Wed, Jul 15, 2020 13:06होमपेज › Kolhapur › कोल्हापूर जिल्ह्यात कोरोना पाचशे पार; दिवसभरात ६८ पॉझिटिव्ह

कोल्हापूर जिल्ह्यात कोरोना पाचशे पार; दिवसभरात ६८ पॉझिटिव्ह

Last Updated: May 29 2020 10:52PM

file photoकोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा

कोल्हापूर जिल्ह्यात कोरोनाचे टेन्शन कायम आहे. आज शुक्रवारी दिवसभरात जिल्ह्यात एकूण ६८ रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले. आज दुपारी ३० रुग्ण सापडले होते. त्यानंतर सायंकाळी ५.३० वाजता १७ आणि रात्री ९.४५ वाजता नवीन २१ रुग्णांची त्यात भर पडली. यामुळे जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या ५०४ वर पोहोचली आहे.

कालपर्यंत रुग्णांची संख्या ४३६ होती. त्यात आणखी आज ६८ रुग्ण वाढले. यामुळे कोल्हापूरकरांची चिंता वाढली आहे.

राधानगरी तालुक्यात आज ५ वाजेपर्यंत आणखी ८ कोरोनाग्रस्त रुग्ण सापडले आहेत. यात फेजिवडे ३, आटेगाव, कंदलगाव, आमजाई व्हरवडे, मांडरेवाडी व मोघर्डे येथील प्रत्येकी १ रुग्णाचा समावेश आहे. आजअखेर तालुक्यात ५८ रुग्ण सापडले आहेत.

चंदगडमध्ये आज ४ वाजेपर्यंत आणखी ६ कोरोनाग्रस्त रुग्ण सापडले. चंदगडमधील रुग्णांची संख्या आता ३३ वर पोहोचली आहे. शाहूवाडी तालुक्यात नवीन सहा कोरोना रूग्णांची नोंद झाली आहे.

मुंबईहून आलेल्या आणि क्‍वारंटाईन केंद्रातून पळून गेलेल्या बाधितामुळे आणूर (ता. कागल) येथील २४ वर्षीय तरुणाला कोरोनाची लागण झाली आहे. दि. ४ मेनंतर आढळलेले सर्व रुग्ण पुणे-मुंबईसह रेड झोनमधून जिल्ह्यात आलेले होते. 

दरम्यान, जिल्ह्यात कोरोनामुक्‍त होणार्‍या रुग्णांचीही संख्या वाढत आहे. ही दिलासादायक बाब आहे. गुरुवारी दिवसभरात ४९ रुग्ण बरे होऊन रुग्णालयातून घरी गेले. यामुळे जिल्ह्यातील कोरोनामुक्‍त झालेल्यांचा एकूण आकडा ९१ वर गेला आहे. बरे होणार्‍यांचे जिल्ह्यातील आजअखेरचे प्रमाण २० टक्के इतके आहे.