Sat, Jan 23, 2021 07:01होमपेज › Kolhapur › कोल्हापुरातील कोरोना मीटर सुरुच; तब्बल ३० जणांची भर

कोल्हापुरातील कोरोना मीटर सुरुच; ३० जणांची भर

Last Updated: May 29 2020 3:13PM

संग्रहित छायाचित्रकोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा 

कोल्हापुरातील मीटर सुरुच असून तब्बल ३० जणांची भर पडली आहे. त्यामुळे बाधितांचा आकडा ४६४ वर गेला आहे. आता आलेल्या अहवालातील गडहिंग्लज नऊ, चंदगड सहा, शाहुवाडी चार, राधानगरी पाच, कागल दोन, शिरोळ दोन आणि आजऱ्यातील दोघांचा समावेश असून सहा वर्षाच्या एका मुलासह पाच वर्षाच्या एका मुलीचाही समावेश आहे.

काल (ता.२८) मुंबईहून आलेल्या आणि क्‍वारंटाईन केंद्रातून पळून गेलेल्या बाधितामुळे आणूर (ता. कागल) येथील 24 वर्षीय तरुणाला कोरोनाची लागण झाली आहे. दि. 4 मेनंतर आढळलेले सर्व रुग्ण पुणे-मुंबईसह रेड झोनमधून जिल्ह्यात आलेले होते. आज 24 दिवसांनी प्रथमच गुरुवारी स्थानिक रुग्ण आढळल्याने जिल्हा आरोग्य यंत्रणा हादरून गेली आहे. यामुळे सामूहिक संसर्गाचा धोका वाढण्याची शक्यता असल्याने जिल्हा प्रशासनाची चिंता वाढली आहे.

गुरुवारी जिल्हा प्रशासनाला दुपारी 25 जणांचे पॉझिटिव्ह अहवाल प्राप्‍त झाले. यापैकी आणूर येथील 24 वर्षीय तरुणाचा पॉझिटिव्ह आलेला अहवाल सर्वांची चिंता वाढवणारा ठरला. मुंबईहून आलेल्या बाधित तरुणाचा जवळचा नातेवाईक असलेला तरुण कोरोनाबाधित आढळून आला आहे. केनवडे फाटा येथून त्याच्यासोबत त्याचे साहित्य घेऊन सुमारे सात किलोमीटर अंतरावर असलेल्या आणूरपर्यंत हा तरुण सोबत आला होता. बाधित तरुणासोबत आल्याने तोही संक्रमित झाल्याचे गुरुवारी सायंकाळी स्पष्ट झाले.

मुंबईहून आलेल्या तरुणाला तपासणीनंतर गावातील शाळेत क्‍वारंटाईन होण्यास सांगितले. मात्र, हा तरुण आपल्या कुटुंबासह क्‍वारंटाईन केंद्रातून पुन्हा मुंबईला गेला. तो ज्या दिवशी मुंबईला परतला, त्याच्याच दुसर्‍या दिवशी त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने प्रशासनाची धावपळ उडाली होती. त्याच्या संपर्कात आलेल्यांना क्‍वारंटाईन करण्यात आले होते, त्यामध्ये या तरुणाचाही समावेश होता. आज त्याचाही अहवाल पॉझिटिव्ह आला. यामुळे जिल्ह्यात 24 दिवसांनंतर प्रथमच जिल्ह्यातीलच स्थानिक रुग्णाची आज नोंद झाली.

आणूर येथील रहिवासी असलेल्या या तरुणाच्या संपर्कात आलेल्यांची यादी मोठी आहे. संपर्कातील सर्वांचा शोध घेतला जात असून, काहींना रात्री उशिरापर्यंत रुग्णालयात दाखल करण्यात येत होते. यासह आणूर आणि परिसरातील गावांतील काहींना होम क्‍वारंटाईन करण्यात आले आहे. पुणे-मुंबई येथून आलेलेच लोक पॉझिटिव्ह येत आहेत, अद्याप स्थानिक व्यक्‍तीला लागण झाली नाही, जिल्ह्यात सामूहिक संसर्ग नाही, असे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात येत होते. मात्र, आणूर येथील प्रकाराने समूह संसर्गाचा धोका वाढला आहे. 

गडहिंग्लजमध्ये 14 रुग्ण; भीतीचे वातावरण

काल दिवसभरात आढळलेल्या रुग्णांत सर्वाधिक 14 रुग्ण एकट्या गडहिंग्लज तालुक्यातील आहेत. गेल्या दोन दिवसांत गडहिंग्लज तालुक्यात कोरोनाचे दोन बळी गेले आहेत. यामुळे या तालुक्यात भीतीचे वातावरण असताना आता रुग्णसंख्याही झपाट्याने वाढू लागली आहे. गडहिंग्लज तालुक्यात तीन महिला आणि अकरा पुरुष अशा नव्या 14 रुग्णांची भर पडल्याने तालुक्यातील एकूण रुग्णांची संख्या 30 वर गेली आहे.

कागल तालुक्यात आणूर येथील तरुणासह नवे चार रुग्ण आढळून आले. कागल तालुक्यातील मुगळी येथील आणखी दोन रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. यापूर्वी वडिलांना कोरोनाची लागण झाली होती, आज त्यांचा सात वर्षीय मुलगा आणि तीन वर्षीय मुलीलाही लागण झाल्याचे स्पष्ट झाले. दौलतवाडी येथेही मुंबईहून आलेल्या आणखी एकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. यामुळे कागल तालुक्यात  आजअखेर आढळून आलेल्या रुग्णांची संख्या 15 वर गेली आहे.

पन्हाळा तालुक्यात दोन नव्या रुग्णांची भर पडली आहे. पिंपळे येथील 32 वर्षीय आणि वाघवे येथील 24 वर्षीय तरुणाला कोरोनाची बाधा झाली आहे. त्यांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याने तालुक्यातील एकूण बाधितांची संख्या 22 इतकी झाली. करवीर तालुक्यात आज एक रुग्ण आढळून आला. निगवे खालसा येथील 30 वर्षीय महिलेचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. दोन दिवसांपूर्वी तिच्या पतीचाही अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. एका रुग्णाची आज भर पडल्याने करवीर तालुक्यातील बाधितांचा आकडाही 12 वर गेला. राधानगरी तालुक्याची एकूण रुग्णसंख्या आज 49 वर गेली. तालुक्यातील आवळी येथील 23 वर्षीय महिलेचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.

सर्वाधिक रुग्णसंख्या असलेल्या शाहूवाडी तालुक्यात आज एक पुरुष रुग्ण आढळून आला आहे. म्हालसवडे येथील 2 वर्षांच्या बालकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. यामुळे या तालुक्यातील एकूण रुग्ण संख्येचा आकडा 136 इतका झाला. चंदगडमधील सत्तेवाडीत आणखी एक रुग्ण आढळला आहे. यापूर्वी रुग्ण आढळलेल्या कुटुंबातीलच 27 वर्षीय तरुणाचाही अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.

जिल्ह्यात कोरोनामुक्‍त होणार्‍या रुग्णांचीही संख्या वाढत आहे. ही दिलासादायक बाब आहे. गुरुवारी दिवसभरात 49 रुग्ण बरे होऊन रुग्णालयातून घरी गेले. यामुळे जिल्ह्यातील कोरोनामुक्‍त झालेल्यांचा एकूण आकडा 91 वर गेला आहे. बरे होणार्‍यांचे जिल्ह्यातील आजअखेरचे प्रमाण 20 टक्के इतके आहे.