संतोष पवार यांना मिळाली. पथकाने सापळा रचून शिंदेला कणेरीजवळ (ता. करवीर) ताब्यात घेतले. पोलिसी खाक्यानंतर त्याने तोंड उघडले. त्याच्या अर्जुनवाडा येथील घरावर छापा टाकून गावठी बनावटीची दोन पिस्तुले, काडतुसे हस्तगत करण्यात आली. चौकशीत अन्य दोन साथीदारांचीही नावे निष्पन्‍न झाली. बडेकर याच्या बीड खुर्द व राठोडच्या नवी मुंबईतील फ्लॅटमध्ये छापा टाकून तेथूनही प्रत्येकी दोन पिस्तूल व काडतुसे हस्तगत करण्यात आली आहेत, असेही त्यांनी सांगितले.

शस्त्रनिर्मिती कारखान्यांचा भांडाफोड करणार

शस्त्र तस्करीप्रकरणी अनेकदा कारवाई होते. मात्र शस्त्रनिर्मिती कारखान्यांचा छडा लावण्यात यंत्रणेला अपयश येत असते, मुळापर्यंत तपास का होत नाही, या प्रश्‍नावर डॉ.देशमुख म्हणाले, अप्पर पोलिस अधीक्षक तिरुपती काकडे, तानाजी सावंत यांच्याकडे तपासाची सूत्रे सोपविण्यात आली आहेत. म्होरक्या शिंदेच्या संपर्कात असलेल्या सर्वच तस्करांच्या कृष्णकृत्यांचा निश्‍चित छडा लावू, शिवाय शस्त्रे बनविणार्‍या कारखान्यांचाही भांडाफोड करू.

अन्य राज्यातील पोलिस यंत्रणांची मदत घेणार

लोकसभा आचारसंहिता काळातही बंदुकीसह अनेक गावठी पिस्तूल हस्तगत करण्यात आले होते. सिंगल, डबल बोअर बंदूक बनविणार्‍या कारखान्यांचाही छडा लावण्यात आला होता. यासंदर्भात आणखी तपासासाठी बिहार, मध्य प्रदेशातील पोलिस यंत्रणांचीही मदत घेण्यात येईल, असेही सांगण्यात आले. तस्करी टोळीला जेरबंद करण्यात संतोष पवार, इकबाल महात, असिफ कलायगार, तुकाराम राजिगरे, प्रल्हाद देसाई, नरसिंग कांबळे, अनिल पास्ते, अजय काळे, अमित सर्जे यांनी यश मिळविले.