Sat, Sep 26, 2020 22:43होमपेज › Kolhapur › कोल्हापूर : ‘नगरोत्थान’चे 3.74 कोटी पडून

कोल्हापूर : ‘नगरोत्थान’चे 3.74 कोटी पडून

Published On: Jul 18 2018 1:53AM | Last Updated: Jul 18 2018 12:10AMकोल्हापूर : अनिल देशमुख

नगरोत्थान योजनेतून महापालिकेला मंजूर झालेले 3 कोटी 74 लाख रुपये मार्च महिन्यापासून पडून आहेत. यापैकी पहिल्या हप्त्याचा 1 कोटी 23 लाख 42 हजार रुपयांचा धनादेश 12 जून रोजी काढण्यात आलेला आहे. मात्र, महापालिकेने तो अद्याप नेलेला नाही. याच निधीतून रेल्वे स्थानकावरील पादचारी पुलाचेही काम केले जाणार आहे. मात्र, हे कामही आता रखडले आहे. एकीकडे निधीसाठी विविध प्रयत्न केले जातात, तर दुसरीकडे निधी मिळूनही तो पडून राहत असल्याचे चित्र आहे.

जिल्हा नियोजन समितीतून महापालिकेसाठी नगरोत्थान योजनेतून 3 कोटी 74 लाख रुपयांचा निधी मार्च महिन्यात मंजूर करण्यात आला आहे. यापैकी 80 लाख रुपये रेल्वे स्थानकावरील मध्यवर्ती बसस्थानक ते राजारामपुरी या मार्गाला जोडणार्‍या पादचारी पुलासाठी खर्च केले जाणार आहेत. त्या कामाची प्रशासकीय मान्यताही घेण्यात आली आहे. त्यानुसार या योजनेतील पहिला 33 टक्क्याचा हप्ता म्हणून 1 कोटी 23 लाख 42 हजार रुपये देण्यात येणार आहे. त्याचा धनादेशही नगरपालिका प्रशासनाने काढला आहे. 

दरम्यान, महापालिकेने यापूर्वी खर्च केलेल्या निधीचा हिशेबच दिलेला नाही. विशेष म्हणजे 2015-16 साली नगरोत्थान योजनेतून 1 कोटी 90 लाख 70 हजार रुपयांचा निधी मंजूर झाला होता. त्यापैकी पहिला हप्‍ता म्हणून 62 लाख 93 हजार रुपयांचा निधी महापालिकेने खर्च केला. मात्र, उर्वरित 1 कोटी 27 लाख 77 हजार रुपयांच्या निधीची महापालिकेने अद्याप मागणीच केलेली नाही. हा निधी खर्च करण्याची मुदतही संपली आहे. यामुळे हा शिल्लक निधी मिळण्याची शक्यता जवळपास संपली आहे.

महापालिका निधीसाठी उदासीन!

जिल्हा नियोजनने 2015-16 साली दिलेल्या निधीपैकी खर्च केलेल्या 62 लाख 93 हजार रुपयांच्या निधीच्या खर्चाचे प्रमाणपत्र आणि थर्ड पार्टी ऑडिट रिपोर्ट सादर केलेला नाही. यामुळे यावर्षीचा धनादेश मंजूर असूनही तो निधी महापालिकेला अद्याप मिळवता आलेला नाही. याबाबत प्रशासनाने महापालिकेला पत्रही दिले आहे. मात्र,महापालिका निधीसाठी उदासीनच असल्याचे चित्र आहे. जो पहिला हफ्ता दिला त्यातील 80 लाख रुपये पादचारी पुलासाठी वापरले जाणार आहेत. मात्र, निधीच नसल्याने अद्याप पुलाला मुहूर्त मिळालेला नाही.