Thu, Jul 02, 2020 16:52होमपेज › Kolhapur › चिंता वाढली! कोल्हापुरातील कोरोनाबाधितांचा आकडा ३७८ वर 

चिंता वाढली! कोल्हापुरातील कोरोनाबाधितांचा आकडा ३७८ वर 

Last Updated: May 25 2020 6:50PM

file photoकोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा

जिल्ह्यात कोरोनाबाधितांचा आलेख वाढतच चालला आहे. सोमवारी आणखी 37 नव्या रुग्णांची त्यात भर पडली. यामुळे जिल्ह्यात कोरोनाग्रस्तांची संख्या 378 झाली आहे. शाहूवाडी तालुक्यातील संख्याही वाढतच असून, आज त्यात आणखी 15 रुग्णांची वाढ झाली. यामुळे या एकाच तालुक्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या 119 वर गेली आहे.

जिल्ह्यात दि. 12 मेपासून रुग्णसंख्या वाढतच चालली आहे. सोमवारीही सलग 13 व्या दिवशी 37 रुग्ण आढळून आले. आज दिवसभरात प्रशासनाला 39 पॉझिटिव्ह अहवाल प्राप्‍त झाले. दुपारी 31, तर सायंकाळी 8 रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. मात्र, त्यापैकी दोन अहवाल यापूर्वीच आले होते. त्यांचा पुन्हा यादीत समावेश झाल्याने दिवसभरात 37 अहवालच केम्पीपाटील यांनी सांगितले. शाहूवाडीतील रुग्णसंख्येत आज सायंकाळपर्यंत 15 नवीन रुग्ण आढळले. यामध्ये पिशवी येथील 14 वर्षीय युवतीसह तिच्या 45 वर्षीय वडिलांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. यासह कांडवण, भेडसगाव, शिवारे या गावांतील पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत.

मुंबईहून सर्वाधिक नागरिक आलेल्या आजरा तालुक्यातील रुग्णसंख्या वाढत चालली आहे. आज त्यात नव्या 16 रुग्णांची भर पडली. यामध्ये भादवणमधील दोघांचा समावेश आहे. चिमणे येथील एकाच कुटुंबातील तिघांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. अर्दाळ येथील एकाच कुटुंबातील दोघांना लागण झाल्याचे आज स्पष्ट झाले. यासह वजरे, चाफवडे, पारपोली, सरोळी, देवकांडगाव, बेलेवाडी, चव्?हाणवाडी, भैरेवाडी, भादवणवाडी आदी गावांतही रुग्ण आढळून आले आहेत.

पन्हाळा तालुक्यात आणखी तीन रुग्ण वाढले आहेत. यामध्ये बुधवार पेठ आणि आरळे येथील युवतींचा समावेश आहे. इंजोळी येथील 45 वर्षीय महिलेचाही अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. भुदरगडमध्ये आज आणखी दोन रुग्ण आढळल्याने या तालुक्याचा आकडा 49 पर्यंत गेला. अंतिवडे व गारगोटी येथील रुग्णांचा आज पॉझिटिव्ह अहवाल आलेल्यांत समावेश आहे. राधानगरी तालुक्यात केळोशी येथील 13 वर्षीय मुलालाही कोरोनाची लागण झाली आहे.

दरम्यान, कागल तालुक्यात रविवारी सकाळपर्यंत केवळ एका रुग्णाची नोंद होती. सोमवारी सायंकाळपर्यंत या तालुक्यातील बाधितांची संख्या 11 वर गेली. यामध्ये दौलतवाडी येथील बाप-मुलीचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.

जिल्ह्यात रेड झोनमधून आलेल्यांचे अहवाल पॉझिटिव्ह येत आहेत. दि. 9 मेपासून आढळणारा प्रत्येक रुग्ण हा जिल्ह्याबाहेरून प्रवास करून आलेला आहे. स्थानिक रुग्ण आढळणार नाही अथवा त्याला बाधा होणार नाही, याची दक्षता जिल्हा प्रशासनाकडून घेतली जात आहे. याकरिता रेड झोनमधून येणार्‍यांचे सक्‍तीने इन्स्टिट्यूशनल क्‍वारंटाईन केले जात आहे. यामुळे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात रुग्ण आढळून येत असतानाही जिल्ह्यात समूह संसर्ग झालेला नाही. ही दिलासादायक बाब असली, तरी जिल्ह्यात येणार्‍यांची संख्या आणखी वाढणार असल्याने जिल्हा प्रशासनाने त्याबाबतही नियोजन सुरू केले आहे.

931 अहवाल निगेटिव्ह

आज दिवसभरात 968 अहवाल प्राप्‍त झाले. त्यापैकी 931 अहवाल निगेटिव्ह आले आहेत. जिल्ह्यात स्वॅब प्रलंबित राहण्याचे प्रमाण अधिक आहे. आजअखेर सर्व प्रलंबित स्वॅबची तपासणी पूर्ण केली जाणार होती. तसे जिल्हाधिकार्‍यांनी आदेश दिले होते. मात्र, सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत नव्याने घेतलेल्या 175 स्वॅबसह एकूण 5 हजार 602 स्वॅबचे तपासणी अहवाल प्रलंबित होते. स्वॅबचे प्रमाण कमी झाले आहे, त्या तुलनेत तपासणीचा वेग वाढला आहे. यामुळे येत्या आणखी काही दिवसांत रुग्णसंख्या वाढणार असल्याची शक्यता जिल्हा प्रशासनाच्या वतीने व्यक्‍त करण्यात आली.