Sat, Feb 27, 2021 08:24होमपेज › Kolhapur › कोल्हापुरात आणखी ३१ रुग्ण; संख्या २५९

कोल्हापुरात आणखी ३१ रुग्ण; संख्या २५९

Last Updated: May 23 2020 1:41AM
कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा
जिल्ह्यात शुक्रवारी दिवसभरात कोरोनाचे 31 नवे रुग्ण आढळून आले. यामुळे बाधितांचा आकडा अडीचशे पार करून 259 वर गेला आहे. शाहूवाडीत आज, शुक्रवारीही रुग्ण आढळून आले. यामुळे एकट्या शाहूवाडी तालुक्यातील रुग्णांची संख्या  81 पर्यंत गेली आहे. जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी आज शाहूवाडी तालुक्याला भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला.

जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या सातत्याने वाढतच आहे. शुक्रवारी दिवसभरात त्यात 31 नव्या रुग्णांची भर पडली. दुपारी पावणेदोन वाजता आठ रुग्णांचे अहवाल आले. यापैकी शाहूवाडी तालुक्यातील तिघांचे अहवाल पॉझिटिव्ह आले होते. कोल्हापूर महापालिका क्षेत्रातील एका रुग्णाचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याचे प्रशासकीय नोंदीनुसार स्पष्ट झाले. मात्र, बाधित रुग्ण हा शाहूवाडी तालुक्यातील असून त्याने तपासणीदरम्यान बहिणीचा पत्ता दिल्याने त्याची नोंद कोल्हापूर शहरातील रुग्ण म्हणून झाली आहे.

हातकणंगले, पन्हाळा, शिरोळ आणि चंदगड या चार तालुक्यांतही दुपारी प्रत्येकी एका रुग्णाचा अहवाल पॉझिटिव्ह आला. सायंकाळी सातच्या सुमारास बाधितांच्या संख्येत 23 ची भर पडली. यामध्ये गडहिंग्लज तालुक्यातील आठ रुग्णांचा समावेश होता. राधानगरीतही आज सहा नवे रुग्ण आढळले आहेत. यामुळे राधानगरी तालुक्यातील एकूण बाधितांचा आकडा 42 वर गेला आहे.

चंदगडमध्ये आणखी तीन रुग्ण बाधित असल्याचे स्पष्ट झाले. यामुळे दिवसभरात चंदगडचा आकडा चार वर गेला. नगरपालिका हद्दीतही आज आणखी तीन रुग्णांची भर पडली आहे. हातकणंगलेत दुपारीही आणखी एकाचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने दिवसभरातील संख्या दोनवर गेली. भुदरगडमध्ये आणखी एका रुग्णांची भर पडली. गगनबावड्यातही आणखी एक रुग्ण आढळून आला आहे.

९७ टक्के अहवाल निगेटिव्ह

जिल्ह्यात आज दिवसभरात 1 हजार 1 अहवाल जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाले. यापैकी 31 अहवाल पॉझिटिव्ह आले असून तब्बल 874 अहवाल निगेटिव्ह आले आहेत. आज प्राप्त अहवालापैकी केवळ 3 टक्के पॉझिटिव्ह अहवाल असून 97 टक्के अहवाल निगेटिव्ह आल्याने जिल्ह्यासाठी ही दिलासादायक बाब आहे.

जिल्ह्यातील कोरोना केअर सेंटरमध्येही उपचार

पॉझिटिव्ह रुग्णांवर आता जिल्ह्यातील कोरोना केअर सेंटरमध्ये उपचार सुरू करण्यात आले आहेत. जिल्ह्यात दि. 22 मे रोजी सकाळी प्राप्त झालेल्या अहवालानुसार 121 पॉझिटिव्ह रुग्णांना जिल्ह्यातील कोरोना केअर सेंटरमध्ये दाखल करण्यात आले आहे. यापैकी आजर्‍यातील सेंटरवर सात, भुदरगडमधील सेंटरवर 11, चंदगडमध्ये 9, गडहिंग्लजमध्ये 3, गगनबावड्यात 3, हातकणंगलेत 1, राधानगरीत 33 तर शाहूवाडी तालुक्यात पेरीड येथे सुरू केलेल्या कोरोना केअर सेंटरमध्ये सर्वाधिक 54 पॉझिटिव्ह रुग्णांना उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. सीपीआरमध्ये 99 रुग्णांवर उपचार सुरू असून त्यापैकी 17 शहरी भागातील आहेत. उर्वरित ग्रामीण भागातील 82 रुग्णांपैकी शाहूवाडी तालुक्यातील 23, शिरोळमधील 8, राधानगरीतील 3, पन्हाळा तालुक्यातील 12, कागलमधील 1, करवीरमधील 7, हातकणंगले, गगनबावड्यातील प्रत्येकी एक, गडहिंग्लजमधील 3, चंदगडमधील 5, भुदरगडमधील 12 तर आजरा तालुक्यातील सहा रुग्णांवरही सीपीआरमध्ये उपचार सुरू आहेत.

बाधितांपैकी 8 टक्के बालके
आजअखेर आढळून आलेल्या रुग्णांपैकी आठ टक्के बाधित बालके आहेत. ही सर्व 1 ते 10 या वयोगटातील आहेत. जिल्ह्यात एकूण 259 बाधितांपैकी 22 बालकांना कोरोनाची लागण झाली आहे. बाधितांमध्ये 51 ते 70 या वयोगटातीलही 22 रुग्ण आहेत. सर्वाधिक बाधित 21 ते 50 वयोगटातील 180 इतके आहेत. तर 11 ते 20 या वयोगटातील 34 बाधितांचा समावेश आहे.

इचलकरंजीत पुन्हा कोरोनाचा शिरकाव
इचलकरंजीत 20 एप्रिल रोजी पहिला रुग्ण आढळला होता. 62 वर्षीय वृद्धाला कोरोनाची लागण झाल्यानंतर त्याच्या 4 वर्षीय नातवाचाही दि. 21 रोजी अहवाल पॉझिटिव्ह आला होता. या बालकाने कोरोनावर मात केली. मात्र या वृद्धाचा कोरोनाने बळी घेतला. जिल्ह्यातील हा पहिला बळी होता. यानंतर 4 मे रोजी इचलकरंजीत तिसरा रुग्ण आढळला. हा वृद्धही कोरोनामुक्‍त होऊन गुरुवारीच रुग्णालयातून घरी परतला होता. यामुळे इचलकरंजी शहर कोरोनामुक्‍त झाले असतानाच कोरोनाचे दोन रुग्ण आढळून आले आहेत. सोलापूरहून आलेल्या 28 वर्षीय महिलेसह तिच्या 8 वर्षीय मुलीलाही कोरोनाची लागण झाली आहे. यासह त्यांचा 26 वर्षीय नातेवाईकही बाधित आहे. मात्र,त्याचा नेमका पत्ता उशिरापर्यंत उपलब्ध झाला नाही.

औरवाडमध्ये 12 वर्षीय बालिकेला लागण

कर्नाटकातून परतलेल्या औरवाड (ता. शिरोळ) येथील एका 12 वर्षीय बालिकेचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. तिला घरीच क्‍वारंटाईन करण्यात आले होते. मात्र तिचा अहवाल आल्यानंतर तिला कोरोना केअर सेंटरमध्ये दाखल करण्यात आले आहे.