होमपेज › Kolhapur › ‘म. फुले जीवनदायी’तील 6 रुग्णालये कारवाईच्या रडारवर?

‘म. फुले जीवनदायी’तील 6 रुग्णालये कारवाईच्या रडारवर?

Published On: May 23 2019 1:41AM | Last Updated: May 23 2019 1:14AM
कोल्हापूर : राजेंद्र जोशी

राज्य सरकारच्या जीवनदायी आरोग्य योजनेचा लाभ सर्वसामान्य रुग्णांना मिळवून देण्यात अडथळे निर्माण करणार्‍या योजनेशी संलग्‍न रुग्णालयांच्या प्रशासनांचे वारंवार कान उपटूनही त्यांना अद्यापही शहाणपणा सूचत नाही, असे निदर्शनास आले आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील सहा रुग्णालये कारवाईच्या रडारवर आहेत.

लाभार्थ्यांकडून योजनेची अतिरिक्‍त पैसे उकळणे, आवश्यक त्या सुविधा उपलब्ध न करणे आदी कारणांवरून योजनेशी असलेली संलग्‍नता रद्द होण्याचा धोका समोर असूनही कोल्हापुरातील काही रुग्णालयांनी पुन्हा आपले गुण उधळले आहेत. यापैकी काही रुग्णालये सध्या महात्मा फुले जीवनदायी योजनेच्या प्रवर्तकांच्या रडारवर आहेत. लोकसभा निवडणुकीचे वादळ शमताच त्यांच्यावर कारवाईचा बडगा उगारला जाऊ शकतो. यामध्ये काही मोठ्या रुग्णालयांवर कारवाईचे संकेत मिळू लागले आहेत. 
कोल्हापूर जिल्ह्यात महात्मा 

फुले जीवनदायी योजनेशी एकूण 31 रुग्णालये संलग्‍न आहेत. यातील बहुतेक रुग्णालयांत लाभार्थ्यांना लाभ घेताना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. यामध्ये उपचार खर्चाच्या नावाखाली रुग्णांकडून पैसे उकळणे, योजनेतील साहित्याचा दर्जा सुमार असल्याचे कारण दाखवून चांगल्या दर्जाच्या साहित्याच्या नावाखाली पैसे वसूल करणे, उपचाराच्या चाचण्यांचे अतिरिक्‍त पैसे आकारणे यासह पात्र असूनही रुग्ण योजनेत बसत नाही, असे सांगून त्याच्या योजनेंतर्गत उपचाराला नकार देणे आदी महत्त्वाच्या तक्रारींचा समावेश आहे. या तक्रारींची योजना प्रवर्तकांनी गंभीर दखल घेऊन काही महिन्यांपूर्वी कोल्हापुरात अचानक तपासणी मोहीम उघडली होती. या मोहिमेत काही रुग्णालयांत गैरप्रकार आढळल्याने त्यांची योजनेशी संलग्‍नता रद्द करण्यात आली होती. यानंतर कोणताही गैरप्रकार खपवून घेतला जाणार नाही, असा इशारा योजनेच्या मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांनी पत्रकार परिषद घेऊन उर्वरित संलग्‍न  रुग्णालयांच्या प्रशासनांना दिला. मात्र, त्यानंतर गेल्या 15 दिवसांपूर्वी केलेल्या तपासणीत हे गैरप्रकार सुरूच असल्याचे निदर्शनास आले आहे. त्याचबरोबर उपचार पद्धतीतही काही गंभीर त्रुटी समोर आल्याने काही रुग्णालयांना कारवाईला सामोरे जावे लागणार असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. 

योजनेच्या पथकाने कोल्हापूर जिल्ह्यातील संलग्‍न रुग्णालयांच्या केलेल्या तपासणीमध्ये जिल्ह्यातील 6 रुग्णालये सध्या रडारवर आहेत. यामध्ये योजनेच्या स्थापनेपासून एकूण परतावा खर्चात मोठा हिस्सा मिळविलेल्या दोन मोठ्या रुग्णालयांचा समावेश आहे. यातील एका रुग्णालयात लाभार्थी असूनही उपचार नाकारल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. तर दुसर्‍या एका मोठ्या रुग्णालयात अतिजोखमीच्या रोगावरील उपचारासाठी गेली अनेक वर्षे आवश्यक असलेली तज्ज्ञ व्यक्‍तीच उपलब्ध नसल्याचे धक्‍कादायक प्रकरण पुढे आले आहे. त्याहून गंभीर बाब म्हणजे अशा तज्ज्ञ व्यक्‍तीच्या नावाखाली एक होमिओपॅथी डॉक्टर त्यांच्या वतीने स्वाक्षरी करीत असल्याचे निदर्शनास आल्याने योजना प्रवर्तकांनी हे प्रकरण गांभीर्याने घेतले आहे. 

अतिदक्षता विभागात व्हेंटिलेटरच नाही

एका रुग्णालयात तर रुग्णावर अन्य दवाखान्यात केलेली शस्त्रक्रिया संलग्‍न रुग्णालयाच्या नावाने दाखविण्यात आली आहे. तर कोट्यवधी रुपयांचा महसूल मिळविणार्‍या एका संलग्‍न रुग्णालयात अतिदक्षता विभागात व्हेंटिलेटरच नसल्याचे तपासणीत पुढे आले आहे. या सर्व रुग्णालयांच्या तपासणीचे अहवाल मुंबईत पोहोचले आहेत. त्यांच्यावर कारवाईचा गांभीर्याने विचार सुरू आहे. यामध्ये किमान दोन रुग्णालयांना कारवाईला सामोरे जावे लागेल अशी चर्चा आहे.